July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

औरंगाबाद शहराचे नाव बाबासाहेबांना करायचे होते ‘पुष्पनगर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वीचे औरंगाबाद व सध्याचे छत्रपती संभाजीनगर या शहराविषयी त्यांच्या अनेक आठवणी त्यांचे सहकारी बळवंतराव वराळे यांच्या ‘डॉ. आंबेडकरांचा सांगाती’ या ग्रंथात नमूद आहेत. मिलिंद कॉलेजच्या उभारणीनिमित्त जेव्हा जेव्हा बाबासाहेब या शहरात यायचे, त्यावेळी त्यांच्या पाठीशी सावलीसारखे राहिलेले, काम करणारे अनेक जण आज हयात नाहीत. महाविद्यालयाच्या पहिल्या किंवा दुसच्या बॅचचे काही विद्यार्थी आहेत. पण, त्यापैकी वयोमानामुळे अनेकांना बऱ्याच गोष्टींचे विस्मरण झाले आहे. मराठवाड्यातील नवीन पिढीला बाबासाहेबांचा खरा इतिहास कळावा, यासाठी वराळे यांच्या ग्रंथातील हा दाखला देत आहोत.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शहराचे नाव करायचे होते ‘पुष्पनगर
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहराप्रती बाबासाहेबांच्या अविस्मरणीय आठवणी; शहरावर त्यांचे अतोनात प्रेम  राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या शहराप्रती विलक्षण आकर्षण होते. आयुष्याचा शेवटचा काळही याच शहरात घालवावा, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यानुसार त्यांनी स्वतःच्या घरासाठी येथे जागाही विकत घेतल्याचे सर्वांना ठाऊक आहेच. मात्र, या शहराचे नाव ‘पुष्पनगर’ असावे, अशी त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. आणखी काही काळ त्यांना आयुष्य लाभले असते, तर जगामध्ये या शहराचे नाव ‘पुष्पनगर’ म्हणून ओळखले गेले असते. सर्वच दृष्टीने मागासलेल्या मराठवाड्यातील लोकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या शहरात पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित मिलिंद कॉलेज उभारले. त्यामुळे या भागातील मागासवर्गीय विद्यार्थी- विद्यार्थिनींबरोबरच वरच्या जातीतील मुला-मुलींची देखील उच्चशिक्षणाची सोय झाली.
नागसेनवन‘ परिसरात उभारलेल्या मिलिंद कॉलेजची इमारत बाबासाहेबांनी स्वतःच्या निगराणीत उभारली. एवढेच नव्हे, तर मिलिंद हायस्कूल, तेव्हाचे सायन्स होस्टेल व आताच्या अजिंठा वसतिगृहाची इमारत, आर्टसच्या विद्यार्थ्यांसाठी राऊण्ड होस्टेलची इमारत व त्यातील सर्व सुविधा एखाद्या आर्किटेक्ट अथवा तज्ज्ञ अभियंत्याच्या कल्पनेलाही लाजवेल, असा प्लॅन बाबासाहेबांनी स्वतः तयार केला आणि या इमारती उभारण्यात आल्या.
डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजच्या बाजूला राऊण्ड होस्टेलची उभारणी मुळात गेस्ट हाऊस म्हणून केली होती.

त्याकाळी येथे तारांकित हॉटेल्स नव्हते. अजिंठा, वेरुळला भेट देण्यासाठी येणाऱ्या बौद्ध राष्ट्रातील पर्यटकांच्या निवासाची सोय व्हावी, यासाठी हे गेस्ट हाऊस बांधले होते. बाबासाहेबांना लहानपणापासूनच निसर्गाचे अतोनात आकर्षण होते.
बागेचा मोठा छंद होता. मिलिंद महाविद्यालयाच्या आजूबाजूला तसेच समोर बागेची कल्पना व आखणीदेखील बाबासाहेबांनी स्वतःच केली. या बागेत सध्या डौलत असलेला बोधिवृक्ष स्वतः बाबासाहेबांनी श्रीलंकेहून आणलेला आहे.
बाबासाहेबांना पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने एक झाड नागसेनवनात लावावे, असा त्यांचा आग्रह असायचा. बाबासाहेबांना आणखी थोडे आयुष्य मिळाले असते, तर आजचे नागसेनवन खऱ्या अर्थाने सुंदर ‘वन’ म्हणून शोभून दिसले असते.
त्यांची एक अविस्मरणीय आठवण
म्हणजे, शेवटचे आयुष्य या शहरात अनाथ, निराधार मुलांसोबत घालवावे. त्यांची सर्वार्थाने सेवा करावी. यासाठी स्वतःच्या घराशेजारी अनाथाश्रम सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. पण, काळाने घात केला अन् शहराच्या नामांतरासह त्यांच्या काही कल्पना अपूर्ण राहिल्या.