नागसेन वनातील मातीच्या गुणधर्मामुळे माझे जीवन सफल झाले – आयु. व्ही. जी. जाधव
(चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुंबई खादी व व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशन, मुंबई व
माजी जनरल मॅनेजर, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई) दिनांक : २५/०६/२०२०
मी अगदी गरीब कुटुंबात जन्मलो. माझे आई-वडील दोघेही अशिक्षित होते. मला पाच भाऊ व आठ बहिणी होत्या. माझ्या कुटुंबातील मी १२ वे रत्न आहे. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण माझ्या वतनाच्या गावी, सिंदखेडराजा, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य, (भारत) येथे झाले. सिंदखेडराजा हे गाव आपल्या महाराष्ट्राला भूषण असलेल्या बहुजनांचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ व स्वराज्य-जननी मातोश्री जिजाऊ आऊसाहेब यांचे हे माहेरघर आहे.
सन् १९५८ साली ७ वीची परीक्षा बोर्डाची होती व ती जनपद सभा मेहकर घेत असे. त्यावेळेस मेहेकर हे तालुक्याचे ठिकाण होते. मी सातवीची परीक्षा १९५७-५८ मध्ये चांगल्या मार्काने पास झालो. माझ्या विद्यार्थीदशेत मी पडेल ते काम करीत असे. माझे मोठे बंधू (कडूबा जाधव) हे कोतवालकीचे काम करीत असत. म्हणजे वर्षात ३ महिने येसकरकीचे काम असे व आम्हाला चार आणे वाटा येसकरकीचा मिळत असे. मोठा भाऊ तालुक्याच्या ठिकाणी येसकरकीचा पगार १६/- रूपये आणावयास महिन्याच्या शेवटी जात असे. त्यावेळी त्यांच्या गैरहजेरीत मी गांवगाड्याचे सुद्धा काम करीत असे. मी दुष्काळी कामांमध्ये बराच खोदण्याचे काम केले, उन्हाळ्यामध्ये जंगलात जाऊन तेंदूची पाने तोडून आणून विकली. कधी-कधी माळवं (भाजीपाला) विकण्यास शेजारच्या गावी सुद्धा जात असे. सांगावयाचे तात्पर्य असे की, परिस्थितीनुसार सर्वच कामे केली व कधी-कधी उपासमार सुद्धा सहन केली.
मी सातवीची परीक्षा पास झाल्यानंतर जनता हायस्कूल, जालना येथे आठवीच्या वर्गात प्रवेश घेतला व एस.सी. ; एस.टी.च्या वसतिगृहात मला प्रवेश सुद्धा मिळाला. वसतिगृहातील शिस्तीचे वातावरण अभ्यासासाठी पोषक असल्यामुळे व चांगल्या मित्रांचा सहवास लाभल्यामुळे चढाओढीने अभ्यास करीत असे. त्यामुळे जीवनात शिस्तबद्धता आली. मी दहावीत असताना माझे सर्वच विषय चांगले होते पण अंकगणित हा विषय कच्चा होता. मला अंकगणित या विषयाची शिकवणी लावावयाची होती; पण लावू शकलो नाही. माझे बंधू कडूबा जाधव यांनी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी पुकारलेल्या भूमिहीनांच्या सत्याग्रहात भाग घेतला होता व त्यांना जेल सुद्धा झाली होती. मी ही परिस्थिती गुजराथी सरांना सांगितली. “तुझ्या शिकवणीचे पैसे नको, तू माझ्याकडे शिकवणीसाठी येत जा” असे त्यांनी मला सांगितले व फी न घेता त्यांनी मला शिकविले. आदरणीय गुजराथी सरांच्या शिकवणीमुळे मी अंकगणितात चांगल्या मार्कांनी पास झालो.
५ सप्टेंबर हा दिवस (डाॅ. एस. राधाकृष्णन् यांचा वाढदिवस) “शिक्षक दिन” म्हणून साजरा करण्यात येत असे. मी एस. एस. सी. ला होतो व शिक्षक दिनानिमित्त मी मुख्याध्यापक झालो होतो. तसेच मी इंग्रजी हा विषय एस. एस. सी. च्या वर्गाला शिकविला होता, म्हणजे माझ्या वर्ग बांधवांना. त्या धड्याचे नाव ‘ To Students ‘असे होते. माझ्या वर्गातील सर्व मुलांनी माझ्या शिकविण्याचे कौतुक केले. ही माझ्या विद्यार्थीजीवनातील एक अविस्मरणीय घटना आहे.
दुसरा प्रसंग असा की, मला एस. एस. सी. परीक्षेचा फॉर्म भरायचा होता व माझ्याकडे १६ रुपये परीक्षा फी नव्हती. मी माझ्या मामाला विनंती केली की, “तुम्ही माझी फी भरा.” ते मला म्हणाले की, “मी तुझी फी भरतो व तुझे पुर्ण शिक्षण करतो; पण एका अटीवर. तू माझ्या मुलीबरोबर लग्न करावे.” हे ऐकून मी त्यांना म्हणालो की, “मला पुढे शिक्षण घ्यावयाचे आहे,म्हणून मी लग्न करू शकत नाही.” त्यांनी माझी फी भरण्यास नकार दिला
मी “शांती दालमिल, जालना” येथे रात्रपाळीस १० दिवस काम केले व परीक्षा फी भरली.
मी इयत्ता दहावी (एस. एस. सी.) मध्ये जनता हायस्कूल, जालना येथे शिकत असताना १९६०-६१ या शैक्षणिक वर्षात आम्हाला त्या वेळेस बरेचसे ट्रेन्ड शिक्षक होते अर्थात B.A. B.ED., B.SC. B. ED., तर कोणी Senior Teacher’s Course केलेले. कारण त्यावेळेस B.ED.Colleges ची संख्या कमी होती. त्यावेळेस आम्हाला वरील शिक्षक विचारत असत की, S. S. C. नंतर तुम्ही कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जाणार आहात ?
कोणी म्हणत की, M. M. V. (मिलिंद महाविद्यालय), औरंगाबाद किंवा कोणी म्हणत V. M. V. (विदर्भ महाविद्यालय), अमरावती, तसेच मी ज्या एस.सी., एसटी वस्तीगृहात १९५८ पासून रहात होतो, त्यावेळेस आम्हास सीनियर विद्यार्थी मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद मध्ये वेगवेगळ्या शाखात शिक्षण घेत होते व ते अधून मधून वस्तीगृहात येत असत. त्यांच्याकडून मिलिंद कॉलेजबद्दल अधिक माहिती मिळत असे व ती विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगलीच महत्त्वाची होती.
अर्थात मी सुद्धा माझ्या मनाशी खूणगाठ बांधली होती की, आपण सुद्धा मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात एस. एस. सी. नंतर प्रवेश घेऊ. आणि त्यासाठी मी परिपूर्ण अशी तयारी सुद्धा केली होती. तो काळ १९६०-६१ चा होता. एस. एस.सी. ची परीक्षा मार्चमध्ये दिल्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात डॉ. वासवाणी ह्या (R. M. P.) डॉक्टरकडे मी ३० रुपये महिन्यावर कंपाऊंडर म्हणून काम करीत असे. त्या दोन महिन्यात मी कॉलेजसाठी कपडे व पुस्तकांसाठी थोडे पैसे जमा केले व एस. एस. सी. च्या निकालाची प्रतीक्षा करीत राहिलो.
जसा माझा एस. एस. सी. चा निकाल लागला तसा मी जालन्याहून औरंगाबादला दिनांक १५ जून १९६१ रोजी पोहोचलो. मिलिंद महाविद्यालयाची भव्य-दिव्य इमारत, खेळाचे प्रशस्त मैदान तसेच लुम्बिनी गार्डन बघून अक्षरशः दिपून गेलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या देखरेखीखाली बांधलेली ही भव्यदिव्य इमारत व बाबासाहेबांच्या पुष्पपदकमळांनी पावन झालेल्या नागसेन वनातील परिसराचे मनमोहक वातावरण मनाला प्रसन्न करीत होते आणि त्याचबरोबर प्रेरणाही देत होते. प्रवेश घेण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी मी त्या इमारतीच्या पायरीचे दर्शन घेतले व ” मी सुद्धा शिक्षण घेऊन मा-याच्या व मोक्याच्या जागा पटकावीण ” अशी मनाशी खुणगाठ बांधली. नंतर मी P. U. C. Science (Biology) मध्ये प्रवेश घेतला. माझी डॉ. होण्याची महत्त्वाकांक्षा होती, पण त्यावेळी आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला १६ रुपये डिसेक्शन बॉक्स घेण्यासाठी नव्हते. म्हणून मी त्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाचे आर्ट्सचे प्राचार्य श्री. एम. एन. वानखडे सरांना भेटून त्यांना माझ्या आर्थिक परिस्थितीची कल्पना दिली व त्यांनी मला पी. यू. सी. आर्ट्सला प्रवेश दिला. अर्थात मी त्यांच्याशी केलेले संभाषण इंग्लिशमध्ये होते व त्यांना ते आवडले सुद्धा होते असे त्यांच्या हसण्यावरून समजले.
मला पी. यू. सी. आर्ट्सला पुढीलप्रमाणे विषय होते–(१) Compulsory English, (२) Marathi – Second Language, (३) General Science, (४) Optional Subjects – Marathi, Civics and History. हे विषय शिकविण्यास प्रा. ताराशंकर सक्सेना, प्रा. डॉ. एस. एम. पिंगे, प्रा. गजमल माळी, प्रा. गेडाम, डॉ. पिशवीकर, प्रा.डॉ. इनामदार, प्रा. दाते, प्रा. जोशी असा प्राध्यापक वर्ग होता. सर्व प्राध्यापक मंडळी अतिशय हुशार होती व आम्ही नेहमीच त्यांच्या संपर्कात रहात असू. तसेच प्रा. प्रधान हे इतिहास शिकवीत असत.
इतिहास शिकविणारे प्राध्यापक प्रधान हे फार हुशार होते. आमची सहामाही परीक्षा झाली त्यावेळेस ते उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेऊन वर्गात आले व म्हणाले, ” This is your bundle of bundles” व त्यांनी उत्तर पत्रिका वाटण्यास सुरुवात केली. त्यावेळेस माझा रोल नंबर २१ होता व त्या इतिहासाच्या पेपरमध्ये मला १०० पैकी ७३ मार्क्स मिळाले होते. त्यांनी मी प्राप्त केलेल्या गुणांची प्रशंसा केली व ‘ फार चांगला पेपर आहे ‘ असे म्हणून माझी प्रशंसा केली व ‘ प्लीज कीप इट अप ‘ असे म्हणाले. त्यावेळी सर्वच विद्यार्थी माझ्याकडे आश्चर्याने पहात होते. मी नागरिकशास्त्र विषयात, इंग्रजी विषयात आणि इतरही सर्वच विषयात चांगले मार्क्स संपादन केले होते व माझी ख्याती हुशार विद्यार्थी म्हणून गणली जात होती. त्यावेळी इंग्रजी विषयाचे प्राध्यापक ताराशंकर सक्सेना यांनी मला स्टाफरूममध्ये बोलावून असे सांगितले की, ” आपण इंग्लिश लिटरेचर (इंग्लिश साहित्य) हा विषय बी. ए. फायनल पर्यंत घ्या, जेणेकरून त्याची व्याप्ती आणि महत्व भविष्यात जास्त राहील. ”
माझे नाव ‘ झाडू गोपाळा जाधव ‘ असे होते. सन् १९६७ ला मी एम. ए. ला असताना गॅझेटमध्ये नाव बदलून ‘ विनायक गोपाळा जाधव ‘ हे नाव धारण केले. कॉलेजमध्ये असताना मला मेरिट स्कॉलरशीप व शेड्युल्ड कास्ट स्कॉलरशीप सुद्धा मिळत होती. माझे बी. ए. ला इंग्लिश साहित्य, मानसशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय होते. मी बी. ए. तृतीय वर्षाला असताना कॉलेज असोसिएशनची निवडणूक लढविली होती. कॉलेज असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी म्हणून मी निवडून आलो व त्या कॉलेज असोसिएशनच्या अंतर्गत जेवढी काही मंडळे होती, त्यांचे सर्व कार्यक्रम आमच्या असोसिएशनच्या सहकार्याने होत असत. याच्याव्यतिरिक्त इंग्लिश वाङ्मय मंडळाचा सेक्रेटरी म्हणून माझी बिनविरोध निवड झाली होती.
दुसरा प्रसंग असा की, मी त्या वर्षात सर्वच वाद-विवाद स्पर्धांमध्ये भाग घेत असे. त्यावेळेला माझी व श्री. कुंदन येसांबरे यांची मिलिंद कला महाविद्यालयातर्फे निवड होऊन सिद्धार्थ कॉलेज, मुंबई च्या अंतर्गत ” डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ट्रॉफी ” साठी एक्सॅटेंपोर कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला व यशस्वी झालो.
त्यावेळचे आमचे वर्गमित्र-भगिनी खालीलप्रमाणे होते :–
डॉ. यशवंत मनोहर त्यावेळेस फक्त विद्यार्थी म्हणून होते. (त्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वेगवेगळ्या पदव्या व पदनामें मिळविली.), श्री. सुखराम हिवराळे, श्री. वामन निंबाळकर, श्री. योगीराज वाघमारे, डॉ. अरुणा लोखंडे, डॉ. के. एच. गंगावणे, डॉ. व्ही. डी. चंदनशिवे, माजी न्यायमूर्ती श्री. एस. एस. साबणे, प्रा. प्रभाकर शिरोळे, श्री. पी. एच. परदेशी, श्री. बाळाराम चौधरी, कु. शशीबाला सबरवाल, कु. रत्नमाला नामदेवराव वानखडे, श्री. बि-हाडे,ॲड. आर. आर. खरात, श्री. अशोक नवसागरे, श्री. व्ही. एल. इंगळे, श्री. वानखडे इत्यादी.
तसेच त्यावेळचे माझे समकालीन विद्यार्थी डॉ. बी. आर. कांबळे, डॉ. एन. डी. कांबळे, श्री. प्रभाकर बळवंतराव वराळे, श्री. आर. सी. नागोरी, श्री. टंडन, तसेच डॉ. ए. बी. हिरामणी, डॉ. बी. एस. म्हस्के, श्री. हरीश खंडेराव, प्रा. के. जी. येसांबरे, तसेच क्रिकेट क्षेत्रात खेळाचे मैदान गाजविणारे आमचे वर्गमित्र श्री.वामन बाबुराव शिंदे व श्री. पगारे ह्यांच्याव्यतिरिक्त इनडोअर गेममध्ये पारंगत असलेले आमचे वर्गमित्र व माजी न्यायाधीश श्री. एस. एस.साबणे, कु. शशीबाला सबरवाल, कु. रत्नमाला नामदेवराव वानखडे तसेच ज्योत्स्ना नामदेवराव वानखडे इत्यादी.
डाॅ. यशवंत मनोहर यांनी मिलिंद महाविद्यालयासंबंधीच्या त्यांच्या एका लेखात आमच्या मिलिंद महाविद्यालयातील विद्यार्थीदशेच्या कालखंडाचे वर्णन करताना ” मिलिंदचे सर्जनशील संग्रामपर्व ” असे यथार्थ वर्णन केले आहे. मी, माझे वर्गमित्र-भगिनी आणि समकालीन विद्यार्थी मिलिंद महाविद्यालयाच्या या सर्जनशील संग्रामपर्वाचा अविभाज्य घटक आहोत याचा मला सार्थ अभिमान आहे.
सन् १९६१ ते ६५ च्या काळात ६०/- रूपये मासिक शिष्यवृत्ती होती. त्यापैकी दरमहा ३०/- रूपये आम्हाला मिळत असत व उर्वरित वर्षाच्या शेवटी एकंदरीत रक्कम मिळत असे. मी सुभेदार अब्दुल्ला बेग यांच्या घरी रूम नंबर ५७५, गड्डीगुड्डुम, छावणी, औरंगाबाद येथे चार मित्रांबरोबर भाड्याने रहात असे. घरभाडे व खाण्यापिण्याचा खर्च आम्ही सर्वजण मिळून करत असू. तसेच व्यक्तिगत वस्तू स्वतः विकत घेत असू. माझ्या व्यतिरिक्त श्री. टी. एफ. चव्हाण, श्री. व्ही. के. गाडेकर, श्री. ए. बी. जाधव, श्री. बी. के. झोटे असे एकंदर पाच विद्यार्थी वरील खोलीत एकत्र रहात असू. आमची जेवण बनवण्यासाठी कामाची विभागणी असे. कुणी भाजी करीत असे तर कुणी चपात्या करीत असे. कुणी जेवण केलेली भांडी धूवत असे तर कुणी रेशन व इतर बाजारहाट करीत असे. म्हणजे विद्यार्थीदशेतच हाऊसकिपिंग ॲन्ड हाऊस मॅनेजमेंटचे धडे आम्हाला मिळत गेले असे म्हणावयास हरकत नाही. काटकसर करणे आम्हाला अपरिहार्य होते. कारण पैशांचा तुटवडा होता. प्रत्येक वर्षासाठी शेवटी फायनल रक्कम (स्काॅलरशीप) मिळत असे. त्यामध्ये आम्ही आई-वडिलांना किंवा नातेवाईकांना कपडेलत्ते घेऊन जात असू. त्यावेळेस महागाई एवढी नव्हती. ३०/- रूपये आम्हास पुरून उरत असत. विशेष म्हणजे भाड्याने रूम घेऊन एकत्रितपणे रहात असताना आम्ही सांघिक भावना जोपासत होतो, आपसात मित्रत्वाचे नाते जतन करीत होतो. साधारण जमाखर्चाचे ज्ञान मिळत होते.
आमच्यावेळेस आम्हाला Approved Hosteller असे संबोधण्यात आले होते, कारण विद्यार्थ्यांची संख्या जास्त व वसतिगृहांची संख्या कमी होती.
त्यावेळेस पाली भाषेचे प्रा. शांतीभद्र थेरा हे सिलोनवरून आले होते. आम्ही त्यांच्या सहाय्याने वाय. एम. बी. ए. (यंग मेन बुद्धीस्ट असोसिएट्स) ची स्थापना केली होती व तरूण मनात धम्माविषयीची ज्योत पेटविली होती. प्रत्येकाने धम्म प्रचार व धम्म प्रसाराचे कार्य जोमाने हाती घेतले होते.
आम्हाला प्रादेशिक भावना (रिजनॅलिझम) जास्त प्रखरतेने जाणवली. कारण काही विद्यार्थी विदर्भाचे होते तर काही मराठवाड्याचे होते. त्यांच्यात भेदभाव होत असे, परंतु ही संकुचित भावना होती असे वाटते. एकंदरीत सर्व विद्यार्थी आपल्या मनाशी खूणगाठ बांधत असत की, “आपणही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे खूप शिक्षण घेऊन मोठे व्हावे.” आणि “आपणही उच्च शिक्षण घेऊन, आयुष्यात मोठे होऊन, समाजासाठी खूप काही करावे” ही महत्वकांक्षा जतन करून अनवाणी पायाने, पायात पादत्राणे नसताना कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. तसेच अंगावर एकच ड्रेस असता तो रात्री स्वच्छ धुऊन, तांब्यात विस्तव भरून इस्त्री करून तोच ड्रेस दुसऱ्या दिवशी परिधान करणे क्रमप्राप्त होते, पण परिस्थितीची कधीच लाज धरली नाही.
वाचनालयात जी दुर्मिळ पुस्तके लवकर मिळत नसत त्या दुर्मिळ पुस्तकांसाठी काही विद्यार्थी सकाळी सर्वांच्या अगोदर नंबर लावून हवे ते पुस्तक वाचण्यासाठी घेत असत. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाठी चढाओढ दिसून येत असे, पण परिस्थितीचा बाऊ कोणी करीत नसे.
बी. ए. च्या परीक्षेत इंग्लिश साहित्यात विद्यापीठाच्या स्तरावर सर्वाधिक गुण मला मिळाल्यामुळे एम. ए. (इंग्लिश) प्रथम वर्षाला मेरिट स्कॉलरशिप मासिक ३००/- रुपये मला मिळत होती. मी १९६५ ते ६७ या शैक्षणिक वर्षात एम. ए. च्या वर्गात होतो.
त्यावेळेची सांस्कृतिक स्थिती फार चांगली होती. सर्व विद्यार्थी त्यावेळेच्या वातावरणात समरस होत होते. तसेच मिलिंद महाविद्यालयाची सांस्कृतिक स्थिती व धम्म याचे मोठे अधिष्ठान होते. चोहीकडे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा दिसत होत्या व विद्यार्थ्यांना प्रेरित करीत होत्या.
त्यावेळच्या शैक्षणिक स्थितीबद्दल अभिमानास्पद बाब म्हणजे विद्यापीठाच्या परीक्षेत सर्वच टाॅपर्स हे मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी असत.
राजकीय स्थितीबाबत खेदाने म्हणावे लागते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर आर. पी. आय. ची शकले झाली व वेगवेगळे राजकीय पक्ष स्थापन झाले, गटातटाचे राजकारण सुरू झाले. आताही तीच परिस्थिती आहे. सामाजिक चळवळ ही प्रेरणादायक होती. विद्यार्थी चळवळ सुद्धा खऱ्या अर्थाने ती चळवळ नव्हतीच पण ती मॅनेजमेंटला पूरक अशी होती.
मी दोन ठिकाणी शिक्षकाची नोकरी केली. एक जिल्हा परिषद, औरंगाबाद अंतर्गत बाजार सावंगी, खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद येथे काही महिने केलेल्या ह्या नोकरीची व्याप्ती औरंगाबाद पर्यंतच होती व ती जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात होती. ह्या नोकरीत असताना मला Divisional Selection Board, औरंगाबाद यांचा कॉल आला व माझी शिक्षकाच्या पदासाठी निवड झाली. तद्नंतर मी बाजार सावंगी येथील शिक्षकपदाच्या नोकरीचा राजीनामा दिला व परतुर, जिल्हा परभणी येथे माझी नियुक्ती झाली व ती नोकरी मी जून १९६८ पर्यंत केली व तद्नंतर त्या नोकरीचा राजीनामा देऊन मी मुंबईस प्रयाण केले.
मुंबईस प्रयाण करण्याचे कारण माझे आदरणीय प्रा. डॉ. जी. एस. लोखंडे यांनी मला माझ्या भावी पत्नीचे स्थळ सुचविले होते. सुशीला गंगाराम साळवी या सेंट्रल एक्साईजमध्ये केंद्रीय सरकारच्या खात्यात यू. डी. सी. म्हणून नोकरीस होत्या. मी मुंबईस गेलो व आम्ही एकमेकांना पाहून पसंती व्यक्त केली व आमचे लग्न दिनांक ०५/०५/१९६८ रोजी सेंट इलियास हायस्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, खार, मुंबई – ४०००५२ येथे झाले. आम्हा उभयतांना आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय प्रा. डॉ. जी. एस. लोखंडे आणि सौ.अरुणाताई लोखंडे सहकुटुंब उपस्थित होते. तसेच माझे परममित्र श्री. के. एच. गंगावणे व त्यांच्या मातोश्री मैनाबाई हरिभाऊ गंगावणे ह्यासुद्धा या विवाह सोहळ्यास उपस्थित होत्या व त्यांनी आम्हांस शुभाशीर्वाद दिले. मुंबईत आल्यानंतर मी माझे मोठे भाऊ कडुबा गोपाळा जाधव, छोटा भाऊ पांडुरंग गोपाळा जाधव व दोन मोठ्या बहिणींना त्यांच्या कुटुंबासह मुंबईला बोलावून घेतले. ते सर्वजण कांदिवली (पूर्व) येथे येऊन राहू लागले. नंतर ते सर्वजण स्थिरस्थावर झाले.
मुंबईत आल्यानंतर मी दोन शाळेत शिक्षकाची नोकरी केली. माझ्या धर्मपत्नीची इच्छा होती की, मी केंद्रीय सरकारच्या नोकरीत असावे. जेणेकरून भविष्यात आर्थिक सुबत्ता येईल, म्हणून मी यू. डी. सी. म्हणून केंद्रीय सरकारच्या नोकरीत (सेन्सस् ऑपरेशन गृहमंत्रालय) एक वर्ष होतो व नंतर मी असिस्टंट म्हणून ०८/१०/१९७१ कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या केंद्रीय सरकारच्या उद्यममध्ये होतो. मी जवळ जवळ ३० वर्ष नोकरी केली आणि ३०/११/२००० ला जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झालो. वरील नोकरीत असताना माझ्या कामाच्या कक्षा रुंदावत गेल्या व माझ्या सुप्तगुणांना चालना मिळाली. मी वेगवेगळ्या राज्यात कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब व महाराष्ट्र ह्या ठिकाणी नोकरी केली. माझी ज्या – ज्या वेळी वेगवेगळ्या राज्यात बदली होत होती, त्या – त्या वेळी माझी धर्मपत्नी आमच्या मुलांची शिक्षणाची काळजी घेत होती. अर्थात तिच्या केंद्रीय सरकारच्या नोकरीचा व्याप सांभाळून. कारण ती सुद्धा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (क्लास-1 अधिकारी) म्हणून नोकरीस होती.
विशेष म्हणजे फेब्रुवारी १९७८ मध्ये माझी पदोन्नती होऊन असिस्टंट मॅनेजर (क्लास-1 अधिकारी) म्हणून मी भटिंडा, पंजाब येथे रिपोर्ट केला; पण अतिशय थंडी असल्यामुळे मी सात दिवसात परत आलो. अर्थात, होमसिक होऊन व नंतर दोन ते तीन महिने मी सुट्टीवरच होतो व मला असे वाटत होते की, प्रमोशन न घेता रिव्हर्शन घ्यावे. म्हणजे बदलीचा प्रश्नच येणार नाही. मी अशा म:नस्थितीत असताना मला माझे त्यावेळेचे मित्र व सहकर्मी श्री. जी. एम. जाधव यांनी भावी प्रमोशनचे फायदे सांगितले. तसेच माझ्या पत्नीनेसुद्धा माझे मनोधैर्य वाढविले व दोन शब्द प्रोत्साहनाचे दिले व मला पंजाबला जाण्यासाठी प्रेरित केले. ती मला म्हणाली की, “आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी जात आहात व हेही दिवस जातील. मी माझी नोकरी व मुलांना सांभाळण्यास समर्थ आहे. याची तुम्ही चिंता करू नये.” या समजावण्यामुळे मी पुन्हा पंजाबला गेलो व तद्नंतर माझी १९८० ला बदली झाली.
मी जनरल मॅनेजरच्या पदावर असताना पाच वेळा श्री. टी. एस. आर. सुब्रमणियन या कॅबिनेट सेक्रेटरीच्या पदावर असलेल्या टॉपमोस्ट आय. ए. एस. अधिकाऱ्याचा महाराष्ट्र दौरा आखून व्यवस्थित पार पाडला व मी केलेल्या दौऱ्याच्या व्यवस्थेविषयी ते फार खूष झाले.
तामिळनाडूचे ३० एम. एल. ए. चे शिष्टमंडळ मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी त्यावेळी अरुण गुजराथी, सभापती, विधानसभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची भेट घेतली, तसेच अजिंठा, वेरूळ आणि औरंगाबाद या स्थळांनासुद्धा भेटी दिल्या. या सर्व दौऱ्याची व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. अर्थात, ती मी चांगल्या प्रकारे पार पाडली. त्यावेळचे चेअरमन कम मॅनेजिंग डायरेक्टर श्री. एम. बी. लाल यांना माझ्या कार्यक्षमतेवर फार विश्वास होता व तो मी सार्थ सिद्ध केला.
मी माझ्या ३० वर्षांच्या नोकरीच्या कालखंडात ३ आय. ए. एस. अधिकाऱ्यांबरोबर काम केले व २ चार्टर्ड अकाउंटंट अधिकाऱ्यांबरोबर काम केले. मला त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळाले. केवळ माझ्या कार्यक्षमतेमुळेच हे शक्य झाले आहे. असिस्टंटच्या पदावरून मी प्रमोट होत-होत जनरल मॅनेजरच्या पदापर्यंत पोहोचलो. त्या अधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे आहेत… (१) श्री. एन. एस. कुलकर्णी – आय. ए. एस. (१९७० ते १९८५), (२) श्री. एन. जयरामन – आय. ए. एस. (१९८५ ते ८७), (३) श्री. एस. के. अग्निहोत्री (१९८७ ते ८९), (४) श्री. एम. बी. लाल – सी. ए (१९८९ ते १९९९), (५) श्री. विश्वनाथ – सी.ए. (१९९९ ते २००१). हे सर्व अधिकारी चेअरमन कम मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे कार्यरत होते.
मी अजून सुद्धा १०/११/२००० पासून आज पर्यंत वेगवेगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत आहे. (वयाच्या ८० व्या वर्षी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशन येथे कार्यरत आहे.)
मी दिनांक ३०/११/२००० रोजी निवृत्त झालो तेव्हापासून आतापर्यंत जवळ जवळ २० वर्षापासून वेगवेगळ्या खात्यात, मोठ्या पदाची नोकरी करीत आलेलो आहे. (वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत.)
मी मुंबईला असताना, माझे वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी – कर्मचाऱ्यांबरोबर स्नेहसंबंध जुळले होते. त्यांच्या मुलामुलींच्या सोयीर – संबंधासाठी मी स्वतः मध्यस्थी केली होती. मी जवळ जवळ १५० सोयीरसंबंध जुळवून दिलेले आहेत व ते आजही गुण्या-गोविंदाने, सुखी व समाधानी जीवन जगत आहेत ही एक सामाजिक जबाबदारी व प्रतिबद्धता होय. कारण सोयीरसंबंध जोडण्यासाठी त्यावेळेस मॅरेज ब्युरो कोठेही अस्तित्वात नव्हते, जसे ते आज उपलब्ध आहेत. मी स्वतः जनरल मॅनेजर एच. आर. मुला आणि मुलींना नोक-या सुद्धा देत होतो व तसेच त्यांचे सोयीरसंबंध सुद्धा जुळविण्याचा प्रयत्न करीत असे.
मला आत्तापर्यंत दोन बौद्ध देशांना भेटी देण्याची संधी मिळाली. भारतीय प्रतिनिधी म्हणून “वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट” (दी डब्ल्यू. एफ. बी.) या संस्थेच्या वतीने २०१३ मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थायलंड या देशात बुद्धिस्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्सला मी हजर राहिलो. माझ्याबरोबर प्रतिनिधी म्हणून आदरणीय भदन्त राहुल बोधी, मा. रामदासजी आठवले, मी (विनायक गोपाळा जाधव), श्री. विठ्ठलराव सोनवणे, ॲड. रत्नाकर खरात, औरंगाबाद आणि ॲड. गायकवाड तसेच आर. पी. आय. चे कार्यकर्ते श्री.
महेश खरे, श्री. बारसिंग हे होते. त्यादरम्यान आम्ही बँकॉक शहर आणि पटाया शहर व बौद्ध धम्मस्थळे पाहिली. तसेच तेथून आम्ही श्रीलंकेला (कोलंबोला) प्रयाण केले. श्रीलंकेत आम्ही कोलंबो आणि कॅंडी ही शहरे व तेथील धम्मस्थळे पाहिली. विशेष म्हणजे मी त्या शिष्टमंडळाचा प्रवक्ता होतो.
याव्यतिरिक्त मी खालील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिक संस्थांशी निगडित होतो व आहे….
(१) अध्यक्ष – सम्राट अशोक बहुउद्देशीय समाजसेवा मंडळ, सिंदखेडराजा, जि. बुलढाणा. ,
(२) आजीव सभासद – पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक मंडळ, अंधेरी, मुंबई. ,
(३) माजी जनरल सेक्रेटरी – ऑल इंडिया एस. सी. / एस. टी. / ओ. बी. सी. ऑफिसर्स असोसिएशन, मुंबई. ,
(४) माजी अध्यक्ष – कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एम्प्लॉईज युनियन, मुंबई. ,
(५) माजी पी. आर. ओ. – लायन्स क्लब ऑफ भटिंडा, फोर्ट डिस्ट्रिक्ट, ३२१ एफ, भटिंडा, पंजाब. ,
(६) माजी डिव्हिजनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी मेंबर, नाॅर्दन रेल्वे, अंबाला, हिमाचल प्रदेश. ,
(७) माजी जनरल सेक्रेटरी – वर्सोवा वेल्फेअर सिनियर सिटिझन्स असोसिएशन, अंधेरी, मुंबई. ,
(८) दिनांक २९-०५-२०१६ रोजी औरंगाबाद येथे नागसेनवन मिलिंदीयन माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित केले होते, ज्यामध्ये १९५० ते २०१० पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यामध्ये श्री. सुखदेव थोरात (माजी चेअरमन, यू. जी. सी. कमिशन, नवी दिल्ली.) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच श्री. बी. ए. चोपडे (व्हाईस चान्सलर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) हे ही त्यांच्या समवेत उपस्थित होते. तसेच श्री. बबनराव कांबळे (सम्राट वृत्तपत्राचे संपादक, मुंबई.) हे ही उपस्थित होते. हा कार्यक्रम स्तुत्य झाला व सर्वांनी त्याची प्रशंसा केली.
आम्हा उभयतांना खालील अपत्ये व नातवंडे आहेत :
एक मुलगा – देवेंद्र विनायक जाधव, जेट विमान कंपनी (सांताक्रुझ एअरपोर्ट, मुंबई) मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. त्याची धर्मपत्नी सौ. मंगला देवेंद्र जाधव ही मेफेअर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०००५३ येथे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. त्यांना दोन सुकन्या आहेत. त्यांची नावे – पहिली सुकन्या – कनिष्का, वय 21 वर्ष, ही गव्हरमेंट लॉ-कॉलेज, चर्चगेट, मुंबई येथे (बी. एल. एस. एल एल. बी च्या दुसऱ्या वर्गात) शिकत आहे. हा पाच वर्षाचा लॉ कोर्स आहे.
दुसरी सुकन्या – मिहिका, वय 12 वर्ष, मिहिका देवेंद्र जाधव ही उत्पल संघवी विद्यालय, जुहू , मुंबई- ४०००४९ या शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे.
दुसरी मुलगी कविता अभिजीत पाठारे ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, खारघर, नवी मुंबई ह्या केंद्रीय शिक्षण संस्थेत असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. तिचे पती श्री. अभिजीत रत्नाकर पाठारे हे पी. पी. सी. मॅनेजर म्हणून प्रायव्हेट के. जी. के. कंपनी मध्ये चायना येथे कार्यरत आहेत. त्यांना एक मुलगी समृद्धी (वय १८ वर्ष) इयत्ता बारावीची परीक्षा ८५ % गुणांनी पास झाली असून मानसशास्त्र या विषयात एम. ए. करण्याचा तिचा मानस आहे.
मुलगा दिव्यांश अभिजीत पठारे (वय बारा वर्ष) इयत्ता सातवीच्या वर्गात विग्नोर हायस्कूल, ऐरोली, नवी मुंबई येथे शिकत आहे.
तिसरी मुलगी माधवी सुजित पाठारे, फॅशन डिझायनर / काॅस्ट्युम डिझायनर म्हणून कार्यरत आहे. तिने मराठी चित्रपट सृष्टीत सुद्धा कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम केले आहे. तिचा नुकताच मराठी चित्रपट, “डोक्याला शॉट” हा नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये तिने कोस्ट्युम डिझायनर म्हणून काम केले आहे व तो चित्रपट श्री. मिलिंद उके यांनी दिग्दर्शित केला आहे. तिचे पती श्री. सुजित रत्नाकर पाठारे हे मल्टिनॅशनल प्रायव्हेट कंपनीमध्ये इंटरनॅशनल मार्केटिंग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गौतमी सूजित पाठारे, ( वय १७ वर्ष ) नावाची मुलगी आहे. तिने ११ वीची परीक्षा दिली आहे व ती आता भवन्स कॉलेज, अंधेरी, मुंबई – ४०००५३ येथे शिकत आहे.
मी सामाजिक बांधिलकी जतन करतो. समाजसेवा करणे हा माझा मनोदय आहे. त्या अनुषंगाने समाजकार्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
व्ही. जी. जाधव
मोबाईल क्र. ९९२०१०४०७९
More Stories
पुढील पिढी बौद्ध का घडत नाही ?
बुध्द विहार आचारसंहिता… Adv Shankar Sagore.
तथागताचे अंतिम भोजन – राहुल खरे