महाड येथील कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचा म्हणजेच दिनांक २० मार्च १९२७ च्या महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा वृत्तांत…
(पहा- महाड येथील कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दिनांक १९ मार्च १९२७ रोजी झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षीय भाषण – जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका. )
महाड येथील कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक २० मार्च १९२७ रोजी सकाळी ९ वाजून गेल्यावर परिषदेच्या कामास पुन्हा सुरुवात झाली व खालील ठराव पास झाले :–
गट १ ला
ठराव १ ला – बहिष्कृत वर्गानी चालविलेल्या आत्मोद्धाराच्या चळवळीमुळे वरिष्ठ वर्ग व बहिष्कृत वर्ग यांच्यामध्ये परस्परात तेढ उत्पन्न होऊ नये अशी वरिष्ठ वर्गातील हिंदूंची इच्छा असल्यास ही परिषद त्यांना पुढील सूचना करीत आहे :–
(अ) बहिष्कृत वर्गातील लोक सार्वजनिक स्थळे व पाणवठे यांचा उपयोग करून आपले नागरिकत्वाचे हक्क बजावण्याचा प्रयत्न करीत असताना वरिष्ठ वर्गातील लोक त्यांच्याशी सर्व प्रकारचे व्यवहार बंद करून त्यांच्याविरुद्ध हरताळ जाहीर करतात. तसे न करता अशावेळी वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृत लोकांना सक्रिय साहाय्य करावे.
(ब) वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृतास घरगुती नोकर म्हणून नोकरीस ठेवावे.
(क) जातीभेद मोडण्याचा उपाय म्हणून मिश्रविवाह पद्धतीचा प्रघात सुरू करावा.
(ड) बहिष्कृत वर्गातील गरीब विद्यार्थ्यांचे आपले घरी वार लावून किंवा त्यांच्या भोजनाची तरतूद करून त्यांना मदत करावी.
(इ) मेलेली जनावरे ओढून टाकण्याचे बाबतीत बहिष्कृत लोकांवर अवलंबून न राहता आपली आपणच व्यवस्था करावी.
गट २ रा
ठराव १ ला – मागील कायदेकौन्सिलामध्ये श्री. सी. के. बोले यांनी सार्वजनिक विहिरी व तलावासंबंधानेही ठराव आणला आहे. त्याची सरकारने अंमलबजावणी करून त्या ठिकाणी पाट्या लावण्याची व्यवस्था करावी आणि जरूर तर क्रिमिनल प्रोसीजर कोड सेक्शन १४४ अंमलात आणून स्थानिक पुढार्यांचे जामीन घेऊन अस्पृश्यांना सदरील हक्क उपभोगण्यास मदत करावी.
ठरव २ रा – ही सभा सरकारास अशी विनंती करीत आहे की, खेडेगावी कित्येक ठिकाणी अस्पृश्यांची पाणी पिण्याची अत्यंत गैरसोय होते ती दूर करण्याची व्यवस्था करावी.
ठराव ३ रा – बहिष्कृत लोकांच्या आर्थिक उन्नतीस्तव फॉरेस्ट जमीनी लागवडीस द्याव्या.
ठराव ४ था – अत्यंत मागासलेल्या बहिष्कृत वर्गाचा आर्थिक दर्जा वाढविण्याकरिता व त्यांचे दुःख निवारण करण्याकरिता सरकारने खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे —
(अ) अस्पृश्य वर्गातील अनक्वालिफाईड इसमास जेथे शक्य असेल तेथे सरकारी नोकर्या द्याव्या.
(ब) अस्पृश्य लोकांची लष्करात भरती करावी.
(क) आरमारी खात्यात अस्पृश्य उमेदवार घ्यावेत.
(ड) सेकंड इअर ट्रेन्ड मास्तरास शाळा खात्यात सुपरवायझरच्या जागा देण्यात याव्यात.
(इ) अस्पृश्यांतील साक्षर लोकांस मुलकी पोलीसदलाच्या जागा देण्यात याव्यात.
(फ) अस्पृश्य लोकांची शक्य तितकी जास्त पोलीस खात्यात भरती करावी.
ठराव ५ वा – सरकारी कामानिमित्त रयतेकडून बलुते देण्याची पद्धत बंद करून त्याच्याऐवजी गावकरी लोकांवर सी. पी. वगैरे प्रांतात ज्याप्रमाणे सेस बसविण्यात आला आहे, त्याप्रमाणे येथेही सेस बसवून त्यातून कामगारास मासिक पगार देण्याची पद्धत अंमलात आणावी.
ठराव ६ वा – बहिष्कृत वर्गाची मृत मांस खाण्याची चाल सरकारने कायद्याने बंद करावी. कारण तीमुळे आरोग्यास धोका पोचून बहिष्कृतांचा दर्जा अत्यंत हीनपणाचा ठरतो.
ठराव ७ वा – शिक्षण व दारूबंदी याबाबतीत सक्ती करण्यात यावी.
ठराव ८ वा – श्रीयुत एम. के. जाधव यास डेप्युटी कलेक्टरची जागा न दिल्याबद्दल या सभेस अत्यंत दिलगिरी वाटते.
ठराव ९ वा – १११ व्या पलटणीमध्ये पूर्वी उभारलेल्या फंडात महाड तालुक्यातील नोकरीत असलेल्या गृहस्थांची रक्कम आहे. त्यातून या तालुक्यातील अस्पृश्य वर्गाच्या मुलांसाठी एक बोर्डिंग काढण्यात यावे.
ठराव १० वा – शिक्षणाच्या बाबतीत अधोगतीस गेलेल्या बहिष्कृत समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ खालील गोष्टी अंमलात आणाव्या :–
(अ) शिक्षणाची प्रगती कशी होईल याची चौकशी करण्याकरिता एक कमिटी नेमण्यात यावी.
(ब) जिल्हानिहाय बोर्डिंगे उघडावी.
(क) खाजगी संस्थांनी चालविलेल्या बोर्डिंगास मुलापाठी प्रत्येकी दरमहा रू. १० ग्रँट द्यावी.
(ड) ३० मुले असलेल्या गावी शाळा उघडावी.
(इ) शिष्यवृत्त्या द्याव्या.
गट ३ रा
ठराव १ ला – ही परिषद बहिष्कृत वर्गातील पंचांना पाटलास (वरठ्यास) विनंती करते की मुलांच्या लग्नप्रसंगी ठीकठिकाणच्या पंचांनी खालील गोष्टी अंमलात आणाव्या : —
(अ) २० वर्षाच्या आतील मुलांची व १५ वर्षाच्या आतील मुलींची लग्न करण्याची चाल बंद करण्यात यावी.
(ब) ज्या ठिकाणी शाळा असेल तेथील लोकांनी मुलामुलीस शिक्षण दिलेच पाहिजे अशी पंचांनी ताकीद द्यावी. मोडल्यास दोषास पात्र व्हावे लागेल असा नियम करावा.
(क) पुनर्विवाह करण्यापूर्वी उभयता वधू-वरांची योग्य चौकशी केल्याशिवाय पुनर्विवाह लावू नये.
(ड) पुनर्विवाहामध्ये सात रुपये इलोग द्यावा. आणि लुगडेचोळी, पाटल्याचा जोड, नथ व पंचांचे जेवण याशिवाय पंचांचा कर नसावा.
ठराव २ रा – (अ) अस्पृश्य लोकांनी महारकी वगैरे सारखे हलके धंदे करण्याचे सोडून शेती वगैरे सारखे स्वतंत्र धंदे करण्याची पद्धत जोराने अंमलात आणावी.
(ब) शेतीस जरूर असलेल्या सहकारी पतपेढ्या काढण्यात याव्यात.
(क) दुष्काळ, अतिवृष्टीस तोंड देण्यासाठी व त्याचप्रमाणे सावकाराचे मगरमिठीतून सुटण्यासाठी ” सहकारी गल्ले ” स्थापन करावेत अशी या सभेची बहिष्कृत वर्गास आग्रहाची विनंती आहे.
गट ४ था
ठराव १ ला – स्वामी श्रद्धानंदजींच्या अमानुष खुनाबद्दल या सभेस अत्यंत दुखः होत आहे, व त्यांनी आखून दिल्याप्रमाणे हिंदू जातीने अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करावे.
नंतर अध्यक्ष महोदयांनी समारोप केल्यावर रा. शिवराम गोपाळ जाधव यांनी आलेल्या मंडळींचे व अध्यक्षांचे आभार मानले. त्यास दुजोरा देण्यास रा. अनंत विनायक चित्रे हे उभे राहिले. त्यांनी आभाराच्या ठरावास अनुमोदन दिल्यानंतर परिषदेस उद्देशून असे सुचविले की, आज जी एवढी मोठी महत्त्वाची परिषद भरली आहे, तिने काही तरी महत्वाचे कार्य केल्याखेरीज आपले अधिवेशन संपवू नये असे मला वाटते. या महाड शहरात अस्पृश्य लोकांची पाणी पिण्याची अत्यंत गैरसोय आहे. ही गैरसोय दूर व्हावी म्हणून येथील म्युनिसीपालटीने येथील तळी सर्व जातीच्या लोकास खुली आहेत असे ठरावाने कधीच जाहीर करून टाकिले आहे. परंतु त्या तळ्यावर पाणी भरण्याचा प्रघात अस्पृश्य लोकांकडून अजूनही सुरू करण्यात आला नाही. तो प्रघात जर आज या परिषदेने पाडून दिला तर या परिषदेने एक मोठी महत्त्वाची कामगिरी बजाविली असे म्हणता येईल. तरी आपण सर्वांनी अध्यक्षांसह ( डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर) महाड येथील चवदार तळ्यात प्रवेश करून पाणी घेऊ. त्यानंतर परिषदेतील सर्व लोक अध्यक्षांच्या ( डाॅ. बाबासाहेबआंबेडकरांच्या ) मागोमाग सभामंडपातून बाहेर पडून त्या सर्वांची एक मोठी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक महाड शहरातील पेठेतून अत्यंत शांतपणाने तळ्यावर गेली. (बहिष्कृत भारत : ३ एप्रिल १९२७.)
” डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आता चवदार तळ्याच्या काठावर उभे होते. जगातील पंडितांमधील एक विख्यात पंडितवर्य, उदात्त ध्येयाने प्रेरित झालेले एक थोर हिंदू पुढारी, दलितांचे स्वातंत्र्यसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कृतीक्षेत्रात उतरले. स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात, ते स्वसामर्थ्याने संपादावयाचे असतात. देणगी म्हणून ते लाभत नसतात, हे त्रिकालाबाधित महानुभावाचे प्रत्यक्ष पाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांना देत होते. आत्मोद्धार हा दुसऱ्याच्या कृपेने होत नसतो, तो ज्याचा त्याने करावयाचा असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः कृतिवीर बनून अनुयायांना श्रीगणेशाचा पाठ देत होते. त्यांना सुसंघटित नि प्रतिकारक्षम बनवीत होते. कृतिशूरपणा हा इतिहास घडविणाऱ्या थोर पुरुषांचा देहस्वभाव असतो.
ध्येयाविषयी अढळ श्रद्धा बाळगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितात निष्ठा निर्माण करीत होते. ज्या ध्येयाचा ते उद्घोष करीत राहिले होते, ते ध्येय आता झगड्याच्या अग्निदिव्यातून तावून-सुलाखून निघत होते. डॉ. आंबेडकर आता स्वतः तळ्याच्या काठावर उभे राहिले. ज्या पाणवठ्यावर पशु-पक्षी आपली तहान भागवीत, त्यातले पाणी पिऊन आपली तहान भागविण्यास ज्याला आपल्या पुण्यभूमीत नि मायभूमीत मज्जाव होता, ज्याला सार्वजनिक स्थळे नि देवळे ह्यांची द्वारे बंद होती, असा तो महापुरुष हिंदूधर्म मार्तंडांचा नि हिंदूधर्ममतांचा ढोंगीपणा भारताच्या वेशीवर टांगीत होता. सर्वाभूती परमेश्वर आहे असा धर्मप्रणित उद्घोष उच्चरवाने करणाऱ्या नि कुत्र्या – मांजरांना जवळ करीत असताही स्वधर्मियांना पशुहून नीच मानणाऱ्या त्या घोर पातक्यांचे अघोर पातक तो क्रांतिपुरूष जगाला उघड करून दाखवीत होता.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चवदार तळ्याच्या पायऱ्या उतरून खाली गेले. ते खाली वाकले आणि त्यांनी तळ्यातील एक ओंजळ भर पाणी प्राशन केले. त्या प्रचंड जनसमुदायाने आपल्या नेत्याचे अनुकरण केले ! त्यांनी आपला नागरी हक्क, त्याचप्रमाणे मानवी हक्क बजावला. लागलीच परिषदेच्या ठिकाणी मोर्चा शांतपणे परतला नि विसर्जन पावला. नेत्याने योग्य वेळी कृतिपूर्ण पाऊल टाकले पाहिजे. जे काम शेकडो ठरावांनी होत नाही ते अशा एका कृतीने सफल होते. कार्लाईलने म्हटलेच आहे की, ” कृती हे मानवाचे खरे उद्दिष्ट होय. ”
अशा प्रकारे प्रचंड कार्य करून परिषद समाप्त झाली. जो तो घरी परतण्याच्या तयारीला लागला. भारताच्या तीन सहस्त्र वर्षांच्या इतिहासातील परममंगल असा तो भाग्याचा दिवस. माणुसकीचा अन् समानतेचा संदेश भारतास देणारा तो सोन्याचा दिन २० मार्च १९२७ हा होय ! डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील परम भाग्याचा तो दिवस. त्या दिवसापासून डॉ. आंबेडकरांच्या कीर्तीच्या लाटा एकामागून एक सर्व देशभर पसरत गेल्या. ” (डाॅ. बाबासाहेब आंबेडकर : धनंजय कीर, पृष्ठ क्र. ७५-७६)
महाड येथील वरिष्ठ वर्गाच्या लोकांचा अत्याचार
परिषद संपल्यानंतर अध्यक्ष व इतर मुंबईची पाहुणे मंडळी जेथे उतरली होती तेथे म्हणजे सरकारी बंगल्यावर गेली व बाकीचे लोक आपापल्या गावी जाण्याकरिता निघण्यापूर्वी भोजनगृहाकडे गेले. सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास विरेश्वराचे देवळातील गुरव “अस्पृश्यलोक विरेश्वराच्या देवळात शिरणार आहेत. तरी तुम्ही धावून देवळाचे संरक्षण करण्यास चला,” अशी खोटी दवंडी गावात देत सुटला. अस्पृश्य वर्गांनी तळे बाटविले याचा वचपा काढण्यासाठी सिद्ध असलेल्या वरिष्ठ वर्गाच्या लोकास हे आयतेच निमित्त मिळाले. दवंडी ऐकल्याबरोबर चार/पाचशे लोक विरेश्वराच्या देवळात काठ्या सोटे घेऊन जमा झाले व देवळात अस्पृश्यलोक शिरणार आहेत असा गोंगाट करू लागले. हे पाहून शहर फौजदार डाक बंगल्यावर आले व डॉ. आंबेडकरांना विचारू लागले की, “आपले लोक देवळात शिरणार आहेत यास्तव शहरातील लोकांनी देवळाजवळ गर्दी केली आहे तर मी त्यांना काय सांगू ? ” यावर डॉ. आंबेडकरांनी त्यास सांगितले की, “आम्हाला देवळात शिरण्याची इच्छा नाही व जरुरीही नाही तरी तुम्ही लोकांची या बाबतीत खातरजमा करून त्यास शांत करावे.” फौजदार निघून गेल्यानंतर आपल्या लोकांना ताकीद देण्यासाठी आपल्यातील काही लोकास भोजनगृहाकडे पाठवले. त्याप्रमाणे परिषदेस आलेले अस्पृश्यलोक आपापले जेवण आटोपून आपापल्या गावी जाण्यास सिद्ध झाले. बरेच अस्पृश्यलोक आपापल्या गावी गेल्यानंतर देवळाजवळ जमलेल्या गावगुंडांनी पेठेतून घरोघरी जात असलेल्या अस्पर्श लोकांवर हल्ला केला व बऱ्याच लोकास जखमा झाल्या. इतका अतिप्रसंग होईतोपर्यंत महाडचे मामलेदार यांनी गर्दी कमी करण्याचा काहीच उपाय अंमलात आणल्याचे दिसले नाही. शेवटी सायंकाळी ४-१५ च्या दरम्यान मामलेदार साहेब पोलीस सबइन्स्पेक्टरसह डाक बंगल्यावर आले व डॉ. आंबेडकरांना म्हणू लागले की, आपण शांतता राखण्यास आमच्या बरोबर चला. तुमच्या लोकास तुम्ही समजवा व आमच्या लोकास मी समजावतो. खरे म्हटले असता त्यावेळी अस्पृश्य लोकांस समजावण्याचे काही कारणच नव्हते. कारण जमलेल्या अस्पृश्य लोकांच्या अफाट जनसमूहानी शांतता कधीच मोडली नव्हती. शिवाय बरेचशे अस्पृश्य लोक शहराबाहेर निघूनही गेले होते. तरी पण मामलेदार साहेबांच्या सांगण्याप्रमाणे डॉ. आंबेडकर व त्यांच्याबरोबर बंगल्यावर उतरलेली इतर मंडळी शहराकडे जाण्यास निघाली. वाटेत विरेश्वराच्या देवळाजवळ वरिष्ठ वर्गाच्या जमलेल्या लोकांनी त्यास अडविले व त्यांच्यातर्फे डिंगणकर व तुळजारामशेठचा भाऊ चुनिलाल हे देवळाच्या बाबतीत खुलासा करा वगैरे प्रश्न विचारु लागले. त्यास डॉ. आंबेडकरांनी फौजदारास जे उत्तर दिले तशाच प्रकारचे उत्तर दिले. परंतु लोक शांत होतील अशी वर्तणूक ठेवण्याऐवजी लोकांची मने प्रक्षुब्ध होतील अशारीतीचा वाद करण्यास त्यांनी सुरुवात केली. म्युनिसीपालिटीचा ठराव तो काही लोकांचा ठराव नाही, तुम्ही तळ्यावर गेलात ते आम्हाला अगोदर सूचना देऊन का गेला नाहीत वगैरे वगैरे प्रश्नांचा मारा करू लागले. तोंडास तोंड देण्यात अर्थ नाही हे जाणून डॉ. आंबेडकरांनी व त्यांच्याबरोबरच्या मंडळींनी पुढे जाण्यास सुरुवात केली. वाटेत ” अस्पृश्य लोक देवळात शिरले रे शिरले ” अशी ओरड करीत काही लोक धावपळ करू लागले. मॅजिस्ट्रेटसाहेब यांनी हे प्रत्यक्ष पाहिले असताना त्यांना कैद करण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. उलट हशावरी ती गोष्ट घालवून दिली ! शेवटी ज्या अस्पृश्य लोकांची समजूत घालण्याकरिता डॉ. आंबेडकरांना नेण्यात आले होते त्यापैकी एकही अस्पृश्य तेथे नव्हता हे पाहून डॉ. आंबेडकर व त्यांच्याबरोबरची मंडळी बंगल्यावर परत आली. तो तेथे अदमासे १०० अस्पृश्य लोक जमून बसले होते. त्यात काही जखमी झालेले लोक होते. हा प्रकार दृष्टीस पडेतोपर्यंत दंगलीचा शेवट रक्तपातात झाला याची कोणास कल्पनाही नव्हती ! ही कल्पना झाल्यानंतर अस्पृश्यातील पुढारी लोकास, एका गोष्टीचा मोठा अचंबा वाटला. तो हा की, दंग्याच्या दिवशी मॅजिस्ट्रेट शहरात हजर असताना दंग्यास वेळीच आळा का घालता आला नाही. परंतु तो विचार करण्याचा प्रसंग नव्हता. सर्व गोष्टी बाजूला ठेवून आधी जखमी झालेल्या लोकांस हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली व तेथून त्यांना घेऊन पोलिस चौकीवर त्यांच्या फिर्यादी गुजरण्यात आल्या. पुरावा गोळा करण्याचे काम अत्यंत बिकट असे होते. वरिष्ठ वर्गाचे लोक एक कटाने वागत असल्यामुळे खरे सांगण्यास कोणी पुढे येईना. अस्पृश्य वर्गातील लोक भीतीने गांगरून गेल्यामुळे नावे सांगण्यास धजेनात. अशा परिस्थितीत मुंबईहून गेलेल्या पुढारी लोकांनी दोन दिवस राहून शक्य तेवढा पुरावा गोळा करण्याची व्यवस्था केली. स्थानिक पोलिसांचा उत्साह आरोपी लोकास कायद्याने ठरविलेले प्रायश्चित्त भोगावयास लावण्याच्या कामी अगदी कमी दिसला. हे पाहून नामदार गव्हर्नर साहेब व जिल्ह्याचे कलेक्टर यांच्याकडे झालेल्या हकीकतीचा संदेश तारेने पाठविण्यात आला व पोलिसांस या बाबतीत योग्य ताकीद देण्यात यावी असे सुचविण्यात आले होते. या मारामारीच्या आगीचा वणवा महाड शहराच्या बाहेरही पसरला होता असे दिसून आले. शहरातील मारामारी थंडावल्यानंतर वरिष्ठ वर्गातील काही दुष्ट लोकांनी आजूबाजूच्या काही खेड्यातील मराठे लोकांस निरोप पाठविला की, तुमच्या गावावरून महार लोक जेव्हा परततील तेव्हा त्यास ठोक द्या. त्याचप्रमाणे या दुष्ट लोकांनी लांबलांबच्या खेडेगावापर्यंत ” महाडचे तळे अस्पृश्यांनी बाटविले, तुमच्या विहिरी तरी सांभाळा. ” अशाप्रकारचे चिथविणारे लेखी संदेश पाठविले. याचा परिणाम असा झाला की, ही आग सर्वत्र पसरली व दरेक गावात अस्पृश्य लोक इतर समाजाच्या दृष्टीने अल्पसंख्यांक असल्याने सर्वच ठिकाणी त्यांना मार खावा लागला. काही ठिकाणी तर त्यांना जबर दुखापतीही झाल्या.
या लोकांचा बचाव व्हावा म्हणून ज्या गावामधून अशा प्रकारचे अत्याचार झाले व ज्या ज्या लोकांनी केले अशांची एक यादी तयार करून कुलाबा जिल्ह्याचे पोलीस सुपरिंटेंडेंट यांच्याकडे पाठविण्यात आली. इतके झाल्यानंतर मंगळवारी सकाळी मुंबईतील लोक अधिक रजा नसल्याकारणाने परत आले. डॉ. आंबेडकर व चित्रे हे मागे राहिले. त्यांनी डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडंटची पुन्हा गाठ घेऊन झालेली सर्व हकीकत कळविली व पोलिसांनी अस्पृश्य लोकांचा तरणोपाय होण्यास काय काय केले पाहिजे हे समजावून सांगितले. मंगळवारी संध्याकाळी महाड शहरातील ब्राम्हणेतर पुढारी यांची एक खाजगी बैठक बोलाविण्यात आली. झालेल्या महाड येथील दंग्यात ब्राह्मणेतरांनी विशेष पुढाकार घेतल्याचे दिसून आल्यावरून, त्यांच्या पुढाऱ्यांकरवी अशा दुष्ट कृत्यास आळा घालण्याची काही तरी उपाययोजना व्हावी या हेतूने ही खाजगी बैठक बोलावण्यात आली होती. परंतु खेदाची गोष्ट आहे की, एक दोन माणसे खेरीज करून अशा प्रकारच्या वर्तनास आळे घालण्याचे कामी सर्वांनीच अंग झटकले. एवढा खटाटोप करून चित्रे व आंबेडकर बुधवारी मुंबईस परत आले. ही परिषद कोणत्याही दृष्टीने पाहता महत्त्वाची झाली यात संशय नाही. तिचे परिणाम बरे की वाईट हे कालांतरानेच ठरेल. परंतु ती परिणामकारक झाली असे म्हणावयास हरकत नाही.
परिषद यशस्वी करण्याचे कामी तसेच मारामारी होऊन जखमी झालेल्या लोकांना मदत करण्याचे कामी महाड येथील चांद्रसेनीय कायस्थ जातीतील तरुण पिढीने जी अंगमेहनत केली त्याबद्दल कुलाबा जिल्ह्यातील अस्पृश्य वर्ग त्यांचा सदैव ऋणी राहील. (बहिष्कृत भारत : ३ एप्रिल १९२७)
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
🔷डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान Social Contribution of Dr. Babasaheb Ambedkar
ब्रेकिंग चेन्स ऑफ फेट: आंबेडकरांचे सामर्थ्य तत्त्वज्ञान.
आंबेडकरांचा मैत्रीचा आदर्श.