November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – ९. पुत्रसंरक्षणार्थ पित्याची योजना

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड :  भाग पहिला  – जन्म ते प्रव्रज्या.

🌼 ९. पुत्रसंरक्षणार्थ पित्याची योजना 🌼

१. आपला पुत्र विवाहबंधनात बांधला गेला. त्याने गृहस्थजीवनात प्रवेश केला हे पाहून राजा आनंदित झाला. परंतु असितमुनीची भविष्यवाणी मात्र त्याला निरंतर अस्वस्थ करीत होती.

२. ही भविष्यवाणी सत्य होऊ नये यासाठी त्याने असा विचार केला की, गौतमाला जीवनाचे भौतिक सुख व भोगविलास यात गुंतवून ठेवावे.

३. या उद्देशाने प्रेरित होऊन शुद्धोदनाने आपल्या पुत्राच्या निवासासाठी तीन विलासप्रासाद
बांधले : एक मीष्मऋतूकरिता, दुसरा वर्षाऋतूकरिता तर तिसरा शीतऋतूकरिता. हे तीनही विलासप्रासाद आमोद प्रमोद आणि भोगविलासी भावनांना भडकविणाऱ्या साधन प्रसाधनांनी युक्त होते.

४. प्रत्येक विलासप्रासादा भोवती विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या उद्यानात सर्व प्रकारच्या वृक्षवल्ली, फलपुष्पांनी बहरलेल्या होत्या

५. राजाने आपला पुरोहित उदायी याचेशी विचारविनिमय करून आपल्या पुत्रासाठी, अनेक सुंदर युवतींनीयुक्त अशा अंत:पुराची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला.

६. त्या षोडशींनी राजपुत्राला भौतिक सुखात, भोगविलासात गुंतविण्याचा आपला हेतू कशाप्रकारे पूर्ण करावा यासाठी उदायीने त्यांना मार्गदर्शन करावे असे राजाने सुचविले.

७. अंतःपुरातील सर्व मुलींना एकत्र बोलावून उदायीने प्रथम त्यांना राजपुत्राला कसे वश करावे याचा मंत्र सांगितला.

८. त्यांना उद्देशून उदायी म्हणाला, “तुम्ही सर्व या कलेत कुशल आहात. तुम्हा सर्वांना भोगविलासाची भाषा चांगली अवगत आहे. तुम्ही सर्व सुंदर आहात, तुमचे हावभाव चित्ताकर्षक आहेत तुम्ही तुमच्या कलेत निपुण आहात.

९. त्या तुमच्या मोहनी अस्त्रांनी तुम्ही, ज्यांनी आपली कामतृष्णा जिंकली आहे अशा संन्याशांनाही विचलित करू शकता; ज्यांना दिव्य अप्सराच मोहात पाडू शकतात अशा देवतानाही तुम्ही आपल्या मोहपाशात गुंतवू शकता.

१० “तुमचे हृदयीच्या भावना व्यक्त करणारे कौशल्य, तुमचे लोभसवाणे रूप, तुमचे भुरळ पाडणारे हावभाव, आणि तुमचे मोहक सौंदर्य स्त्रीलाही मोहात पाडू शकते. पुरुषाची तर बिशाद काय !

११. “आपापल्या कलेत तुम्ही एवढ्या निष्णात आहात की, राजपुत्राला आपल्या मोहपाशात बांधणे, त्याला भुरळ पाडणे, याला यौवनानुरूप सौंदर्याचा दास बनविणे तुमच्या आटोक्याच्या बाहेर नसणार

१२. “लज्जा, संकोचाने नजर खाली करणे नव परिणीत वधूलाच शोभा देते. तुम्हाला नव्हे.

१३. “हा वीर जरी आपल्या ऐश्वर्यसंपन्न तेजाने महान असला तरी स्त्रीशक्ती महान आहे आणि
हाच तुमचा संकल्प असला पाहिजे.

१४. “पुरातन काळी देवतांनाही ज्यावर विजय प्राप्त करणे अशक्य होते. अशा संन्याशाला काशीच्या एका सौंदर्यवती गणिकेने पथभ्रष्ट केले व आपल्या चरणांशी लोळण घेण्यास भाग पाडले.

१५. “आणि ज्याने अत्यंत कठोर तपश्चर्या केली अशा महान तपस्वी विश्वामित्राला घृताची नावाच्या अप्सरेने दहा वर्षापर्यंत आपल्या मोहपाशात गुंतवून ठेवले आणि आपला बंदी म्हणून जंगलात वास्तव्य करण्यास भाग पाडले.

१६. “अशाप्रकारे अनेक ऋषिमुनींची तपस्या सौंदर्यवतींनी भंग केली. या सुकोमल राजपुत्राने तर नुकतेच तारुण्यात पदार्पण केले आहे. मग त्याची काय कथा !

१७. “सत्य हे असे आहे. करिता राजघराण्याची वंश परंपरा खंडित होऊ नये म्हणून तुम्ही धैर्याने आपली सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे.

१८. “सामान्य स्त्रीने सामान्य पुरुषाला वश करावे यात नवल ते काय । परंतु ती स्त्री धन्य आहे जी श्रेष्ठ, कठोर असाधारण, असामान्य पुरुषाला वश करू शकते.”

The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म