August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – १४. संघाशी संघर्ष

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड :  भाग पहिला  – जन्म ते प्रव्रज्या.

🌼१४. संघाशी संघर्ष 🌼

१. सिद्धार्थाला शाक्य संघाचे सदस्य होऊम आठ वर्षे झाली होती.

२. तो संघाचा समर्पित आणि निष्ठावान सदस्य होता. तो स्वतःच्याबाबतीत जेवढी रुची घेत असे तेवढीच रुची त्याला संघाच्या कार्यकलापातही होती. संघ सदस्य म्हणून त्याची वर्तणूक आदर्श होती. तो सर्वांना प्रिय होता.

३. आठव्या वर्षी एक घटना घडली. ती शुद्धोदनाच्या कुटुंबाकरिता दुःखाचे आणि सिद्धार्थाच्या जीवनाला निर्णायक वळण देणारे निमित्त ठरली.

४. या दुःखान्त घटनेचे मूळ असे आहे :

५. शाक्यांच्या राज्याच्या सीमेवरच कोलीयांचे राज्य होते. या दोन्ही राज्याच्या सीमा रोहिणी नदीने विभाजित केल्या होत्या.

६. रोहिणीचे पाणी शाक्य आणि कोलीय दोघेही ओलिताकरिता उपयोगात आणीत असत. प्रत्येक हंगामप्रसंगी शाक्य आणि कोलीयात रोहिणीचे पाणी प्रथम कोणी आणि किती घ्यावे याविषयी विवाद होत असे. अनेकदा या विवादाचा परिणाम भांडणात तर काही वेळा युद्धातही होत असे.

७. सिद्धार्थ २८ वर्षाचा झाला. त्यावर्षी शाक्यांच्या सेवकात आणि कोलीयांच्या सेवकात पाण्यावरून मोठा संघर्ष झाला. संघर्षात दोन्ही पक्षातील लोक जखमी झाले.

८. जेव्हा शाक्य आणि कोलीय यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा दोन्ही पक्षांनी या विषयाचा युद्धाने कायमचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरविले.

९. म्हणून कोलीयांविरुद्ध युद्ध घोषित करण्याच्या हेतूने शाक्य सेनापतीने शाक्य संघाची सभा आमंत्रित केली.

१०. संघ सदस्यांना उद्देशून सेनापती म्हणाले, “कोलीयांनी आपल्या लोकांवर आक्रमण केले. आपल्या पुरुषांना माघार घ्यावी लागली. अशाच प्रकारच्या कोलीयांच्या आक्रमणाच्या अनेक घटना मागेही घडल्या आहेत, आतापर्यंत अशा आक्रमणांप्रति आम्ही सहिष्णुताच व्यक्त केली आहे. परंतु असे किती काळ चालू द्यावयाचे ? हे थांबलेच पाहिजे. हे थांबविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोलीयांविरुद्ध युद्धघोषणा करणे होय. संघाने कोलीयांविरुद्ध युद्धाची घोषणा करावी असा प्रस्ताव मी मांडतो. ज्यांना विरोध करावयाचा असेल त्यांनी बोलावे.”

११. सिद्धार्थ गौतम आपल्या स्थानी उभा राहिला आणि म्हणाला, “मी या प्रस्तावाचा विरोध करतो. युद्ध हे कोणत्याही समस्येचे समाधान नाही. युद्धघोषणा केल्याने आपला हेतू सफल होणार नाही. युद्धाने दुसऱ्या युद्धाची बीजे मात्र पेरली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा कोणीतरी भेटतोच विजेत्यालाही त्याच्यावर विजय मिळविणारा भेटतोच जो दुसऱ्यांना लुटतो त्यालाही लुटलेच जाते.”

१२. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, “मला असे वाटते की संघाने कोलीयांविंरुद्ध युद्धघोषणा करण्याची घाई करू नये. प्रथम कोणत्या पक्षाचा दोष आहे हे प्रस्थापित करण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी करणे आवश्यक आहे. प्रथम आपल्या माणसांनीच आक्रमण केल्याचे मी ऐकले आहे हे सत्य असेल तर आपण सुद्धा दोषमुक्त नाही हे सिद्ध होते.”

१३. सेनापती उत्तरले, “होय आमच्या माणसांनीच आक्रमण केले. पण येथे हे विसरले जाऊ नये की, यावेळी प्रथम पाणी घेण्याची आमची पाळी होती.”

१४. सिद्धार्थ गौतम म्हणाला, “हे आम्हीही पूर्णपणे दोषमुक्त नाही हेच दर्शविते. म्हणून मी असा प्रस्ताव मांडतो की, आपण आपली दोन माणसे निवडावी, कोलीयांना सूचित करावे की, त्यांनी त्यांची दोन माणसे निवडावी. या चौघांनी मिळून एक पाचवा माणूस निवडावा आणि या पाचही माणसांनी मिळून हा विवाद संपुष्टात आणावा.”

१५. मूळ प्रस्तावाला सिद्धार्थाने ही दुरुस्ती सुचविली होती. तिला विधिवत् अनुमोदन दिले गेले. परंतु सेनापतींनी या दुरुस्तीला विरोध केला. ते म्हणाले, ‘कोलीयांना कठोर शिक्षा केल्याशिवाय त्यांचा हा उपद्रव कधीच थांबणार नाही.’

१६. म्हणून मूळ प्रस्ताव आणि त्यावरील दुरुस्ती प्रस्ताव दोन्हीही मताला टाकण्यात आले. सिद्धार्थाने मांडलेला दुरुस्ती प्रस्ताव प्रथम मतास टाकण्यात आला आणि तो प्रचंड बहुमताने फेटाळण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.

१७. सेनापतींनी नंतर आपला प्रस्ताव मतास टाकला सिद्धार्थ गौतम पुन्हा त्या प्रस्तावाचा विरोध करण्यास उभा राहिला तो म्हणाला, ‘मी संघाला, प्रार्थना करतो की, संघाने हा प्रस्ताव स्वीकारू नये. शाक्य आणि कोलीय एकमेकांचे निकट संबंधी आहेत. त्यांनी एक दुसऱ्याला नष्ट करणे शहाणपणाचे ठरणार नाही.’

१८. सिद्धार्थ गौतमाच्या प्रार्थनेचा सेनापतींनी प्रतिवाद केला त्यांनी यावर भर दिला की, ‘युद्धात क्षत्रिय स्वकीय आणि परकीय असा भेद करीत नसतात. त्यांनी आपल्या राज्यासाठी स्वकीयांशी जरी लढावे लागले तरी लढलेच पाहिजे.’

१९. “यज्ञ करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार उदीम हा वैश्यांचा धर्म आहे. सेवा करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्गाने आपल्या धर्माप्रमाणे कर्म करणे यातच त्या वर्गाचे कल्याण आहे. हीच शास्त्रांची आज्ञा आहे.”

२०. सिद्धार्थ उत्तरला, “धर्म मला जो समजला तो असा की, शत्रुत्वाने शत्रुत्वाचा नाश होत नाही. शत्रुत्वावर फक्त मैत्रीनेच विजय संपादन करता येतो.”

२१. अत्यंत अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाले, “या क्षणी अशी तत्त्वज्ञानमूलक दार्शनिक स्वरूपाची चर्चा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मूळ मुद्दा असा आहे की, सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. माझ, प्रस्ताव मताला टाकावा व त्यावर संघाची प्रतिक्रिया जाणून घ्यावी.”

२२. याप्रकारे सेनापतींनी आपला प्रस्ताव मतास टाकला. तो प्रस्ताव प्रचंड बहुमताने पारित झाल्याचे घोषित करण्यात आले.

The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म