November 26, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

आयुष्याने त्याला खूप छळले ।

आयुष्याने त्याला खूप छळले ।
✨✨✨🔥✨✨✨🔥✨✨✨

सात रस्त्याच्या चार चाळी , बी. आय. टी. चाळ क्रमांक १ ते ४ मुंबईतील बौद्ध समाजाची प्रसिद्ध वस्ती तिथे असलेला कोकणी आणि दख्खनी वाद सुद्धा तितकाच प्रसिद्ध होता . त्या दिवशी दोन चाळीच्या मध्ये असलेल्या तालमीत आणि बाहेरच्या जागेत सुद्धा माणसाची खूप गर्दी झाली होती . पोर सवदा वयाचा नामदेव ढसाळ नावाचा तरुण घसा ताणुन सांगत होता . बावडा गावात बौद्ध समाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे . बौद्ध समाजा बरोबर सगळे व्यवहार बंद करण्यात आले आहेत . परभणी जिल्हयातील ब्राह्मण गावात आपल्या दोघी भगिनींना पाणी पिण्यासाठी विहीर बाटवली म्हणून त्यांना नग्न करून त्याची गावातून धिंड काढली. हे सगळे आपण गप्प बसून बघणार आहोत का ? की आपण आपापसात भांडत बसणार आहोत ? हे प्रश्न करून तो बोलण्याचे थोडे थांबला उपस्थितानमध्ये शांतता पसरली होती .
नामदेवच बोलून होताच दख्खनी गटाचा पुढारी हिरामण संगारे जो पुढे भाई संगारे नावाने पँथरचा एक नेता आणि फर्डा वक्ता म्हणून प्रशिद्धीस आला. त्याने नामदेवच्या भूमिकेला पाठिंबा देणारे भाषण केले. आणि आज पासून आम्ही आमच्यातल्या दुख्खनी – कोकणी वादाला मुठमाती देत असल्याचे जाहीर केले . त्याच्या या भूमिकेला सर्व उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून पाठिंबा दिला . त्यानंतर कोकणी गटाचा प्रमुख असलेला एक तरुण त्या सर्व परिस्थितीचा अभ्यासपूर्ण विवेचन करून कोकणी – दुख्खनीवाद यापुढे असणार नाही. हे त्यांनी जाहीर करतात पुन्हा टाळ्यांच्या कडकडाटात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकारांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला .

त्या दिवशी कोकणी गटाचा प्रमुख ज्याने भाषण केले . त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले . त्याचे नाव विजय कदम जे माझ्या चांगलेच लक्षात राहिले . सेल्सटॅक्स ऑफीस मध्ये माझ्याबरोबर काम करीत असलेला सुहास पवार बी.आय.टी चाळ क्रमांक १ सात रस्त्यालाच राहत होता . शिवाय आमच्या पुणे जिल्हयातील बरेच नातेवाईक तिथे राहत होते . त्यामुळे पँथरच्या घडामोडीत माझे बऱ्याच वेळा तिकडे जाणे होई . त्या, त्या वेळेला विजय बरोबर गाठभेट होई . सावळ्या वर्णाचा साडेपाच फूट उंचीचा , सदृढ शरीरयष्टी , चेहऱ्यावर मिस्कीलपणा चे भाव , बोलण्यात मार्दव असलेला विजय कदम माझा चांगला मित्र झाला .

एम.ए. पर्यंत शिक्षण झालेला म्हणजे डबल ग्रॅज्युएट झालेला विजय कार्यकर्त्यांच्या बरोबर अगदी जवळकीने वागत असे . त्याचे सर्वांनाच कौतुक वाटे . त्याच्या भोवती जमलेल्या कार्यकर्त्यांना , बाबासाहेबांचे जीवन कार्य , महाडचा सत्याग्रह , भारताचे संविधान इत्यादी प्रसंग सांगताना तो रमून जात असे . देशाचे सरक्षण मंत्री बाबू जगजीवन राम यांच्या टिळक भवन कार्यक्रमात, निदर्शने केली म्हणून पँथरच्या ६२ कार्यकर्त्यांना अटक झाली त्यामध्ये विजय कदम आणि त्याचा लहान भाऊ अशोक सुद्धा होता . ते सगळे कार्यकर्ते सात रस्ता छावणीतील होते. आणि दलित पँथर चळवळीतील ती पहिली अटक म्हणून सात रस्ता छावणीला केंद्रीय छावणीचे महत्व आले होते . आणि विजय कदम छावणी प्रमुख म्हणून प्रकाशाच्या झोतात आला .

विजयला दलित पँथरमध्ये मोठेपण मिळाले . त्याचबरोबर बँक ऑफ इंडियामध्ये प्रमोशनरी ऑफिसर म्हणून कोकणात नेमणूक मिळाली . प्रत्येक शनिवार रविवार मुंबईला आल्याशिवाय त्याला चैन पडत नसे . टॉय लावलेला विजय, कोणत्याही कार्यकर्त्यांच्या गळ्यात हात टांगून गप्पा करताना तो रमून जात असे . पँथरच्या नेत्यांना भेटण्यासाठी इतर पक्षाचे नेते , आमदार सातरस्ता छावणीत येत असत . त्यावेळी त्यांचे स्वागत करणे , बोलणी करणे विजय जबाबदारीने करत असे . त्यामुळे पँथर संघटने विषयी आलेल्या पाहुण्यांचे फार चांगले मत होई . विजयला ते फार फार धन्यवाद देत असत. ते पाहून पँथर कार्यकर्त्याना विजय विषयी आदरयुक्त दबदबा वाटू लागला होता .विजय जीवनातल्या एका उंचीवर पोहोचला असताना , त्याला बँकेने टर्मिनेट केल्याची बातमी कानावर येऊन आदळली . बौद्धांना अधिकारी पदावर टिकू द्यायचं नाही म्हणून माझी नोकरी गेल्याचे तो सांगत होता . पत्नी एक लहान मुलगीचा सांभाळ करण्याची जबाबदारी आणि अधिकारी पदाची नोकरी गेल्याने विजय कोलमडून गेला होता . त्याचबरोबर पँथर संघटनेत पडलेल्या दुफळीचे दुःख त्याला बोचत होते . पँथर त्याविषयी बोलताना तो व्यक्तिगत दुःख विसरून जात होता . आईला फसवून नातेवाईकांनी बी.आय.टी. चाळीतील खोली बळकावली म्हणून बेघर झालेला विजय कांदिवलीला लीव्ह लायसन्स तत्वावर तो राहत होता . शिकवणीचे वर्ग घेऊन दैनंदिन खर्च भागवित होता . मध्यंतरी कुर्ल्याला एका पतपेढीत काम मिळाले तिथे त्याचे जमले नाही . सम्राट पेपर साठी चारकोप व कांदेवली त्याने मोठ्या प्रमाणावर वार्षिक वर्गणीदार मिळविले .

नोकरी मध्ये असताना आपल्याच समाजाच्या गृहनिर्माण संस्थेत सभासद झाला होता . डिफॉल्टर म्हणून सोसायटीने त्याला न कळवता बेकायदेशीर काढून टाकले . बी . आय.टी चाळीची खोली आणि सोसायटीचे सभासदत्व हे दोन्ही प्रश्न कोर्टकचेरी शिवाय सुटणार नव्हते . आणि विजय जवळ बसच्या भाड्याला सुद्धा पैसे नसायचे . ही बातमी सेवानिवृत्तीनंतर वकिली करीत असलेल्या आमच्या जुन्या मित्राला समजली त्याचे नाव उत्तम कांबळेचा जाहागिरदार झालेला .

मध्यंतरी त्याच्या मिस्कील स्वभावाप्रमाणे हसत हसत मुलगा झाल्याची बातमी दिली . विजयची पत्नी आणि तिच्या आईने घर सावरण्यासाठी फार मदत केली . त्याची मुलगी प्राजक्ता एमएसी झाल्यानंतर तिची मदत होऊ लागली . त्याचा मुलगा पुढच्या वर्षी ग्रॅज्युएट होईल .

बी.आय.टी चाळीची खोली आणि सोसायटीचे सभासदत्व ही दोन्ही प्रकरणे अॅड . जहागिरदार स्वखर्चाने लढवीत होते . प्रसंगी विजयच्या खिशात एखादी पाचशेची नोट टाकीत असे. दोन्ही प्रकरणाच्या तारखांना विजयाचा दुसरा मित्र संजय सावंत सोबत करीत होता . विजयला चालताना त्रास होत होता . परंतु कोर्टाच्या प्रकरणात आपण यशस्वी होऊ म्हणून त्याच्या कोर्टाच्या फेऱ्या चालू होत्या . मंगळवारी दि .२० / ०२ / २२ रोजी कोर्टाच्या तारखेला विजय घराबाहेर पडला. तो परत निचेष्ठ होवून घरी परतला. त्याच्या आयुष्याचा प्रवास संपला होता .

एक अभ्यासू आणि सच्चा दलित पँथर विजय कदम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

🙏🙏🙏

आयु सयाजी वाघमारे
दलित पँथर ‘ समाज भुषण’