शाळेच्या अभ्यासक्रमातून दीड हजार वर्षांपूर्वी तीन चिनी प्रवाशांनी भारतामधून प्रवास केला असे वाचले होते. मात्र त्यावेळचा भारत कसा होता हे कुठे वाचायला मिळाले नव्हते. त्या प्रवाशांपैकी एक प्रवासी हुएन त्संग यांनी इ.स. ६२९ ते इ.स. ६४५ या काळात भारतात केलेल्या प्रवासाचे वर्णन चिनी भाषेत लिहिले होते. त्याचे पाहिले भाषांतर M Stanislas Julien यांनी फ्रेंच मधून केले आणि ते १८५७ प्रसिद्ध झाले. यासाठी त्यांनी संस्कृत आणि चिनी भाषेचा २० वर्षांपासून व्यासंग केला होता.
त्यानंतर सॅम्युअल बिल यांनी १८६९ मध्ये Travels of Buddhist Pilgrims हे पुस्तक चिनी भाषेतून इंग्रजी भाषेत भाषांतरीत केले. त्यानंतर थॉमस वॉटर्स हे चीनमध्ये अनेक जबाबदारीच्या पदावर काम करीत असताना त्यांनी On Yuan Chang’s Travels in India हे पुस्तक लिहिले. १९०४ साली त्यांच्या मृत्यूनंतर ते दोन खंडात प्रसिद्ध झाले. त्यांना संस्कृत आणि पालि भाषा येत होत्या.
अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे भारतीय पुरातत्व खात्यात १८७१ ते १८८५ या काळात महासंचालक होते. त्यांनी हुएन त्संग यांच्या प्रवास वर्णनाच्या आधारे भारतात असंख्य ठिकाणी उत्खनन व संशोधन करून बुद्ध व सम्राट अशोक यांच्या अनेक महत्त्वाच्या स्थानांची ओळख निश्चित केली. हे सर्व संशोधक युरोपीय होते. ते चीनचे, भारताचे नव्हते. पण या विद्वानांनी देश, धर्म, संस्कृती यांच्या सीमा ओलांडून केलेले संशोधन भारतावर महान उपकार करणारे ठरले आहे.
हुएन त्संग हे बुद्धांच्या जिज्ञासापोटी प्रवासातील असंख्य संकटे झेलून भारतात आलेले एक बौद्ध भिक्षू होते. त्यांचा आदर्श तरुण पिढीला माहीत व्हावा यासाठी डॉ. आ. ह.साळुंखे यांनी एक सुरेख पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक Journey to the West यावर आधारित आहे. त्याचे अनुवादित केलेले खंड त्यांनी चीन मधून प्राप्त केले. त्याचा त्यांना सदर पुस्तक लिहिताना उपयोग झाला. दीड हजार वर्षापूर्वी भारतातील समाज जीवन कसे होते, हिंदू,बौद्ध व जैन धर्मांची काय परिस्थिती होती याचे प्रत्यक्ष केलेले वर्णन हे निश्चितच वाचण्यासारखे आहे. आज विज्ञानामुळे खुपच बदल झाला असला तरी बौद्ध सोडल्यास इतर भारतीय समाजाची मानसिकता बदलली आहे असे वाटत नाही.
— संजय सावंत buddhistcaves@gmail.com
🙏🙏🙏
Chinese Traveler Huyen Tsang.
More Stories
काश्मीरचा हरवलेला बौद्ध वारसा पुनरुज्जीवित करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरने पहिले-वहिले एकत्रित पुरातत्व अभियान सुरू केले
नवीन दलाई लामा कसे निवडले जातील आणि त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल ?
महाबोधी मंदिराचे एकमेव नियंत्रण बौद्धांना देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली