February 22, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बौद्ध धर्मात किती विधी आहेत आणि ते कसे पार पाडले जातात ?

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धार्मिक क्षेत्रातील कार्य अतिशय महान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातून लुप्त झालेल्या बुद्ध धम्माचे अडीच हजार वर्षानंतर पुनरूज्जीवन करून महान असे धम्मचक्र प्रवर्तन केले. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विधीमध्ये पूजन होते.

सर्वसाधारण माणसाला धार्मिक विधी संस्काराची आवश्यकता भासत असते, म्हणून ते निर्माण केले गेले. पैकी,  काही विधी संस्कार हे निरनिराळ्या बौद्ध राष्ट्रांत प्रचलित आहेत. ते स्वीकारतांना बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक युगाला अनुरूप असा विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन समोर ठेवला आहे. तद्वतच भारत आणि इतर बुद्ध राष्ट्रांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक एकात्मता साधण असा दृष्टीकोन यात अभिप्रेत आहे.

बुद्ध धम्म आणि संघ खूप विस्तार पावला तेव्हाही भगवंतांनी कशाचेही अवडंबर माजविले नाही. बुद्ध धम्माची उभारणी बाह्य सोपस्कार, वारेमाप पूजाप्रकार इत्यादींवर आधारलेली नसून ती मनाच्या मांगल्यावर आणि बुद्धीच्या कसोटीवर आधारलेली आहे.

बुद्ध धम्मामध्ये पुजा – अर्चा, कर्मकांड आणि संस्कार इत्यादींना फारसे महत्वाचे स्थान नाही. महास्थवीर पदाला पोहोचलेल्या आणि त्रिपिटकाच्या निर्मितीची अनमोल जबाबदारी पार पाडलेल्या सारीपुत्त आणि महामोगल्लायन यांची धम्मदीक्षा सुद्धा भगवंतांनी “येही भिक्खवे !” “आपण इकडे या !” एवढं एकच वाक्य उच्चारून दिली.

धम्म संस्कार पुजेसाठी लागणारे साहित्य

(अ) सर्व साधारण खालील साहित्य सर्व धम्म संस्कारासाठी राहिल. (अंतिम संस्कारा व्यतिरिक्त )

🔷 भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ( फोटो ) किंवा मूर्ती .

🔷 अडीच मीटर पांढरे कापड : शुभ्र वस्त्र

🔷 उंच आसन ( टेबल )

🔷 पाच मेणबत्या व पाच अगरबत्या.

🔷 पुजेकरीता सुट्टी फुले.

🔷 पुजा साहित्य ठेवण्यासाठी ताट, अगरबत्ती स्टैंड, मेणबत्तीकरिता स्टैंड

🔷 आगपेटी (माचीस)

ब) प्रासंगिक : खालील काही संस्काराकरिता वेगळे साहित्य आवश्यक आहे.

🔷 विद्यारंभ विधी :  मुला / मुली करिता हार, पाटी, पेन्सिल, खडू, पेन, वही.

🔷 साक्षगंध विधी :  कुंकुमतिलक, पेढे अथवा साखर.

🔷 विवाह विधी : वधू- वराकरिता दोन हार, पुष्पगुच्छ.

🔷 अंतिम संस्कार  : ताट, पेला, सुगंधी द्रव्य, गुलाबपाणी, पाण्याने भरलेला तांब्या.

🔷 पुण्यानुमोदन : मृत व्यक्तिचा फोटो, ताट, पेला, पाण्याने भरलेला तांब्या.

🔷 भूमीपुजन : पाण्याने भरलेली कळशी किंवा हंडा, कुदळ.

🔷 गृहप्रवेश  : पुष्पहार, सफेद रिबन, कैची .

🔷 उद्घाटन : मोठी मेणबत्ती, सफेद रिबन, कैची.

🔷 मूर्ती प्रतिष्ठापना : भ. बुद्धाच्या मूर्तीकरिता काषाय वस्त्र आणि डॉ. बाबासाहेबांच्या मूर्तीकरिता पांढरे वस्त्र.

🔷 वाढदिवस : पुष्पहार किंवा पुष्प गुच्छ.

पुजेची मांडणी व इतर सूचना

🔷 भगवान बुद्धांच्या प्रतिमेच्या डाव्या बाजूला  बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवावी.

🔷 ज्या विधी करण्यात येईल ती जागा स्वच्छ आणि शांत असावी.

🔷 शुभ वस्त्राने अच्छाविलेल्या टेबलावर भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा अथवा मुर्ती ‘ठेवाव्यात.

🔷 भगवान बुद्धांची मुर्ती असेल तर फुले अर्पण करावीत.

🔷 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करावी.

🔷 प्रतिमांपुढे पाच मेणबत्त्या, अगरबती, सुटी फुले असे पुजा साहित्य मांडावे.

🔷 कोणत्याही संस्कार विधीमध्ये ज्यांचा संस्कार विधी करायचा आहे, त्या व्यक्तींनी शुभ्र वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे.

🔷 सर्व संस्कार विधीमध्ये सर्व उपस्थितांनी हात जोडून त्रिसरण, पंचशील ग्रहण करावे.

🔷 सर्व संस्कार विधी समयी उपस्थितांनी डोक्यावरील टोपी, फेटा, व पायातील चप्पल, बूट काढावीत.

🔷 बौद्धांच्या कोणत्याही संस्कार विधीला अध्यक्ष नसतो.

🔷 संस्कार विधी संपन्न होणाऱ्या कुटुंबातील १८ वर्षावरील सर्व व्यक्ती संस्थेचे सभासद असणे अत्यंत आवश्यक आहे.

🔷 विधी करणाऱ्या बौद्धाचार्य अथवा भिक्खूंनी विधी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या डाव्या बाजूस उभे राहून विधी करावा.

🔷 संस्कार विधी केवळ बौद्धाचार्याने पार पाडावा (अनेक बौद्धाचार्यांनी विधी लावू नये. )

🔷 साक्षगंध, विवाह इ. विधीच्यावेळी मंचकावर वधू-वर व नियोजित बौद्धाचार्या व्यतिरिक्त इतर कोणीही उपस्थित राहून नये.

🔷 बुद्ध धम्मामध्ये बुद्धवासी, बुध्दकृपेकरून, दारक दारिका, मंगल परिणय इत्यादी सारखे शब्दप्रयोग करू नयेत साधारणत: कालकथित, दिवंगत, आयुष्यमान आयुष्यमानिनी व ज्यांचे पती हयात नाहीत त्यांना आयुष्यमती असा शब्द प्रयोग करावा.

🔷 प्रत्येक बौद्ध व्यक्तीने दररोज सकाळी आंघोळी नंतर प्रथम वंदना घ्यावी तसेच सायं ७ वा जेथे असाल तेथे वंदना घ्यावी. प्रत्येक गुरूवारी / पौर्णिमा या दिवशी सायं. ७ वा. आणि रविवारी सकाळी ९ वा सामुदायिक वंदना / सुत्रपठण बुद्धविहारामध्ये घ्यावी.

🔷 भिक्खूंना पंचांग प्रणाम करावा.

टिप  : या ( आर्टिकल ) लेखात मधील सर्व विधी “दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया” च्या अधिकृत बौद्धाचार्यांकडून किंवा भिक्खु कडून करून घ्यावेत. आपणास संस्थेचे अधिकृत प्रमाणपत्र मिळेल, वरील ( आर्टिकल ) लेख, भिक्कू संघ आणि भारतीय बॊध्द महासभा यांचा होणाऱ्या विधी नुसार तयार करण्यात आला आहे पूजा विधी मध्ये काही बदल किंवा नवीन नियम लागू झालेलं असू शकतात.त्या संदर्भात कार्यक्रम , विधी नियोजनापूर्वी खात्री करून आपल्या कार्याचे, विधीचे नियोजन करावे .