” एकदा भगवंतास लोहित नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला की, तू सगळ्यांना विद्या का शिकवितोस. त्यावर भगवंताने त्याला सांगितले कि, ज्याप्रमाणे मनुष्यप्राण्याला अन्नाची जरुरी आहे, त्याचप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे. ही विचारसरणी प्रथम बुद्धांनी या भुतलावर सुरू केली. विद्या ही एक प्रकारची तलवार आहे. ही दुधारी असते. तिने दुष्टांचा संहार ही करता येतो व दृष्टांपासून आपले रक्षण ही करता येते. म्हटलेच आहे की-
स्वदेशे पुज्यते राजा |
विद्वान सर्वत्र पुज्यते |
तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात; पण माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. विद्या बरोबर भगवान बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा म्हणजेच शहाणपणा, शील म्हणजे सदाचरणानं संपन्न असं आचरण, करुणा म्हणजे सर्व मानव जातीसंबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणीमात्रांविषयीची आत्मियता, त्या चार पारमिता असल्या पाहिजेत. तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे. विद्येेबरोबरच मानवाजवळ जर करूणा नसली तर तो कसाई आहे, असे मी समजतो. करुणा म्हणजे माणसामाणसावरचं प्रेम! त्याच्यापुढे ही मनुष्य गेला पाहिजे व त्याने मैत्री संपादन केली पाहिजे. ही विचारसरणी जर कोणी मांडली असेल तर ती भगवान बुद्धांनीच होय. मी माझ्यासारखा विद्वान भारत वर्षात पाहू इच्छितो.
विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्त्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे आणि या मार्गाने एकट्यानेच जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखूनच गेले पाहिजे.’महाजनो येन गत: सपन्थ:’ही पर प्रत्ययनेय बुद्धी सोडून विवेकाने, जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच मार्गाने यापुढे गेले पाहिजे.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-३, पान नं. ४५८)
औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील बोधिमंडळाच्या विद्यमाने दि.१२ डिसेंबर १९५० रोजी आयोजित सभेत विद्यार्थ्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन – आयु. प्रशांत चव्हाण सर.
विद्या,प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे

More Stories
मुलांना शिक्षण देण्यात कसूर करू नका – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
आंबेडकरानंतर बौद्ध समाज
बौद्ध धम्मात धर्मांतर