August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

भारताने कोरियाला दिली बुद्धमूर्ती India offer Buddha statue to Korea

भारत सरकारची स्वायत्त संस्था असलेल्या संस्कृतिक परिषदेने ( Indian Council for Cultural Relation ) नुकतीच एक ब्राँझ धातूची बुद्धमूर्ती दक्षिण कोरियाला यांगसन शहरामध्ये टोंगडो विहारासाठी भेट म्हणून दिली. दोन देशातील मैत्रीसंबंध दृढ व्हावेत यासाठी तेथील भारतीय राजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांनी या कामी पुढाकार घेतला.
या प्रसंगी कोरियाचे अध्यक्ष मुन ज्याइन यांचे सचिव ह्यो हॅनजु तसेच टोंगडो विहाराचे भिक्खुं आणि इतर आमंत्रित सेउल मधील विवेकानंद सांस्कृतिक केंद्रात ३० एप्रिल २०२१ रोजी उपस्थित राहिले. भारतीय राजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांनी यांगसन वरून आलेल्या बौद्ध भिक्खुंचे स्वागत केले. या प्रसंगी तेथील विहारासाठी बुद्धमूर्ती देताना त्या म्हणाल्या की कोरिया आणि भारताचे नाते बुध्दिझममुळे अजून घट्ट होईल. टोंगडो विहाराचे मुख्य आदरणीय भन्ते ह्युनमुन म्हणाले की भारताचे आणि या टोंगडो विहाराचे नाते फार जुने आहे. हजारो वर्षांपूर्वी यांगसन प्रांतातील एक भिक्खू भारतात गेले होते. त्यांनी सर्व बौद्ध स्थळांची यात्रा केली. त्यांना राजगृह स्थळ खूपच आवडले. तेथील पर्वताप्रमाणेच यांगसन प्रांतात एक पर्वत होता. त्यामुळे त्यांनी परत आल्यावर राजगृहासारखे विहार तेथे बांधले. तेच आजचे टोंगडो विहार आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत याचा ३० जून २०१८ रोजी समावेश केला आहे.
श्रीप्रिया रंगनाथन यांनी जेंव्हा टोंगडो विहाराला ऑक्टोबर २०२० मध्ये भेट दिली तेंव्हा तिथल्या भिक्खुंनी बुद्धांची जन्मभूमी असलेल्या भारतामधून एक बुद्धमूर्ती विहाराला मिळावी अशी विनंती केली होती. श्रीप्रिया रंगनाथन यांचे मला यासाठी कौतुक करावेसे वाटते की त्यांनी भिक्खुंच्या विनंतीला मान देऊन भारतातून ब्रॉंझची सुबक बुद्धमूर्ती मागवली. आणि योग्य समारंभाद्वारे त्यांना सुपूर्द केली. आता ही मूर्ती जेंव्हा यांगसन प्रांतात जाईल तेव्हा मोठा समारंभ टोंगडो विहारात ( बुद्ध पौर्णिमेला ) होणार आहे. भारतातून बुद्धमूर्ती आल्याचे त्यांना भारी कौतुक वाटत आहे.
तरी सर्व बौद्ध देशांत असलेल्या भारतीय राजदूतांनी त्यांच्या तेथील बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करावा असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते. कारण बुध्दिझमची मेत्त भावना ( मैत्री-करुणा ) ही सर्व जगात श्रेष्ठ आहे. माणसातल्या माणुसकीचे संवर्धन त्याद्वारेच होत आहे आणि होणार आहे.
—संजय सावंत www.sanjaysat.in