November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

” आठवणीतील मिलिंद महाविद्यालय ” – प्रा. डॉ. कमलाकर गंगावणे

  आयु. करूण भगत (नागपूर) आणि आयु. व्ही. जी. जाधव (मुंबई) या मित्रद्वयांनी मैत्रीभावनेतून आग्रह केला की, संस्थापक्ष अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई द्वारा संचालित मिलिंद महाविद्यालय, नागसेनवन, औरंगाबाद येथे शिक्षण घेताना विद्यार्थी म्हणून किती वर्षाचा कालावधी घालविला ? त्या कालावधीत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व राजकीय कार्यक्रमात सहभाग घेतला असेल ते, तसेच विद्यार्थी म्हणून आलेले अनुभव लेखस्वरूपात शब्दबद्ध करावेत.
मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच्या आठवणी आणि माझे अनुभव माझ्या या मित्रद्वयांच्या आग्रहाखातर शब्दबद्ध करीत आहे.
मी शैक्षणिक वर्ष १९६१ – ६२ ला मिलिंद महाविद्यालयात प्री. यूनिवर्सिटी कोर्स (पी. यू. सी.) ला कला वर्गात प्रवेश घेतला. ५९ – ६० वर्षापूर्वीच्या आठवणी लिहिणे म्हणजे पुन्हा एकदा त्या भारावलेल्या अतीत काळाचे स्मरण करणे अपरिहार्य होय. अतीत काळाचे स्मरण करण्याची संधी उपरोल्लिखित मित्रद्वयांच्या आग्रहामुळे मला मिळाली, त्यास्तव मी त्यांचा ऋणी आहे.
मिलिंद महाविद्यालयातील विद्यार्थी जीवन शब्दबद्ध करणे ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद तर आहेच, शिवाय ती माझे मन प्रसन्न करणारी आणि आनंददायीही आहे. तेव्हा त्या अनुषंगाने काही आठवणी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे.
मी अशा विद्यार्थ्यांपैकी एक आहे, ज्यांनी मिलिंद महाविद्यालयात पी. यू. सी. ते बी. ए. पदवी पर्यंतचे चार वर्षे शिक्षण घेतले व पी. ई. सोसायटी द्वारा संचालित विद्यालय, महाविद्यालयांच्या कला, विज्ञान, वाणिज्य व विधी विद्याशाखेत नोकरी करण्याची संधी मिळाली. तशीच संधी मलाही मिळाली. १९७१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात माझी अधिव्याख्याता व अध्यक्ष, हिंदी विभाग या पदावर नेमणूक झाली. मी तेथे १९७१ ते १९८५ पर्यंत म्हणजे १५ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर १९८५ साली माझी मराठवाडा विद्यापीठ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), हिंदी विभागात अधिव्याख्याता पदावर नेमणूक झाली. या विभागातून मी प्राध्यापक व अध्यक्ष पदावर निरंतर सेवा देऊन १९९८ ला सेवानिवृत्त झालो. मी माझ्या जीवनात जी प्रगती केली व पद-प्रतिष्ठा मिळविली त्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळालेल्या प्रेरणेला तसेच मिलिंद महाविद्यालयाच्या प्राध्यापकवृंदांच्या अध्यापन कौशल्यास आणि त्यांच्या संस्कारक्षमतेस देतो.

मी मिलिंद महाविद्यालयात कसा पोहोचलो याचे विवरण-विवेचन करणे म्हणजे मला माझी स्थिती-गती सांगणे आवश्यक आहे असे वाटते.

माझे वडिलोपार्जित वतनाचे मूळ गाव फुलंब्री. ते जगप्रसिद्ध बुद्ध लेणी-अजिंठा (अजिंठा, औरंगाबाद) रोडवर २२ किलोमीटर अंतरावर फुलमस्ता नदीकिनारी वसलेले आहे. माझ्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. कुटुंबात आम्ही तीन भाऊ कचरू, कडुबा उर्फ कमलाकर (मी स्वतः) व लक्ष्मण आणि एक बहीण दगडाबाई. आईने सांगितले होते, दगडाबाईचे बालपणीच लग्न झाले होते व ती सासरी गेली होती. मोठा भाऊ सहा वर्षाचा, मी तीन वर्षाचा आणि लहान भाऊ तीन महिन्याचा असताना वडिलांचे कृपाछत्र नियतीने हिरावून घेतले. वडिलांना सख्खे भाऊ-बहीण नव्हते. वाड्यातील भाऊबंद उपेक्षा व तिरस्कार करीत, भांडण करीत व त्रास देत. मामांचे सहकार्य व सल्ल्यामुळे आई आम्हाला घेऊन येथेच राहिली. तिने मोळीफाटा-गवतगुळी करून आम्हा भावंडांना जगविले. आम्ही तिघा भावांनी भीक मागितली कारण उपाशी पोटी राहवत नसे. काही ब्राह्मणांच्या व शिक्षकांच्या घरी सडा-सारवणासाठी गाडीतळावरून शेण गोळा करून नेऊन दिले. मिळालेल्या उष्ट्या-पाष्ट्या, शिळ्या-पाक्या अन्नावर दिवस काढले. किशोर वयातच दररोज सकाळी पोस्टमास्तर गुलाम गौस खान यांच्या घरी झाड-लोट व पाणी भरण्याचे काम केले. आईबरोबर शाळेच्या सुट्ट्यांच्या दिवशी वर्किंग खोदण्याचे, डागा शुगर मिलमध्ये रात्रपाळीचे, स्टोन क्रशरवर दगड-खडी उचलली, अशी परिस्थितीवश अनेक कामे केली.

फुलंब्रीत तीन वेशी आहेत. वेशीच्या जवळ आजही महारवाडा (बुद्ध धॅम्म अनुयायांची) वस्ती आहे. येथील लोकांची आडनावे गंगावणे, सोनवणे, घाटे, घाटेशाई, प्रधान, मोरे, हिवराळे इत्यादी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ” शिका ” या आवाहनाने प्रेरित होऊन पालकांनी आपापल्या पाल्यांना शाळेत घातले. आईने सांगितले होते की, तुम्हा दोघा भावांना मुक्तेश्वर साळवे गुरुजींनी शाळेत दाखल केले. प्रवेश अर्जात दोघांच्या जन्मतारखा अंदाजाने लिहिल्या आहेत. जन्मतारखा सत्य नाहीत, त्यामुळे माझे मोठे भाऊ आयुमानाने माझ्यापेक्षा लहान झाले. त्या नोंदींमुळे आमचा काही फायदा झाला तसेच नुकसानही झाले.

फुलंब्रीचे प्रारंभीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी एस् . टी. प्रधान, जे. डी. मोरे होत व नंतर बी. बी. प्रधान. एस. टी. प्रधानने एम. ए. इंग्रजी विषयात केले. बी. बी. प्रधानने अर्थशास्त्रात एम. ए. केले आणि दोघेही मिलिंद महाविद्यालयात आपापल्या विषयात अधिव्याख्याता पदावर नोकरी करीत होते. फुलंब्री येथील आपल्या नातलगांपैकी प्रधान बंधूंना मिलिंद महाविद्यालयात नोकरीची संधी मिळाली, तशीच मलाही संधी मिळावी अशी उत्कट इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याचा मी दृढनिश्चय केला.

शैक्षणिक वर्ष १९६०-६१ मध्ये मी एच. एस्. सी. उत्तीर्ण झालो. नोकरी मिळविण्याच्या हेतूने एम्प्लाॅयमेंट एक्सचेंज कार्यालयात नाव नोंदणी केली. अगोदर मी भडकल गेट येथे एस्. टी. प्रधान यांच्या घरी गेलो. त्यांना माझे त्यांच्याकडे येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यांच्याबरोबर मी मिलिंद महाविद्यालयात आलो. भव्य – दिव्य बौद्धशिल्प असलेली इमारत दुरूनच दिसली. मन प्रफुल्लित झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या देखरेखीखाली तयार झालेल्या आणि त्यांच्या पावन पदस्पर्शाने पुणीत झालेल्या इमारतीच्या पहिल्या पायरीवर विनम्रपणे डोळे मिटून, डोके ठेवून वंदन केले. १०६१ – ६२ या शैक्षणिक वर्षी मी पी. यू. सी. (कला) या वर्गात प्रवेश घेतला. तसेच महाविद्यालयाच्या “अजिंठा ” वसतिगृहातही प्रवेश घेतला. मी अजिंठा वसतिगृहाच्या रूम नंबर २२ मध्ये राहिलो. माझे स्नेहसंबंध योगीराज वाघमारे, धनराज जावळे, प्रल्हाद गायकवाड व पुरणलाल परदेशी यांच्याशी जुळले आणि पुढे दृढ झाले. आम्ही सर्वजण बंधुभावाने रहात असू . अभ्यास करण्यास एकमेकांस प्रेरित करीत असू , परस्पर साह्य करीत असू . आम्ही सर्वजण पी. यू. सी. (कला) वर्गाची परीक्षा मार्च-एप्रिल १९६२ ला उत्तीर्ण झालो.

मी शैक्षणिक वर्ष १९६२-६३ ला बी. ए. प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. त्याच दरम्यान मला नोकरीची संधी मिळाली. मी जुबेदा बेगमचा वाडा, भडकल गेट, काजी वाडा येथे ( प्रा. एस्. टी. प्रधान यांच्या घराजवळच ) किरायाने रूम घेतली. त्यानंतर आई आणि धाकटा भाऊ लक्ष्मणला औरंगाबाद येथे घेऊन आलो. मोठे भाऊ जिल्हा परिषद शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक पदावर बाहेरगावी नोकरीस लागले होते. ते विवाहित होते व त्यांनी शिक्षण सोडले होते. मी लक्ष्मणला पी. ई. सोसायटीच्या मिलिंद मल्टीपरपज हायस्कूल मध्ये आठव्या वर्गात दाखल केले.

बी. ए. प्रथम वर्ष वर्गात शिकत असतानाच मी क्रांतीचौक (काळा चबूतरा), जालना रोड, पाण्याच्या टाकीमागे, रमा नगर (भूतखड्डा) येथे सोरबाजी जाधव यांच्याकडून रु. २५/- प्रमाणे वार्षिक भाड्याने २५ × ३० फुटाचे दोन प्लॉट घेतले. त्यांच्या सूचनेप्रमाणे झोपडी तयार केली. आई व भावासह त्या झोपड्यात येऊन राहिलो. त्यावेळी रमा नगरात कोणत्याच नागरी सुख-सोयी नव्हत्या. अतिक्रमण करून झोपडपट्टी वसविली आहे अशी लोकांची धारणा होती व नगर परिषदेने नागरी सुख-सोयी निर्माण केल्या नव्हत्या. काही दिवसातच मी माती-भेंड्याची आठ पत्र्यांची एक खोली बांधली व समोर छप्पर केले. कालांतराने पुन्हा आठ-आठ पत्र्यांच्या दोन खोल्या बांधल्या. येथे राहूनच मी चिमणी-कंदिलाच्या प्रकाशात एम. ए. (हिंदी) पदवीपर्यंतचा अभ्यास केला.

बी. ए. पदवीचा अभ्यासक्रम तीन वर्षांचा होता. मी शैक्षणिक वर्ष १९६२-६३ बी. ए. (प्रथम वर्ष), १९६३-६४ बी. ए. (द्वितीय वर्ष) व १९६४-६५ बी. ए. (तृतीय वर्ष) चे शिक्षण पूर्ण केले. बी. ए. अंतिम वर्षाची परीक्षा मी मार्च-एप्रिल १९६५ ला उत्तीर्ण होऊन पदवीधर झालो. या तिन्ही वर्षात मी महाविद्यालयात नियमित विद्यार्थी होतो. परंतु सर्वच तासिकांना मी उपस्थित रहात नव्हतो, कारण मी वेगवेगळ्या कार्यालयात नियमित नोकरी करीत होतो. एकाच वेळी ‘ लर्निंग ‘ आणि ‘अर्निंग ‘ करण्याचा माझा प्रयत्न होता. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मी लॅबोरेटरी असिस्टंट पदावर एक वर्ष नोकरी केली, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘ लिव्ह व्हेकंसी ‘ वर तीन महिने ज्युनिअर क्लर्क पदावर मी काम केले. जिल्हा परिषद कार्यालयात ‘ऑफिस असिस्टंट ‘ पदावर काम केले. त्यानंतर तेथेच ज्युनियर क्लर्क पदावर कार्यरत राहिलो. बी. ए. पदवीधर झाल्यावर ‘ सिनिअर क्लर्क ‘ पदावर काम केले. क्लर्कचे काम करण्यात मला मानसिक समाधान मिळत नव्हते. नंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने माझी १९६६ ला सी. पी. एस्. कम हायस्कूल ( केंद्रीय प्राथमिक शाळा कम हायस्कूल) अंधारी, ता. सिल्लोड येथे शिक्षक पदावर नेमणूक केली. तेथे मी सेवेत रुजू झालो. क्लर्कच्या तुलनेत शिक्षकाची नोकरी मला सोयीची वाटली. दोन-तीन महिन्यातच प्रा. आर. कृण्णमूर्ती यांच्या सहकार्याने व शिफारशीने माझी प्रतिनियुक्ती सी. पी. एस्. कम हायस्कूल, फुलंब्री येथे झाली. माझी जन्मभूमी असलेली फुलंब्री आता माझी कर्मभूमी झाली. येथून माझी बी. एड. पदवीच्या प्रशिक्षणासाठी शासकीय अध्यापक महाविद्यालय, औरंगाबाद येथे प्रतिनियुक्ती झाली. बी. एड. पदवीचा अभ्यासक्रम एका वर्षाचा होता. १९६८-६९ या शैक्षणिक वर्षी मी बी. एड. च्या परिक्षेत उत्तीर्ण झालो. प्रशिक्षणानंतर माझी नेमणूक पुन्हा फुलंब्री येथेच झाली. १९६९-७० ला मी एम. एड. केले. एम. एड. पदवीचा अभ्यासक्रमही एकाच वर्षाचा होता. १९७० ला फुलंब्री येथून बदलून जिल्हा परिषद हायस्कूल, चेलीपुरा, औरंगाबाद येथे मी नियुक्त झालो. १९७१ या वर्षी मला सुवर्णसंधी लाभली. माझी उत्कट इच्छा, महत्त्वाकांक्षा फलद्रूप झाली आणि पी. ई. सोसायटी द्वारे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाने माझी हिंदी भाषा व साहित्याचा अधिव्याख्याता या पदावर नियुक्ती केली. मी कार्यरत असलेल्या शाळेत एका महिन्याचे वेतन मुख्याध्यापकांच्या कार्यालयात जमा केले व राजीनामा सादर केला आणि त्वरित महाविद्यालयाच्या सेवेत रुजू झालो.

महाविद्यालयाच्या सेवेत राहूनच मी पी. एच. डी. (हिंदी) पदवीसाठी १९७३ साली नोंदणी केली. अहिंदी भाषी प्रसिद्ध हिंदी लेखक डाॅ. रांगेय राघव यांच्या कथा साहित्यावर ” कथाकार रांगेय राघव ” या शीर्षकाचा शोधप्रबंध मराठवाडा विद्यापीठात (डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात) १९७९ साली पी. एच. डी. (हिंदी) पदवीसाठी मी सादर केला व तो स्वीकृत झाला. मी पी. एच. डी. (हिंदी) पदवी प्राप्त केली.

माझ्या नोकऱ्या धर-सोडण्याचे कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने शिक्षणाची लागलेली आंतरिक ओढ हे होते. डाॅ. बाबासाहेबांनी समग्र भारतीयांना प्रामुख्याने दलित, वंचित, भटके-विमुक्त आणि बहुजनांना आवाहन केले होते की, ” शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ” डाॅ. बाबासाहेबांची ” शिका ” ही संकल्पना अति व्यापक असून समाजहिताच्या दृष्टीने उपयुक्त आहे. त्यांना अभिप्रेत होते की, समाजातील सर्व लोकांनी उच्चशिक्षित व्हावे, शासन-प्रशासनातील मोक्याच्या व माऱ्याच्या जागा पटकवाव्यात आणि प्राप्त अधिकारांचा उपयोग समाज उत्थानासाठी, समाजसेवेसाठी करावा. शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होणे आणि त्याचबरोबर मानवी मूल्यसंवर्धनासाठी सद्हेतूने व प्रामाणिकपणे कार्य करीत रहाणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे. भारतीय समाजव्यवस्थेचा विचार करता निदान प्रत्येक दलित, वंचित, भटके-विमुक्त, बहुजन समाजातील व्यक्तीने आपले हे आद्य कर्तव्य पार पाडून समाजोन्नतीसाठी, समाजाच्या उत्थानासाठी आजन्म कार्यरत रहाणे अत्यावश्यक आहे.

बी. ए. (प्रथम वर्ष) व (द्वितीय वर्ष) वर्गात २ अनिवार्य विषयांचा तर ३ ऐच्छिक विषयांचा अभ्यास केला. अनिवार्य विषय इंग्रजी व मराठी होते. ऐच्छिक विषय मराठी, राज्यशास्त्र व मानसशास्त्र होते. बी. ए. प्रथम वर्ष वर्गात निवडलेल्या ऐच्छिक विषयांचा अभ्यास तृतीय वर्षापर्यंत करावा लागे. तृतीय वर्षात केवळ तीन ऐच्छिक विषयांचा अभ्यासक्रम असे. अनिवार्य विषय इंग्रजीचे अध्यापन प्रा. ताराशंकर सक्सेना, प्रा. एस्. टी. प्रधान, प्रा. पी. एस्. देशपांडे व प्रा. निहलानी यांनी केले. अनिवार्य मराठी व ऐच्छिक मराठी विषय प्रा. भालचंद्र फडके, प्रा. डॉ. श्री. म. पिंगे, प्रा. गजमल माळी, प्रा. ल. बा. रायमाने यांनी शिकविला. मानसशास्त्राचे अध्यापन प्रा. कमल पाटील, प्रा. वळंजू, प्रा. आर. कृष्णमूर्ती यांनी केले. राज्यशास्त्र विषय प्रा. जी. एस्. लोखंडे व प्रा. एस्. के. एस्. नाथन यांनी शिकविला. प्राध्यापकवृंद आपापल्या विषयाचे अध्यापन सर्रास व्याख्यान पद्धतीने करीत. श्यामपटावर (फलकावर / ब्लॅकबोर्डवर) मुद्दे लिहीत. प्रत्येकाची विषयाचे विवेचन-विश्लेषण करण्याची शैली वैशिष्ट्यपूर्ण असे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन सोप्या पद्धतीने होत असे.

बी. ए. प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष वर्गात फार हुशार विद्यार्थ्यांत व्ही. जी. जाधव, योगीराज वाघमारे, सुखराम हिवराळे, यशवंत मनोहर यांची ख्याती होती.

मी त्यांच्याशी मैत्री केली. व्ही. जी. जाधव यांनी मला मानसशास्त्र विषयाची विषयवस्तू समजावून सांगितली. योगीराज वाघमारे यांच्या बरोबर राज्यशास्त्र विषयासंबंधाने चर्चा केली. सुखराम हिवराळे आणि यशवंत मनोहर यांनी मराठी भाषा व साहित्याची ओळख करून दिली. त्यांच्या मदत व सहकार्याचे विस्मरण होणे शक्य नाही. सुखराम हिवराळे आता या जगात नाहीत. आजही मी जाधव, वाघमारे व मनोहर यांच्या संपर्कात आहे. दूरभाष्याद्वारे त्यांच्याशी संवाद होतो, त्याचे समाधान आहे.

वर्ग बंधू सुखराम हिवराळे, योगीराज वाघमारे, यशवंत मनोहर व वामन निंबाळकर यांना मराठी साहित्याची गोडी तर होतीच, ते स्वतः साहित्य सर्जक होते. त्यांचे लेखन विविध पत्र-पत्रिकेत व दिवाळी अंकात प्रसिद्ध होत होते. सुखराम हिवराळे दैनिक अजिंठा मध्ये सहसंपादक होते. मी त्यांच्या स्नेह-सान्निध्याचा लाभ घेतला. त्यांच्याबरोबर होणाऱ्या साहित्यिक गप्पा-गोष्टीतून माझ्या मनातही लेखन करण्याची ऊर्मी निर्माण झाली. मी दोन-चार कथा लिहिण्याचा प्रयत्न केला. प्रा. रायमाने सरांच्या मार्गदर्शनानुसार १९६३ साली महाविद्यालयात ” मिलिंद पाक्षिक ” नावाचे नियतकालिक हस्तलिखित स्वरूपात सुरू करण्यात आले. ” मिलिंद पाक्षिक ” हस्तलिखितात माझ्या ‘ डाव ‘ शीर्षकाच्या कथेस जागा मिळाली. ‘ डाव ‘ ही कथा कॉलेज मॅगझिनच्या मार्च-एप्रिल १९६४ च्या अंकात सुद्धा छापण्यात आली होती. ” मिलिंद पाक्षिक ” हस्तलिखिताचा उपक्रम मिलिंद संस्कृतीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे असे मला वाटते. उल्लेखित वर्ग बंधू यशवंत मनोहर व योगीराज वाघमारे यांनी प्रारंभी मिलिंद पाक्षिक हस्तलिखितात लेखन केले एवढेच नव्हे तर संपादनही केले आहे. ते आज मराठी सारस्वतातील प्रथितयशसंपन्न व प्रतिष्ठित, ख्यातकीर्त कवी आणि कथाकार आहेत.

ज्या ज्या कार्यालयात मी नोकरी केली, तेथील माझ्या वरिष्ठांना मी महाविद्यालयात शिक्षण घेतोय हे आणि ज्या ज्या प्राध्यापकांनी मला शिकविले त्यांना मी नोकरी करतोय हे सांगितले. त्यांनी मला माझ्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. अधिकाऱ्यांनी वर्गात उपस्थित राहण्याची सवलत दिली. प्राध्यापकवृंदांनी विषयाच्या नोट्स, टिपणे व ग्रंथ अभ्यासासाठी उपलब्ध करून दिले.

ज्या ज्या प्राध्यापकांनी मला शिकविले, त्या त्या प्राध्यापकांच्या घरी मी जात असे. त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीय सदस्यांबरोबर जिव्हाळा निर्माण झाला. त्यात प्रामुख्याने राज्यशास्त्राचे प्रा. जी. एस्. लोखंडे, मानसशास्त्राचे प्रा. आर. कृष्णमूर्ती, इंग्रजीचे प्रा. एस्. टी. प्रधान व मराठीचे प्रा. ल. बा. रायमाने होत.

माझ्या मंगल परिणय समारंभ प्रसंगी प्रा. जी. एस्. लोखंडे व त्यांच्या सुविद्य पत्नी अरुणा लोखंडे, प्रा. एस्. टी. प्रधान व त्यांच्या सुविद्य पत्नी सुमन प्रधान आवर्जून उपस्थित होते. तसेच प्रा. आर. कृष्णमूर्ती बाहेरगावी गेले होते म्हणून त्यांनी आपले प्रतिनिधीत्व करण्यासाठी आवर्जून आपल्या दोन सुकन्या राधा व जयंती यांना लग्नात उपस्थित राहण्यासाठी पाठविले होते. तसेच माझे मित्र व्ही.जी. जाधव सुद्धा उपस्थित होते. अरुणा लोखंडे माझ्या वर्ग भगिनी, त्यांनी मला भाऊ मानलेले आणि मी त्यांना बहिण. आजही आम्ही भाऊ-बहिण एकमेकांचे हितैशी आहोत आणि परस्पर हितसंवर्धनाची मंगल कामना करतो. मी कार्यरत असलेल्या महाविद्यालयातच हिंदी विभागात त्यांची १९७२-७३ साली अधिव्याख्याता पदावर नियुक्ती झाली. तेथे आम्ही दोघे सहयोगी व सहकर्मी झालो. आम्हा दोघात वैचारिक समन्वय व सामंजस्य राहिले आहे. आजही आम्ही भाऊ-बहिणीचे नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करतोय.

मिलिंद महाविद्यालयाचा प्राध्यापकवृंद आम्हा विद्यार्थ्यांना केवळ शिकवतच नव्हता तर यशस्वी, सम्यक-समुचित जीवन कसे जगता येईल याचा, पालकत्वाचा व मार्गदर्शकत्वाचा, उत्तरदायित्वाचा सफल निर्वाह करीत होते. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलिंद महाविद्यालयात अध्यापन करीत आहोत याचा त्यांना कधीच विसर पडला नव्हता असे मला वाटते.

एम. ए. पदवीचा अभ्यासक्रम दोन वर्षाचा होता. मी शैक्षणिक वर्ष १९६५-६६ साली एम. ए. (हिंदी) प्रथम वर्ष वर्गात प्रवेश घेतला व परीक्षेत उत्तीर्ण झालो. १९६६-६७ साली एम. ए. (हिंदी) द्वितीय वर्ष वर्गात प्रवेश घेतला. या दोन वर्षात शिक्षण घेताना विद्यापीठात जाता-येता माझी पाऊले मिलिंद महाविद्यालय, नागसेनवन परिसराकडे वळत. कारण तेथील प्राध्यापकवृंदाबरोबर असलेला अनुबंध. डॉ. म. ना. वानखेडे यांनी मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची सूत्रे दुसऱ्यांना १९६६ साली आपल्या हाती घेतली आणि साहित्य-संस्कृती संवर्धनाच्या हेतूने अनेक उपक्रम सुरू केले. त्यांनी बुद्धीस्ट सेंटर, मिलिंद मासिक पत्रिका, मिलिंद हस्तलिखित, मिलिंद मॅगझीन, बुद्धीस्ट सेंटरचे ” बोधिसत्व ” मासिक या उपक्रमांच्या माध्यमाने मिलिंद कला महाविद्यालयातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीची पायाभरणी केली. प्राचार्य डॉ. म. ना. वानखडे यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील महत्त्वाच्या दोन घटना आहेत. (१) ” मिलिंद साहित्य परिषद ” आणि (२) ” अस्मिता ” त्रैमासिकाची सुरुवात. या सर्व उपक्रमांची माहिती प्रा. एस्. टी. प्रधान, प्रा. जी. एस्. लोखंडे, प्रा. एल. बी. रायमाने यांच्याकडून मिळत असे. तसेच विद्यार्थी मित्र सुखराम हिवराळे व वामन निंबाळकर यांच्या बरोबर होणाऱ्या गप्पा-गोष्टीतून मिळत असे. मी प्रत्यक्ष नाही परंतु परोक्षपणे या साहित्यिक-सांस्कृतिक चळवळीची जिज्ञासेतून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत असे, हे विनम्रपणे नमूद करतो.

१९६६ साली जिल्हा परिषद शिक्षण विभागाने माझी नियुक्ती पदवीधर शिक्षक पदावर सी. पी. एस्. कम हायस्कूल (केंद्रीय प्राथमिक शाळा कम हायस्कूल), अंधारी, तालुका सिल्लोड येथे केली . अंधारी ते औरंगाबादचे अंतर ४५-५० किलोमीटर आडवळणाला आहे. या शाळेत मी सेवेत रुजू झालो, शिक्षकी पेशात रमलो. परंतु खेद होता की, आपलं एम. ए. पदवीचं शिक्षण पूर्ण होईल का ? नैराश्याने घेरले होते. काय निर्णय घ्यावा सुचत नव्हते. एका रविवारी प्रा. आर. कृष्णमूर्ती सरांच्या घरी गेलो. पुढील शिक्षणाच्या ओढीची व्यथा-कथा त्यांना सांगितली. ते म्हणाले, ” उद्या महाविद्यालयात १२ वाजता ये. ” त्याप्रमाणे मी महाविद्यालयात गेलो. तेथून आम्ही दोघे जिल्हा परिषद कार्यालयात चीफ फायनान्स ऑफिसर विश्वनाथन यांच्याकडे गेलो. तेथे त्या दोघांचा तामीळ भाषेत संवाद झाला. ते आम्हा दोघांना बरोबर घेऊन शिक्षणाधिकारी आयेशा बेगम यांच्या कार्यालयात आले. ते शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर इंग्रजीत बोलले. या बोलण्याचा आशय असा होता की, ” या शिक्षकाची प्रतिनियुक्ती किंवा बदली औरंगाबाद जवळच्या शाळेत करा. जेणेकरून या शिक्षकास आपलं शिक्षण पूर्ण करता येईल. ” त्यानुसार त्वरित कार्यवाही झाली व माझी प्रतिनियुक्ती फुलंब्री येथे झाली आणि मला माझे एम. ए. (हिंदी)चे शिक्षण पूर्ण करता आले.

मिलिंद महाविद्यालयात आम्ही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष १९६२ ते ६५ या चार वर्षात तीन प्रचार्यांचा कार्यकाळ अनुभवला आहे. ते प्राचार्य अनुक्रमे [१] प्राचार्य म. ना. वानखडे (१९६१-६२), [२] प्राचार्य म. ला. शहारे (१९६२-६३) व [३] प्राचार्य डॉ. श्री. म. पिंगे हे होत. या अगोदरचे प्राचार्य एम. बी. चिटणीस होते. या प्राचार्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयात शिक्षणाला अतीव पोषक असे वातावरण होते. त्या शैक्षणिक वातावरणाचा विद्यार्थीही यथोचित उपयोग करून घेत आणि आपली शैक्षणिक प्रगती करीत. आम्ही विद्यार्थ्यांनी जसा ३ प्राचार्यांचा कार्यकाळ अनुभवला तसाच आमच्या अगोदरचे विद्यार्थी, आमच्या बरोबरचे विद्यार्थी व आमच्या नंतरचे विद्यार्थी असे तीन प्रकारचे समकालीन विद्यार्थी होते. त्यांनीही ही ज्ञानलालसा आणि ज्ञानपिपासा अनुभवली. मला असे वाटते की, कुशाग्र बुद्धी, फार हुशार, हुशार व सामान्य बुद्धीचे विद्यार्थी त्या वेळी शिक्षण घेत होते. या सर्वच विद्यार्थ्यांनी अति अधिक परिश्रम घेतले कारण त्यांना आपल्या अस्तित्वाची व अस्मितेची ओळख निर्माण करायची होती. त्यावेळी विद्यार्थी संख्या जवळपास दीड-दोन हजार असावी, तरी पण ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली त्यांचा नामनिर्देश करावा असे मला वाटते. सीनियर विद्यार्थ्यांत मा. फ. गांजरे , बी. आर. कांबळे, एन. डी. कांबळे, आर. सी. नागोरी, पी. बी. वराळे, अनंत मांजरमकर, पी. एस्. धनवे, पी. एस्. कांबळे, जसवंत सिंग बायस, काशिनाथ सूर्यवंशी, पी. आय. सोनकांबळे, विजयकुमार फकीरडे, भगवान भटकर इत्यादींची नोंद घ्यावी लागते.
माझ्या त्यावेळच्या वर्ग बंधू आणि भगिनींची नोंद घेणे माझ्यासाठी अत्यानंदाची व उत्साहवर्धक बाब आहे. त्यात प्रामुख्याने व्ही. जी. जाधव, यशवंत मनोहर, योगिराज वाघमारे, सुखराम हिवराळे, वामन निंबाळकर, प्रल्हाद गायकवाड, कैलास सहस्त्रबुद्धे, वसंत देसाई, शंकर साबणे, व्ही. डी. चंदनशिवे, टी. आर. वानखडे, व्ही. एल. इंगळे, पी.एस्. भोगे, प्रभाकर शिरोळे, वामन शिंदे, बी. टी. बिऱ्हाडे, पूरनलाल परदेशी, दत्ता वाघमारे, हिरामण दिवेकर, रत्नाकर खरात, बालाजी चौधरी इत्यादींचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. तसेच वर्ग भगिनी अरुणा लोखंडे, रत्नमाला वानखडे, शशी सबरवाल, फमीदा बेगम या होत.

योगीराज वाघमारे ‘ मिलिंद कुमार ‘ तर अरूणा लोखंडे ‘ मिलिंद कुमारी ‘ या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. हा सन्मान अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या विद्यार्थ्यासच दिला जात होता. मिलिंद महाविद्यालयाची ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा होय. आम्हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा पुरस्कार ” नोबेल पुरस्कारा ” समानच होता.

‘ मिलिंद कवी ‘ पुरस्काराचे मानकरी यशवंत मनोहर होते.

ज्युनिअर विद्यार्थी-विद्यार्थिनीत उल्लेखनीय आहेत :– बी. एस्. म्हस्के, हरीश खंडेराव, विजयकुमार गवई, कुंदन यसांबरे, ए. बी. हिरामणी, सुखदेव थोरात. तर विद्यार्थिनीत मथुरा खैरे, ज्योत्स्ना वानखडे, पुष्पा खरात, रागिनी साबळे, सरस्वती मोरे, कमल कांबळे, विजया धावारे, सुदेश वाखोना इत्यादी.
कमल कांबळे हिच्या निधनाने मिलिंद परिसरावर आलेले दुःखाचे सावट आम्ही विद्यार्थ्यांनी अनुभवले.

ज्युनिअर विद्यार्थ्यांतील निम्नांकितांना ‘ मिलिंद कुमार ‘ व ‘ मिलिंद कुमारी ‘ या पुरस्काराने अलंकृत केलेले आहे :–
विजयकुमार फकीरडे व मडिलगेकर ( सिनियर विद्यार्थी )
कुंदन यसांबरे व खानोलकर,
हरिष खंडेराव व मथुरा खैरे,
ए.बी. हिरामणी व ज्योत्स्ना वानखडे,
सुखदेव थोरात व दिवेकर.
( हे सर्व आठवणीच्या आधारावर लिहिले आहे. क्रम खालीवर होऊ शकतो किंवा चूक ही होऊ शकते. क्षमस्व. )

वक्तृत्व स्पर्धेत, निबंध स्पर्धेत सिनियर-ज्युनिअर विद्यार्थ्यांत बी. आर. कांबळे, एन. डी. कांबळे, आर. सी. नागोरी, व्ही. जी. जाधव, कुंदन यसांबरे, सुखराम हिवराळे, योगिराज वाघमारे, हरिश खंडेराव, ए. बी. हिरामणी इत्यादींनी मिलिंद महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले आणि काहींनी पारितोषिकेही पटकाविली.

क्रिडा स्पर्धा:–
कुस्ती– जसवंतसिंग बायस आणि काशिनाथ सुर्यवंशी यांनी गाजविली.
टेबलटेनीस – स्पर्धेत शशी सबरवाल, रत्नमाला वानखडे आणि शंकर साबने यांनी आपले क्रिडा नैपुण्य प्रदर्शित केले होते.
नाट्य कलावंत – रंगकर्मी म्हणून यशवंत मनोहर, वाडकर, प्रभाकर शिरोळे, विजया धावारे, विजयकुमार गवई आदी आघाडीवर होते.
गीत गायन – स्पर्धेत प्रभाकर शिरोळे व विजयकुमार गवई यांनी आपल्या सुमधूर गायनाने श्रोत्यांचे कान तृप्त केले होते. क्रिकेटमध्ये वामन शिंदे व पगारे नावाजलेले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात मी अध्ययन व अध्यापनेतर जबाबदारी सचोटीने पार पाडीत असे. पुढील शिक्षणाच्या ओढीने आणि ध्यासाने मी झपाटलो होतो. मी आदरणीय गुरुवर्य डॉ. राजमल नोरा सरांच्या मार्गदर्शनानुसार पी. एच. डी. (हिंदी) पदवीसाठी ‘ कथाकार रांगेय राघव ‘ या विषयाची १९७३ साली नोंदणी केली. शोध प्रबंध लिहून सादर केला. तो स्वीकारला गेला आणि मला मराठवाडा विद्यापीठाने १९७९ साली पी. एच. डी. (हिंदी) ची पदवी प्रदान केली. मी लेखन, अनुवाद व संपादन करण्याचा प्रयत्न करू लागलो.

माझे प्रकाशित ग्रंथ पुढीलप्रमाणे :–

” कथाकार रांगेय राघव ” (शोधग्रंथ)
साहित्यरत्नालय, कानपूर – १९८२,

अनुवादित-संपादित ग्रंथ :–
(१) दलित कहानियाँ – ( डॉ. सूर्यनारायण रणसुभे सोबत.)
पंचशील प्रकाशन, जयपुर १९८१,
(२) दलित रंगमंच – ( प्रा. त्र्यंबक महाजन सोबत. )
कृष्णा ब्रदर्स, अजमेर – १९८६,
(३) अखिल भारतीय नाट्य संमेलन – पाच अध्यक्षीय भाषणे – ( प्रा. त्र्यंबक महाजन व इतरांसोबत.)
सुगावा प्रकाशन, पुणे – १९९५,
(४) युगयात्रा प्रवाहातील रंगसंहिता – ( प्रा. त्र्यंबक महाजन सोबत. )
रमाई प्रकाशन, एन – २, सिडको, औरंगाबाद.

[ या चार ग्रंथांची विषयवस्तू दलित साहित्य आहे. दलित कहानियाँ ( कथासंग्रह ) व दलित रंगमंच ( एकांकी संग्रह ) या हिंदीत अनुवादित ग्रंथाने ‘ दलित विमर्श ‘ ची ओळख हिंदी भाषा -भाषी लेखक, समीक्षक आणि सुधी ( सुज्ञ ) अभ्यासकांना करून दिली. त्यानंतरच हिंदीत “दलित विमर्श ” च्या अनुषंगाने साहित्य सृजन झाले. एवढेच नव्हे तर दलित विमर्श हा विषय भारतीय भाषेची वैशिष्ट्ये ठरला. ]

स्फुट लेखन :–
एलोरा समाचार, गवाह, महाराष्ट्र मानस, संचेतना व संचारिका, दैनिक वृत्तरत्न सम्राट पत्र-पत्रिकेतून प्रसिद्ध.

शैक्षणिक वर्ष १९८४-८५ च्या प्रारंभी महाराष्ट्र शासनाने ‘ महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी ‘ च्या सदस्यपदी माझी नियुक्ती केली होती. तेथे मी सदस्य म्हणून तीन वर्षे कार्य केले.

मी मराठवाडा विद्यापीठ हिंदीच्या ‘ बोर्ड ऑफ स्टडी ‘ चा निवडून आलेला सभासद होतो. बी. ए. ते एम. ए. व एम. फिल. पदवीच्या नवीन क्रमिक अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांच्या निवडीत मी सक्रिय सहभाग घेतला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे – हिंदी अभ्यास मंडळाने इयत्ता आठवीच्या हिंदी ( द्वितीय भाषा – पूर्ण ) ” लोकभारती ” या पाठ्यपुस्तकाच्या संपादक मंडळात माझी १९८५ ला सदस्य संपादक म्हणून नियुक्ती झाली होती.

मिलिंद महाविद्यालय, नागसेनवन परिसरात शिकणारा प्रत्येक विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने झपाटून व भारावून गेला होता. त्याचा प्रत्यय खालील घटनांच्या विवेचनावरून येईल.
त्याकाळी घडलेल्या काही घटनांविरुद्ध निघालेले मोर्चे व निषेध सभा यात मी सहभाग घेतला व उपस्थित राहिलो आहे. त्याचे निरूपण खालील परिच्छेदात केले आहे.

(१) मिलिंद महाविद्यालयाचे ” अजिंठा ” वसतिगृह आज जेथे आहे त्याच्या उत्तरेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे कायमचे स्थायिक होण्याचा निश्चय केला होता. त्यासाठी त्यांनी वैयक्तिक मालमत्ता म्हणून ५ एकर २८ गुंठे पडीत जमीन (सर्व्हे क्रमांक २, जयसिंगपुरा) येथे खरेदी केली होती. ही जमीन विद्यापीठ गेटच्या समोरच पूर्व दिशेला आहे. सध्या तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे क्वार्टर्स आहेत. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर माईसाहेब आंबेडकरांनी १९६२ साली लिलाबाई बाभुळे यांना ही जमीन विकली. पी. ई. सोसायटीने ती जमीन विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माईसाहेबांनी प्रतिसाद दिला नाही. लिलाबाई बाभुळे यांनी त्या जमिनीचा रीतसर ताबा घेतला व लाकडी बल्ल्या उभारून तार कंपाउंड उभारण्याचे काम सुरू केले. बाबासाहेबांची वैयक्तिक जमीन दुसऱ्या कोणीतरी खरेदी केली आहे हे समजल्यावर तिन्ही वसतिगृहातील विद्यार्थी अस्वस्थ झाले. विद्यार्थी नेते एम. ए. वाहूळ यांच्या नेतृत्वाखाली वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी कंपाउंड उखडून टाकण्याचा निर्णय घेतला. त्याची कार्यवाही उत्तररात्री ३००-३५० विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पार पाडली. लाकडी बल्ल्या वसतिगृहाच्या मेसच्या चूलवणात जाळल्या. कंपाउंडच्या बल्ल्या व लोखंडी तार उखडून टाकण्यात उत्तररात्री जी कार्यवाही झाली, त्या कार्यवाहीत मी स्वतः सहभागी होतो. या जमिनीवर येणकेण प्रकारे कब्जा घेण्याचा लिलाबाई बाभुळे यांनी प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांना ही जमीन पी. ई. सोसायटीलाच विकावी लागली कारण पर्यायच उरला नव्हता.

(२) चीनने १९६२ झाली भारतावर आक्रमण केले व युद्ध लादले. हजारो भारतीय सैनिक धारातीर्थी पडले. भारताचा बराच मोठा भूप्रदेश चीनने काबीज केला, त्यामुळे समग्र देशाच्या सामाजिक व राजकीय वातावरणात चीड निर्माण झाली. चीन विरुद्ध लोकमत तयार झाले. परिणामत: देशात राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रखरतेने निर्माण झाली आणि भारत सरकारच्या तिजोरीत पैसा जमा करण्यासाठी संरक्षण निधी जमा करण्याची मोहीम सुरु झाली. नागसेनवन परिसरातील पी. ई. सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी संरक्षण निधी व्यापारी पेठेत दुकाना-दुकानात जाऊन जमा केला.

व्यापाऱ्यांनीही सढळ हाताने संरक्षण निधीत योगदान दिले. संरक्षण निधी जमा करणाऱ्या संचात मी ही सहभागी होतो.

(३) शिरसगाव, तालुका गंगापूर येथील प्रकरणाचा औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बोलबाला झाला होता. शिरसगावच्या सवर्णांनी जातीय द्वेषातून अनुसूचित जातीच्या दोन महार स्त्रियांची नग्न धिंड काढली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. संतापाची लाट निर्माण झाली होती. रिपब्लिकन मराठवाडा विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. एस्. टी. प्रधान यांच्या नेतृत्वात मोर्चा व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या मोर्चात मी सहभागी होतो, तसेच विशेष सभेत उपस्थित होतो.

(४) ब्राह्मणगाव, जिल्हा परभणी येथेही अनुसूचित जातीतील महार स्त्रीयांची विटंबना करण्यात आली होती. त्या विरोधात रिपब्लिकन मराठवाडा विद्यार्थी संघाने निषेध सभेचे आयोजन केले होते. तसेच ब्राह्मणगावात जाऊन आवश्यक ती चौकशी विद्यार्थी संघाने केली होती आणि पीडितांचे सांत्वन केले होते. पिडीतांना महाराष्ट्र शासनाने आर्थिक सहाय्य करावे असे निवेदन पाठविण्यात आले होते. या सर्व कार्यवाहीत मी सहभागी होतो.

(५) रिपब्लिकन मराठवाडा विद्यार्थी संघाने अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत महागाईच्या प्रमाणात वाढ करण्यात यावी म्हणून आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे गाढवाचा मोर्चा काढला होता. त्या मोर्चात मी सहभागी होतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सेवेत असताना सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी असलेल्या “ मराठवाडा विद्यापीठ नामांतर ” व ” लॉंग मार्च ” या दोन घटना घडल्या.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा ठराव १९७८ साली विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मान्य करून घेऊन ” मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ ‘ करण्यात आले आहे. ” असे घोषित केले. त्या घोषणेनंतर त्या विरोधात मराठवाड्यात जाळ-पोळ व क्रूर हत्यांच्या घटना घडल्या. या घटनांची इत्थंभूत माहिती एकत्र करणे व त्याचा अहवाल तयार करण्यासाठी महाविद्यालयाने एक समिती नेमली होती. त्या समितीचा मी एक सदस्य होतो. समितीने उपप्राचार्य प्रा. दत्ता देशकर यांच्या नेतृत्वात औरंगाबाद जिल्ह्यात गणोरी आणि नांदेड जिल्ह्यात सुगाव, काहाळा व कृष्णूर या गावांना भेटी दिल्या. सुगाव येथे जनार्दन मवाडे व काहाळा येथे पोचीराम कांबळे यांची हत्या करण्यात आली होती. समितीने इत्थंभूत माहिती एकत्र केली. त्या आधारे अहवाल तयार केला व शासनास सादर केला. त्याच्या लेखनात मी सहभागी होतो.

रिपब्लिकन पक्षाचे नेते, ” लॉंग मार्च ” चे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात मराठवाडा विद्यापीठ नामांतराची अंमलबजावणीची कार्यवाही व्हावी म्हणून नागपूर येथून ” लॉंग मार्च ” निघाला होता. लॉंग मार्च औरंगाबादला क्रांती चौक येथे आला असता पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्या लाठीचार्जचा मी शिकार झालो होतो.

कालांतराने नांदेड येथे दलित पॅन्थर कार्यकर्ता गौतम वाघमारे यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराची अंमलबजावणीची कार्यवाही व्हावी म्हणून १९९३ साली आत्मदहन केले. त्यानंतरच विद्यापीठाच्या नामांतराऐवजी नामविस्तार झाला.

२८ऑगस्ट १९८५ रोजी मी मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागात सेवेत रुजू झालो. विद्यापीठात अध्यापना समवेत एम. फिल. आणि पी. एच. डी. पदवीच्या शोधकर्त्यांना मार्गदर्शन केले. माझ्या मार्गदर्शनानुसार ३५ एम. फिल. आणि १५ पी. एच. डी. पदवीसाठी शोधकर्त्यांनी शोधप्रबंध लिहून विद्यापीठात परीक्षणार्थ सादर केले. त्या सर्वांच्या शोधप्रबंधास मान्यता मिळाली आणि त्यांना एम. फिल. व पी. एच. डी. (हिंदी) ही पदवी प्रदान करण्यात आली.

मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांच्या हिंदी विषयाच्या अधिव्याख्याता भरतीच्या निवड समितीवर हिंदी विशेषज्ञ व कुलगुरूचे प्रतिनिधी सदस्य म्हणून विद्यापीठाने माझी नेमणूक केली.

विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्लीच्या विद्यमाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हिंदी विभागाद्वारे १९९३-९४ साली ” रेफ्रिशर कोर्स ” चे आयोजन केले होते. त्या रेफ्रिशर कोर्सच्या संयोजनाची व व्यवस्थापनाची जबाबदारी विभागाने माझ्यावर सोपविली होती.

विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली व मराठवाडा विद्यापीठ यांच्या विद्यमाने हिंदी विभागाने आयोजित केलेल्या ” नाट्य रंगमंच ” परिसंवादाचे संचलन व निबंध वाचन मी केले.

लोकसेवा संघ आयोग, दिल्ली द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या केंद्रीय सरकारच्या नियंत्रणात असलेल्या महाविद्यालयात हिंदी विषयाच्या अधिव्याख्याता, हिंदी अनुवादक आणि हिंदी अधिकारी पदाच्या मौखिक परीक्षेच्या निवड समितीचा अशासकीय सल्लागार म्हणून १९९३ ते १९९५ या कालावधीसाठी माझी नेमणूक केली होती.

आंध्र प्रदेश लोकसेवा आयोग, हैदराबादच्या विद्यमाने आयोजित केलेल्या विविध पदाच्या भरतीच्या हिंदी परीक्षेच्या प्राश्निक पदावर १९९५ ते ९७ या कालावधीसाठी माझी नेमणूक केली होती.

मध्य प्रदेशातील भोपाळ आणि महाराष्ट्रातील नागपूर, कोल्हापूर व मुंबई येथील विद्यापीठांच्या पी. एच. डी. (हिंदी) पदवीच्या शोध प्रबंधांच्या परीक्षकाचे काम मी केलेले आहे.

वरील परिच्छेदात नमूद केले आहे की, बी. ए. पदवी पर्यंतच्या वर्गात मी इंग्रजी, मराठी ( द्वितीय भाषा व ऐच्छिक ) राज्यशास्त्र आणि मानसशास्त्राचा अभ्यास केला. तरी पण मी एम.ए. पदवीसाठी हिंदी विषयाची निवड केली. कारण मला ” हिंदी ” विषय घेण्याचे प्रोत्साहन व प्रेरणा मिलिंद महाविद्यालयाचे इंग्रजीचे प्राध्यापक विद्यार्थीप्रिय प्रा. ताराशंकर सक्सेना सर यांनी दिली.

बी.ए. उत्तीर्ण झाल्यावर मी मार्गदर्शन मिळविण्याच्या हेतूने प्रा. ताराशंकर सक्सेना सरांकडे पोहोचलो. मी त्यांच्या हाती माझा मार्क्स मेमो (गुणपत्रिका) दिला आणि विनंती केली की, सर मला मार्गदर्शन करा. मी कोणत्या विषयात एम. ए. करावे ? त्यांनी माझ्या मार्क्समेमोवर एक नजर टाकली आणि म्हणाले, “तू द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहेस, तू एम. ए. साठी नोंदणी करण्यास पात्र आहेस.” (त्यावेळी एम.ए. पदवीच्या वर्गाच्या प्रवेशासाठी पदवी परीक्षेत द्वितीय श्रेणी प्राप्त करणे आवश्यक होते.) बी. ए. पदवी स्तरावर निवडलेल्या ३ ऐच्छिक विषयांपैकी एका विषयात एम. ए. साठी नोंदणी करू शकत होतो. त्यांनी प्रश्न केला “तुझ्या आवडीचा विषय कोणता ?” मी उत्तर दिले “मानसशास्त्र.” त्यांनी मला सांगितले की, “मराठवाडा विद्यापीठात मानसशास्त्र विषयाच्या शिक्षणाची व्यवस्था नाही. तुला मानसशास्त्र विषयात एम. ए. करावयाचे असेल तर पुणे किंवा मुंबई विद्यापीठात प्रयत्न करावे लागतील.” मी त्यांना सांगितले की, “मला तेथे जाऊन शिक्षण घेणे माझ्या विपरीत परिस्थितीमुळे शक्य नाही.” त्यांनी मला सुचविले की, “तू हिंदी विषयात एम. ए. कर.” मी त्यांना विचारले की, “बी. ए. पदवी स्तरावर हिंदी विषय नसतांनाही एम. ए. पदवीसाठी मला हिंदी विषय घेता येईल का ?” त्यांनी मला उत्तर दिले, “हो, घेता येईल.” (त्यावेळी कोणत्याही विद्याशाखेच्या पदवीधारकास एम.ए. हिंदी विषयासाठी नोंदणी करता येत होती व प्रवेश मिळत होता.) मी एम. ए. हिंदी (प्रथम वर्ष) वर्गासाठी नोंदणी केली व प्रवेश घेतला. जर मी प्रा. सक्सेना सरांचे मंतव्य अनुसरले नसते तर मला पी. ई. सोसायटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात सेवा करण्याची संधी लाभली नसती. ही संधी मला प्रा. सक्सेना सरांच्या प्रेरणेमुळे, प्रोत्साहनामुळे व मी हिंदी विषयात एम. ए. केल्यामुळे मिळाली. मी दुसरा विषय घेऊन एम. ए. केले असते तर मी आज हिंदीच्या क्षेत्रात ज्या मुक्कामी पोहोचलो आहे, दुसऱ्या विषयात मी तेवढी झेप घेऊ शकलो असतो का ? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो.

मी हायस्कूल, महाविद्यालय व विद्यापीठात एकूण बत्तीस वर्षे प्रदीर्घ काळ हिंदी भाषा व साहित्याचे अध्यापनाचे काम केले. भाषेकडे विशेषत: मातृभाषा मराठीच्या तुलनेत हिंदी भाषेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमीच असतो. मी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे राजभाषेचे, राष्ट्रभाषेचे महत्व सांगून हिंदी विषयी त्यांच्या मनात, हृदयात प्रेम व जिज्ञासा निर्माण करीत असे. त्यामुळे हिंदी विषयाची विद्यार्थीसंख्या समाधानकारक रहात असे. मी अध्ययन-अध्यापनाकडे प्रामुख्याने लक्ष देत असे. संवेदनशील वयातल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी अभ्यासक्रमातील आणि इतरही वेगवेगळ्या विषयांवर मोकळेपणाने बोलत असे, त्यांना बोलते करत असे. त्यांच्या बरोबर होणारा संवाद अत्यंत आनंददायक असे. आजही जुने विद्यार्थी-विद्यार्थिनी भेटले की आवर्जून या बाबीचा उल्लेख करतात, त्यांना कसा उपयोग झाला हे सांगतात, तेव्हा फार समाधान वाटते. असे असले तरी एम. फिल. व पी. एच. डी. पदवीसाठी शोधकार्य करणाऱ्या १/२ शोध कर्त्यांनी प्रामाणिक शोधकार्य करण्याऐवजी समज-अपसमज व गैरसमजामुळे माझा अपकार व अपकीर्ती करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचा अनुभवही माझ्या गाठी आहे.

प्रा. डॉ. कमलाकर गंगावणे
प्लॉट नंबर २९, “माऊली” , मुकुंद सहकारी गृहनिर्माण संस्था, महाजन कॉलनी, एन – २, सिडको,
औरंगाबाद – ४३१००६
दूरध्वनी क्रमांक – ०२४०-२४८८४१४.  मोबाईल क्रमांक – ७५८८४०१४३३                           ***

संकलन – संघमित्रा रामचंद्रराव मोरे