दीघनिकाय मधील महावग्गपालि मधे भ.बुद्ध भिक्खुंना संदेश देताना म्हणतात –
चरथ, भिक्खवे, चारिकं बहुजनहिताय बहुजनसुखाय लोकानुकम्पाय अत्थाय हिताय सुखाय देवमनुस्सानं…
म्हणजेच भक्खुंनो, सतत फिरत रहा (एका प्रदेशातून दुसऱ्या किंवा एक गावांवरून दुसऱ्या गावी) बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करीत, त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग सांगा….
मात्र आज अनेक भिक्खू एखाद्या विहारामध्ये किंवा एखाद्या संस्थांमध्ये एकाच जागी ठाण मांडून बसलेले दिसतात. अनेकजण तर स्वतःच एखादी संस्था काढतात आणि स्वयंघोषित अध्यक्ष होतात….काहीजण एखादी संस्था हडप करताना दिसतात. पुण्यातील एका “महाभाग” चिवरधारी भिक्खूने तर निवडणूक पण लढवली होती! (महाभाग हा शब्द मुद्धाम वापरलाय)…अनेक भिक्खुंचे प्रत्येक “कार्याचे” रेट ठरलेले असतात!
माझ्या महितीतले काही बौद्ध भिक्खू मात्र खूप चांगले, शीलवान आहेत आणि त्यांचे आचरण देखील विनया प्रमाणे आहेत, मात्र बहुसंख्य भिक्खू हे वर सांगितल्या प्रमाणे आहेत.
खरं तर भिक्खुंनी कुठल्याही संस्थेत कुठलेच पद स्वीकारू नये. त्यांनी एक मार्गदर्शक म्हणून काम करावे. कुठल्याच संस्थेच्या कारभारात लुडबुड करू नये किंवा आपला हक्क गाजवू नये. त्यांनी फक्त बुद्धांचे विचार लोकांच्या कल्याणकरिता, अनुकंपनेच्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत पोहचवावे. उपासक आहेत ना त्यांची सर्व काळजी घ्यायला. त्यांना कुठे जायचे असेल तर ज्या ठिकाणी त्यांचे वास्तव असेल (2 ते 3 दिवसांकरिता) तेथील उपासक त्यांची सोय करतील, भोजनदान देतील, पुढच्या प्रवासाची सोय करतील.
भ.बुद्धांच्या काळापासून ते नालंदा महाविहार अस्त होईपर्यंत (इ.स.पूर्व ४०० ते इ.स. ११००) पर्यंत एकही भिक्खू कोणत्याच संस्थेचा अध्यक्ष अथवा पद धारक नव्हता. नालंदा मध्ये महस्थाविर हे कुलगुरू असत पण नालंदा महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे उपासक अथवा त्या त्या काळातील राजाचे प्रतिनिधी असत.
बुद्ध लेणीं मध्ये राहणारे वृद्ध स्थाविर हेच तेथील भिक्खुंना प्रशिक्षण देत मात्र तेथील व्यवस्थापन देखील उपासकच (दानदाते) करीत.
मग आजच्या काळातील भिक्खू हे पदाला का बरे चिकटून आहेत? त्यांना या पदांचा मोह कशासाठी? त्यांना धनाची लालसा का?
निब्बाण ची व्याख्या करताना बुद्ध म्हणतात – रागक्खयो, दोसक्खयो, मोहक्खयो नामं निब्बाणं म्हणजे रागाचा (वासनांचा) क्षय, दोषाचा क्षय आणि मोहाचा क्षय म्हणजेच निब्बाण.
“मिलिंद पञ्ह” मध्ये धम्माचा ऱ्हास का होतो याचे उत्तर देताना पाहिले कारण भन्ते नागसेन देतात – धम्म सांगणारा (आचारणारा) प्रशिक्षित (योग्य) नसेल तर…
निब्बाणाच्या मार्गावर चालणारे भारतीय भिक्खू, स्वतःतील राग, द्वेष, मोह त्याग करून, बुद्धांचा संदेश आचरणात आणतील का? आणि उपासक डोळस आणि अभ्यासक होतील का?
अतुल भोसेकर
9545277410
More Stories
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न काय होते ? ते पूर्ण झाले का ?
भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर की बी.एन. राव – ऐतिहासिक सत्याचे सखोल विश्लेषण Dr. Babasaheb Ambedkar or B.N. Rao – An in-depth analysis of historical truth
बौद्ध अतिरेकीपणाचा धोकादायक उदय: ‘निर्वाण प्राप्त करण्यासाठी वाट पाहावी लागू शकते