November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

महामानवाचा शेवटचा संदेश व अखेरच्या काळातील खंत! Nanak Chand Rattu

मंगळवार दि. ३१ जुलै १९५६ रोजी नानक चंद रत्तू यांचे बाबासाहेबांच्या सोबत झालेले संभाषण!
—————————————————————————-
नानक चंद रत्तू हे १९४० ते ०६ डिसेंबर १९५६ असे १६ वर्ष बाबासाहेबांचे खाजगी सचिव होते. त्यांचे Reminiscence and Remembrance of Dr. B R Ambedkar (डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी) या पुस्तकातून संदर्भ घेवून हा लेख अग्रेषित करत आहोत. कृपया, हा लेख प्रत्येक भारतीयांच्याकडे मोठ्या प्रमाणात पुढे पाठवा. बाबासाहेबांचे कार्य पुढे घेवून जाण्यासाठी नानक चंद रत्तू यांचे दि. ३१ जुलै १९५६ रोजी बाबासाहेबांच्या सोबत झालेले हे संभाषण महत्वपूर्ण ‘संदेश-साहित्य’ म्हणून खूप अगोदर जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक होते. बाबासाहेबांच्या आठवणींसंदर्भात नानक चंद रत्तू यांनी लिहिलेल्या सदर पुस्तकाची संहिता कधीपासूनच तयार होती परंतु मुद्रण खर्च इ. कारणामुळे ते प्रकाशित होवू शकले नाही हे खेदजनक आहे. जून १९९३ मध्ये परदेशात कार्यरत आंबेडकरी विचारधारेच्या संस्था व प्रतिनिधींनी आयोजित केलेल्या डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात मा. रत्तू यांना निमंत्रित केले होते. त्यानंतर त्यांचे सदर साहित्य परदेशात वास्तव्य करणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांची इच्छा व सहकार्याने प्रकाशात येवू शकले असे मा. रत्तू यांनी नमूद केले आहे. आमच्या माहितीनुसार साधारण १९९५ च्या दरम्यान हे पुस्तक इंग्रजी भाषेत उपलब्ध झाले. त्यानंतर मराठी, हिंदी इ. भारतीय भाषांमध्ये हे साहित्य भाषांतरीत झाले परतू त्यात जे मुद्दे लिहिले आहेत त्यांची पूर्तता मात्र आजपर्यंत (मागील ६४ वर्षात) झालेली नाही. त्यातील मुद्दे वाचताना भावनिक पातळीवर डोळ्यात पाणी येते व शिकले सवरलेले बुद्धीजीवी म्हणून आम्ही आजही किती निष्क्रिय आहोत हे जाणवते. आजही तंतोतंत लागू होणारी या मजकुरात व्यक्त झालेली महामानवाची अखेरचा काळातील खंत प्रत्येक कार्यकर्ता व सुशिक्षित वर्गास अंतर्मुख करायला लावणारी आहे.

बाबासाहेब हे राष्ट्रनिर्माते महामानव होते. संविधानिक राष्ट्रनिर्माण ही सातत्य पूर्ण चालणारी गतिमान प्रक्रिया आहे. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून या प्रक्रियेत सक्रीय असणे हे आमचे कर्त्यव्य आहे. महामानवाची खंत आपणा सर्वांना गंभीरपणे स्वपरीक्षण करायला लावणारी आहे. यातील मुद्दे आम्ही राष्ट्र निर्माण जन परिषदेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग बनवत आहोत. संस्थात्मक पातळीवर त्यांची पूर्तता करणे हे आमचे जीवित कार्य आहे. या कार्यासाठी इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रॅटिक रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना करत आहोत. स्वत: बाबासाहेबांनी १९५६ मध्ये (हे संभाषण झाले त्याच वर्षी) कार्यकर्ता ट्रेनिंग स्कूल साठी जी अभ्यासक्रम संरचना बनविली आहे, त्यानुसार आजच्या संदर्भात विकसित केलेला अभ्यासक्रम संस्थेकडे तयार आहे. हे आम्ही सविनय नमूद करू इच्छितो. उपलब्ध साधनांच्या आधारे महाराष्ट्रात प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. महामानवाच्या योजनेप्रमाणे तुमच्या-आपल्या संस्थेचे हे कार्य प्रभावीपणे पुढे घेवून जाण्यासाठी वेळ, बुद्धी, पैसा, कष्ट, कौशल्य, पायाभूत सुविधा इ. स्वरूपात आपला साथ-सहयोग अपेक्षित आहे.

– मा. पी आर सोनवणे, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रनिर्माण जन परिषद व संयोजक, इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रॅटिक रिसर्च अँड ट्रेनिंग
———————————————————————————
टीप: वाचकांसाठी पुढील संभाषण मजकूर लिहिताना, उपरोक्त पुस्तकातील शब्द शक्यतो कायम ठेवत, बाबासाहेबांच्या महान लेखणीस विनम्र अभिवादन करून मुद्देसूद मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. यात काही लेखन व भाषांतर त्रुटी असू शकतात; त्याबद्दल क्षमस्व.
——————————————————————————–
‘शेवटचा संदेश’ या शीर्षकाखाली नानक चंद रत्तू यांनी लिहिले आहे की, मी पुढे होवून बाबासाहेबांच्या बिछान्याजवळच्या स्टुलावर एकदम त्यांच्या आमने सामने बसलो आणि माझे मन दीर्घकाळापासून कुरतडणारा तो प्रश्न या वेळी अगदी निर्धार करून, धाडस एकवटून त्यांना मी विचारलच, “सर, अलीकडे आपण एवढे दु:खी आणि खिन्न का दिसता? अधून मधून डोळ्यातून पाणी का गाळता? मी तुम्हाला हे विचारल्याबद्दल सर, आपण मला क्षमा करा. पण मला आज या प्रश्नाचे उत्तर द्याच.”
या प्रश्नावर काही क्षण एकदम शांततेत गेले… बाबासाहेबांचा गळा भावनेने भरून आला… ते म्हणाले,

“मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाचे दु:ख होत आहे हे तुम्हा लोकांना माहित नाही.”

१. माझी पहिली खंत ही आहे की, मी माझे जीवनकार्य पूर्ण करू शकलेलो नाही.

२. माझे लोक इतर समाजांशी बरोबरीपूर्वक राजकीय सत्तेचे वाटेकरी होवून सत्ताधारक वर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती.

३. जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मूठभर सुशिक्षितांनी घेतला आहे. पण त्यांचे सुशिक्षित वर्गाचे विश्वासघातकी वागणे, समाजाप्रती त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागते. ते माझ्या कल्पना शक्तीच्या पलीकडे गेले आहेत. ते फक्त स्वत:साठी व त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठीच जगतात. त्यांच्यापैकी एकही जण सामाजिक कार्य करायला तयार नसतो. ते आत्मघाताच्या वाटेने निघाले आहेत.

४. मला आता माझे लक्ष खेड्यातल्या हजारो-लाखो निरक्षर लोकांकडे वळवायचे होते. ते अजूनही हाल अपेष्टा भोगत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती मुळीच बदललेली नाही. पण आता आयुष्य फार थोडे शिल्लक राहिले आहे.

५. मला असेही वाटले होते की, माझी सगळी पुस्तके माझ्या हयातीतच प्रकाशित व्हावीत. बुद्ध अँड कार्ल मार्क्स, रेव्होल्युशन अँड काऊंटर रेव्होल्युशन इन एन्शिएंट इंडीया, रिडल्स इन हिन्दुइज़म ही माझी यादगार पुस्तके प्रकाशित करण्यात मी असमर्थ व असहाय्य ठरत आहे ही नुसती कल्पनासुद्धा मला भयंकर क्लेशकारक होते. कारण माझ्या मृत्यूनंतर दुसरे कोणीच ही पुस्तके प्रकाशित करू शकणार नाही.

६. कोणीतरी शोषित वर्गांमधून माझ्या हयातीतच पुढे येईल आणि माझ्या पश्चात ही चळवळ पुढे चालविण्याची अवघड जबाबदारी पत्करील अशीही माझी अपेक्षा होती. पण हे आव्हान पेलू शकेल असा कोणीच माझ्या डोळ्यांपुढे येत नाही.

७. माझ्या ज्या सहकाऱ्याबद्दल ते ही चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरवसा होता ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकमेकांत भांडत आहेत. त्यांच्या शिरावर येवू घातलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांच्या ध्यानीमनीही असल्याचे दिसत नाही.

८. हा देश आणि येथील लोक ह्यांची मला आणखी काळ सेवा करण्याची संधीही मला हवी होती. ज्या देशातील लोक एवढे जातिग्रस्त आणि पूर्वगृहपिढीत आहेत तेथे जन्माला येणे हे घातक आहे.

९. विद्यमान चौकटीत या देशाच्या कारभारात आपला रस टिकवून ठेवणे अत्यंत अवघड होवून बसले आहे, कारण प्रधान मंत्र्यांच्या मताशी न जुळणारे दुसरे कोणतेच मत ऐकून घेण्याची येथील लोकांची तयारी नाही.

१०. किती गाळात चाललाय हा देश!

हे सांगताना बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी माझ्याकडे पहिले.मी ही अश्रू ओसंडणाऱ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नव्हतो.

[संदर्भ: नानक चंद रत्तू पान २०२]
———————————————————————————
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी या पुस्तकातील इतर २ निवडक संदर्भ:
———————————————————————————
मा. कर्तारसिंग (आयएएस), पंजाब होशियारपूर यांनी जानेवारी १९४० ला बाबासाहेबांची भेट घेण्याची संधी नानक चंद रत्तू यांना प्राप्त करून दिली. ते “जयभीम” या मद्रास येथून प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकात लेख लिहित असत. ते लिहितात,

“डॉ. आंबेडकरांना आपल्या समाजातील ‘राजकीय उडानटप्पू’ बद्दल कमालीची चीड होती. एकदा ते म्हणाले की, “क्षुल्लक व्यक्तिगत फायद्यांसाठी समाजाच्या हक्कांना आणि हितसंबंधांना तिलांजली देणारे हे जुवारी जर आपल्यात नसते तर आपल्या राजकीय मुक्तीचा लढा आपण कधीच जिंकलो असतो.”

[संदर्भ: नानक चंद रत्तू पान २०२]
———————————————————————————
निवडणुकांकडे “जगण्याचा आणि मरणाचा लढा म्हणून पाहावे. आणि येत्या काही महिन्यांत त्याच उत्साहाने काम करावे. आपण आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती उपयोगात आणली पाहिजे… आपण एकच सत्ता मिळवू शकतो आणि ती म्हणजे राजकीय सत्ता.ही सत्ता आपण जिंकायलाच पाहिजे. या सत्तेची ताकत आपल्याला लाभली म्हणजे आपण आपल्या लोकांचे हितसंबंध सुरक्षित करू शकू.

[संदर्भ: नानक चंद रत्तू पान २०२]
——————————————————————————