November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

वैशाली भगवान बुद्धाची प्रिय नगरी – राहुल खरे, नाशिक

वैशाली भगवान बुद्ध यांची आवडती नगरी होती, जिला पाली भाषेत ‘वैसाली’ सुद्धा म्हटले जाते. वैशाली नगरी धन वैभव, सैन्य व ईतर अनेक बाबतीत विपुल असल्याने शेजारील राज्यांना वैशाली नगरीचा हेवा वाटत असे. या नगरीत बुद्ध धम्माशी संबंधित अनेक ऐतिहासिक स्तुपांचे भग्न अवशेष वर्तमान बसाढ नामक ठिकाणाजवळ अस्तित्वात आहे, जे स्थान मुजफ्फरपुर पासुन 20 मधील दुर दक्षिण-पश्चिमेस आहे.

वैशाली सिद्धार्थ गौतम बुद्ध कालीन लिच्छवी गणराज्याची राजधानी होती. त्यासमयी भगवान बुद्धानी वज्जीयांच्या न्याय प्रियतेची भगवान बुद्धांनी प्रशंसा केली होती. वैशाली आठ जनपदांचे अर्थात अट्ठकुलाच्या संयुक्त वज्जीगण संघाची राजधानी होती. वैशाली राजधानी स्थळाचा नगरकोट तीन प्रकारच्या भिंतींनी विस्तारीत व सुरक्षित होता. उत्तरेसा गंगा नदिचा तट व समुद्र व्यापारी दृष्टीने महत्त्वाचा होता. भुमार्गे व जलमार्गे प्रांतातील व परदेशातील व्यापारी वैशाली मधील बाजारापेठेत येत असत. वैशाली मधील उत्पादित वस्तू कोशल, अवंती, तक्षशिला, मगध देश व अन्य प्रदेशात निर्यात केल्या जात होत्या. विलास भोगी, लोकशाही प्रेमी वैशाली नगरी मधील नागरीकांना सुंदर वस्र व अलंकार परिधान करण्याची फारच आवड होती, त्यामुळे भगवान बुद्धांनी वैशालीच्या लिच्छवींची तुलना तावंतीस दिव्यलोकं मधील देवतांसोबत केली होती. लिच्छवी राज्यकाळात सहिष्णुता व बंधुत्वामुळे बुद्ध धम्माचा पुष्कळ प्रचारआणि प्रसार झाला. वैशाली नगरीस जगातील प्रथम लोकशाही असलेली राजधानी असल्याचा सन्मान व गौरव मिळाला आहे.

वैशाली भगवान बुद्धांची प्रिय नगरी होती. राजगृह जात असतांना किंवा येत असताना भगवान बुद्ध नेहमी वैशाली मधे थांबत असत. वैशालीच्या कुटागार शाळेत भगवान बुद्धांनी अनेक महत्त्वाचे उपदेश दिले आहेत. भगवान बुद्ध वैशाली मधील बहुपुत्रचैत्य, चापालचैत्य व महावन कुटागार शाळेत नेहमी राहत असतं. वैशाली मधे भगवान बुद्धाच्या काळात अनेक विहार व चैत्य बांधले गेले होते, जसे उद्यानवन चैत्य, गौतम चैत्य, सप्त चैत्य, बहुपुत्रक चैत्य व सारनंद चैत्य. वैशाली मधे दुष्काळ पडला असताना भगवान गौतम बुद्धांनी रतन सुत्राचे पठन करून भिषन परिस्थिती मधे सुधारणा घडवून आणली होती. वैशाली मधेच बौद्ध भिक्षुनी संघाची स्थापना झाली होती.
वैशाली कला कौशल्य व शिल्पाकरीता जगप्रसिद्ध होती. वैशाली मधे 8 फुट उंच व जवळ जवळ दीड किलोमीटर क्षेत्रातील परिसरामधील टेकडीस राजा विशाल गढ यांची टेकडी म्हणतात. याच ठिकाणी वज्जीगण राज्य संघाचे सभागृह ( संथागार ) होते. याठिकाणी 770 सभासद एकत्र येऊन राज्य प्रशासन संदर्भात चर्चा करत असत. या सभासदांना सन्निपत म्हणत असत. हे सभासद जनतेतुन निवडले जात असत. टेकडीपासुन जवळजवळ 3.5, किमी दुरवर उत्तर-पश्चिमेस देवांना प्रिय असलेला प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांनी बनविलेला अशोक स्तंभ आहे. या स्तंभावर एकमुखी सिंहाची प्रतिमा विराजमान आहे. अशोक स्तंभाच्या दक्षिणेस प्राचीन तलाव आहे, जो आजकाल रामकुंड नावाने प्रसिद्ध आहे. या तलावाच्या काठी प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांनी बुद्धधम्म वर प्रभावित होऊन बौद्ध स्तुप व स्तंभ बनविला आहे. राजा विशाल गढ या टेकडी पासुन हा स्तुप 2.5 किमी च्या अंतरावर आहे. या स्तुपांचा व्यास त्यावेळी 25 फुट होता, या स्तुपास प्राचीन काळी लिच्छवी स्तुप असे म्हटले जात होते.

भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या 100 वर्षानंतर भदंत सब्बकामी यांच्या अध्यक्षतेखाली वैशाली मधेच इसवी सन पुर्व 383 मधे द्वितीय धम्म संगिती झाली होती. या संगिती मधे 700 वरिष्ठ भिक्षुंनी भाग घेतला होता. कंठस्त बौद्ध धम्म ग्रंथांची शुद्धता व सुरक्षा साठी तीसरी धम्म संगिती प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांच्या वेळी पाठलीपुत्र (पटना) येथे झाली होती. वैशाली मधील प्रसिद्ध नर्तकी आम्रपालीचे निवासस्थान देखील वैशाली नगरी आहे. आम्रपालीने तथागतास व भिक्षुसंघास 35 व्या वर्षावासा दरम्यान भोजन दानासाठी आमंत्रित केले होते. आम्रपाली बुद्ध धम्म व संघाला शरण गेली होती, तीन रमणीय आम्रवन भिक्षुसंघास दान दिले होते. वैशालीमधील अरहंत थेरी विमला ही दुषित जीवनाचा त्याग करून बुद्ध धम्म व संघास शरण आली होती. वैशाली मधील महावन कुटागार शाळेत भगवान बुद्धांनी घोषणा केली होती की आजपासून ठीक तीन महिन्यांनी बुद्ध महापरिनिर्वाणास प्राप्त होतील.
You are in Dhamma
✍️ राहुल खरे नाशिक
9960999363