प्राचीन बुद्ध कालीन स्तुपांचा अभ्यासदौरा MBCPR टीम च्या वतीने घेण्यात आला होता , ह्या कार्यशाळेस नागपूर, वर्धा, नाशिक, येथून धंमलिपिचे विद्यार्थी सहभागी झाले होते,
सर्वप्रथम हर्दोलाला बुद्ध स्तूप येथे जाऊन ह्या स्तुपाची माहीती उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली,
त्यापूर्वी येथे त्रिसरण पंचशील घेण्यात आले,
यानंतर स्तुपाची माहिती MBCPR team चे अध्यक्ष सुनील खरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली,
तेथून पवनी स्तूप येथे अभ्यासदौरा घेण्यात आला, यावेळी येथे अवास्तव पडलेल्या अष्टकोनी स्तंभावर असलेल्या धंमलिपिचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले,
𑀉𑀧𑀸𑀲𑀺𑀓𑀸𑀬 𑀯𑀺𑀲𑀫𑀺𑀢𑀸𑀬 𑀤𑀸𑀦𑀀
उपसिकाय विसमिताय दानं
उपसिका विश्वमित्रा हिने ह्या स्तंभाचे दान दिले असा ह्याचा अर्थ होतो,
ह्या अशोक कालीन धंमलिपिचे वाचन करून घेण्यात आले,
ह्या लिपिवरून येथील स्तूप व स्तंभाचा कालावधी आपण काढू शकतो, लिपीमुळे प्राचीन वास्तूंचा काळ शोधणे सोपे होते,
पुरातत्व विभागाची उदासीनता
पवनी येथे बुद्ध कालीन स्तूप असून येथील अष्टकोनी स्तंभ अनेक वर्षांपासून विखुरलेल्या स्थितीत स्तूपाच्या अवतीभवती पडलेले असून याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष असून हे प्राचीन शिल्प व धंमलिपि मधील शिलालेख जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग अतिशय उदासीन दिसून येत आहे, तसेच ह्या स्तुपावर जगन्नाथ यांचे मंदिर बांधून अतिक्रमण केलेले आपणास दिसून येते पुरातत्व विभागाने हे मंदिर पाडून येथील स्तूप उतखनन करून ह्या स्तुपास प्रकाशझोतात आणावे अशी विनंती आम्ही करीत आहोत,
चांडकापुर बुद्ध कालीन स्तूप, येथे देखील पुरातत्त्व विभागाने लक्ष देणे गरजेचे असून हे प्राचीन स्तूपास संरक्षण देणे गरजेचे आहे कारण ह्या स्तुपावर देखील मुस्लिम बांधवांनी अतिक्रमण केलेले दिसून येते, हर्दोलाला बुद्ध कालीन स्तूप हा देखील दुर्लक्षित असून येथे नगर परिषदेने कचरा डेपो सुरू केल्याने ह्या स्तुपाचे पावित्र्य धोक्यात आले असून बौद्ध बांधवांच्या भावनांशी पवनी नगरपरिषद खेळत असून हे कचरा डेपो दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावे अशी मागणी आम्ही दान पारमिता फाउंडेशनच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र बुद्ध लेणी संवर्धन व संशोधन समिती नाशिकच्या/ नागपूरच्या वतीने पुरातत्व विभागास विनंती करत आहोत की ह्या प्राचीन वास्तूंचे जतन करावे व झालेले अतिक्रमणे त्वरित काढून घ्यावे,
धंमलिपि विद्यार्थ्यांनी व लेणी अभ्यासकांनी MBCPR टीमच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या बौद्ध स्थळांना भेटी दिल्यावर शासनातर्फे दुर्लक्षीत असलेल्या महास्तूपाकडे केंद्र व राज्य शासनाने लक्ष देऊन पुरातत्व विभागाने त्याचे संरक्षण करावे व अतिक्रमणे काढावीत अशी मागणी केली आहे,
नुकतीच (१३ मार्च) रोजी धंमलिपि संशोधक ३० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र च्या भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील जगन्नाथ टेकडी महास्तुप, चांडकापुर महास्तूप, हर्दोलाला स्तूप व अडम येथील ऐतिहासिक व प्राचीन स्थळांना भेटी देऊन व्यथा मांडलेल्या आहेत,
असा आहे इतिहास
☸️पवनी चा जगन्नाथ महास्तूप
याचे उत्खनन 1969-70 ला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या नागपूर शाखेचे डॉ एस बी देव व जे पी जोशी ह्यांनी केले. त्याचा रिपोर्ट नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु व्ही बी कोलते ह्यांनी 26 जानेवारी 1972 ला प्रकाशित केला आहे. त्यावेळी येथे अनेक स्तुपावशेष प्राप्त झाले. त्यात दानाभीलेखाचा सुद्धा उल्लेख आहे. येथे मुचलिंद नाग हे शिल्पसुद्धा मिळाले. याच स्तूपावर जगन्नाथाचे मंदिर बांधण्यात आले असून शासनाने अजूनही त्याची पर्यायी व्यवस्था करुन तिथे पुन्हा उत्खनन करण्याचा निर्णय घेतलेला नाही. प्रतिबंधित क्षेत्र म्हणून येथे पुरातत्व विभागाचा फक्त बोर्ड आहे. परंतु स्तुपाचे संरक्षण करण्यासाठी गार्ड, भिंत किव्हा कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. अजूनही तिथे अनेक शिलालेख अस्ताव्यस्त पडलेले दिसून येतात.
☸️अशोक कालीन चांडकापूर महास्तूप
चांडकापूर महास्तूप विटांनी बांधलेला असून त्याची परिक्रमा केल्यास साची स्तूपाच्या बरोबरीचा असल्याचे आजही प्रथम दर्शनी निदर्शनास येतो. सरकारी कागदपत्रांवर येथे बौद्ध स्तूप दाखविण्यात आला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या उत्खननात येथे अस्थिकलश मिळाला असला तरी सरकारच्या वतीने येथे बोर्ड किंवा गार्डची व्यवस्था अजूनही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या स्तूपावर सर्रास गुरेढोरे आजही विचरण करीत असतात.
📚हा ऐतिहासिक वारसा जगाला माहीत व्हावा या उद्धेशाने मागील अनेक वर्षांपासून दरवर्षी 3 फेब्रुवारी ला येथे पवनी परिसरातील नागरिकांच्या वतीने संमेलने भरविल्या जात आहेत. पवनी मध्येच आयटीआय जवळ हर्दोलाला नावाने एक मातीचा प्राचीन स्तुप आहे. हे तिन्ही प्राचीन बौद्ध स्तूप दक्षिणापथ मार्गावर असून हरदोलाला स्तुपावरून ऐका सरळ रेषेत दिसतात. या स्तुपाला क्षती पोहचविण्यासाठी अलीकडे याच्या शेजारीच शहरातील कचरा केंद्राची सुरुवात करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
☸️प्राचीन गुफा, बौद्ध स्थळ अडम
नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील अडम येथे प्राचीन बौद्ध स्तूपांचे स्थळ असून येथे प्राचीन गुफा व पवित्र वारसा असला तरी सरकारच्या दुर्लक्षते मुळे त्या स्तुपाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आजही स्तूपाच्या जागेवर शेती केल्या जाते. मागील अनेक वर्षापासून मागणी असूनही त्या शेतकऱ्याला पर्यायी जागा शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिलेली नाही.
📚पवनी, अडम हा प्राचीन असिक जनपद नावाने व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जायचा. हा मार्ग पुढे नागार्जुन कोंडा, अमरावती पर्यंत जायचा. या ऐतिहासिक स्थळाच्या आधारेच जपान च्या पय्या मेत्ता संघाने भन्ते संघरत्न मानके ह्यांच्या नेतृत्वात येथे भव्य महासमाधी महाविहाराची निर्मिती केली आहे. या स्थळाला यावेळी अभ्यासक विद्यार्थ्यांनी भेट दिली.
📚भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने व त्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जागतिक स्तरावरील बौद्ध वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी व त्याचे जतन करण्याचे कार्य करावे. अशी अपेक्षा याप्रसंगी संशोधन करण्यासाठी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या अभ्यासू विद्यार्थ्यांनी केली आहे. या अभ्यास दौऱ्यात लेणी अभ्यासक/ धंमलिपि तज्ञ सुनील खरे , धंमलिपि विद्यार्थी अलका गवई , करुणा गोडबोले , निरझरा रामटेके, अनामिका हाडके , सुलोचना रामटेके, दीपाली चहांदे, नेहा राऊत , वंदना ओरके , प्रणाली लुटे , शालू गायकवाड, संगीता वागधरे , रजनी डोहाने ,दिव्यांशू मेश्राम , प्रज्ञा गुटके, प्रतिमा खंडारे , पुष्पा बावणगडे , सीमा थूल ,नुरी वाघमारे , सुनीता मेश्राम , श्रुती मेश्राम , श्रेष्टी मेश्राम, ज्योति डोंगरे ,बाबूराव खंडारे आदी सहभागी होते.
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा