अजिंठा लेणी ह्या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने २८ एप्रिल, इ.स. १८१९ रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडांत निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स. पूर्व दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धांचे दर्शन स्तूप-रूपांत होते. या व्यतिरिक्त १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते
अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव औरंगाबाद जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. औरंगाबाद शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. ह्या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या आहेत.
बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत. लेणी घनदाट जंगलाने वेढलेल्या आहेत. भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील १२ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा या यादीत समावेश आहे. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इ.स. १९८३ साली घोषित केली आहे. आणि या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान आहे. जून २०१३ मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली असता त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. लेण्यांमधील चित्रांपैकी एका लेण्याचे चित्र भारतीय चलनातील २० रुपयांच्या एका नोटेवर आहे.
अजिंठा लेण्यांत गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार पाहायला मिळतो. अशी ही अजिंठा लेणी देशी पर्यटकांसोबतच प्रामुख्याने विदेशी पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ ठरले आहे. चित्र—शिल्पकलेचा नितांतसुंदर अनुभव देण्याऱ्या या लेण्यांमधून त्या काळात वापरण्यात आलेल्या रंगछटा पर्यटकांना पाहावयास मिळतात.
More Stories
Dhammachakra Pravartan Din 2025 : आज साजरा केला जातोय 69 वा “धम्मचक्र प्रवर्तन दिन”; काय आहे यामागचा इतिहास ? वाचा सविस्तर
Dhamma Dhwaj Vandana धम्म ध्वज वंदना
Dr. Babasaheb Ambedkar Social Contribution डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान