📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग पहिला – जन्म ते प्रव्रज्या.
🌼 ८. विवाह 🌼
१. दण्डपाणी नावाचा एक शाक्य होता. यशोधरा त्याची कन्या यशोधरा आपले शील आणि सौंदर्य याबद्दल ख्यात होती.
२. यशोधरेने आपले सोळावे वर्ष पूर्ण केले. दण्डपाणी तिच्या विवाहाचा विचार करू लागला
३. प्रथेप्रमाणे दण्डपाणीने आसपासच्या राज्यात कन्येच्या स्वयंवराप्रीत्यर्थ निमंत्रणे पाठविली.
४. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रित करण्यात आले होते.
५. सिद्धार्थ गौतमानेही आपले सोळावे वर्ष पूर्ण केले होते. त्याचे मातपिताही त्याच्या विवाहाविषयी आतुर होतेच
६. त्यांनी सिद्धार्थाला स्वयंवराला जाण्याचे आणि यशोधरेचे पाणिग्रहण करण्याचे सुचविले. त्याने आपल्या माता-पित्याची इच्छा मान्य केली.
७. स्वयंवरासाठी उपस्थित युवासमुदायातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमाची निवड केली.
८. या निवडीवर दण्डपाणी काही फारसा संतुष्ट नव्हता. त्याला या विवाहाच्या सफलतेविषयो शंकाच होती.
९. सिद्धार्थाला त्याच्यामते साधु संन्याशांच्या संगतीचे व्यसन जडले होते. त्याला एकांतवास प्रिय होता. त्यामुळे त्याचे गृहस्थ जीवन सफल होणे कसे शक्य होईल ? असे त्याला वाटत होते.
१०. यशोधरेने मात्र सिद्धार्थाशिवाय अन्य कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार केला होता तिने आपल्या पित्याला विचारणा केली, ‘साधुसंन्याशाची संगती हा काय गुन्हा आहे ? मला तो गुन्हा आहे असे वाटत नाही.’
११. आपल्या कन्येचा सिद्धार्थ गौतमाशिवाय अन्य कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार पाहून
यशोधरेच्या मातेने व दण्डपाणीने या विवाहाला अनुकूलता दर्शविली.
१२. गौतमाचे प्रतिस्पर्धी या निर्णयाने फक्त निराशच झाले नाहीत तर त्यांना हा आपला अपमान आहे असेही वाटले दिला.
१३. त्यांना असे वाटत होते की, त्यांना न्याय मिळावा यासाठी यशोधरेने आपला पती निवडताना किमान एकतरी परीक्षा घ्यायला हवी होती. यशोधरेने कोणतीही स्पर्धा आयोजित केली नव्हती.
१४. त्यांना असे वाटत होते की, दण्डपाणी यशोधरेला सिद्धार्थाच्या निवडीपासून परावृत्त करेल व त्यांचा हेतू आपोआपच सफल होईल म्हणून ते काही काळ शांत राहिले.
१५. परंतु जेव्हा दण्डपाणीने अनुकूलता दर्शविली तेव्हा त्यांनी धाडस करून अशी मागणी केली की, स्वयंवरासाठी किमान धनुर्विद्येची परीक्षा घेतली जावी. दण्डपाणीला त्यांच्या या मागणीचा स्वीकार करणे भाग होते.
१६. सिद्धार्थ प्रथम या परीक्षेकरिता सहमत नव्हता. परंतु त्याचा सारथी छन्न याने सिद्धार्थाच्या नकारामुळे त्याचा पिता, त्याचे कुटुंबीय आणि यशोधरा यांची किती मानहानी होईल याची सिद्धार्थाला पूर्ण जाणीव करून दिली.
१७. सिद्धार्थ या युक्तिवादाने अत्यंत प्रभावित झाला, व त्याने स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
१८. स्पर्धा आरंभ झाली. प्रत्येक स्पर्धकाने क्रमाक्रमाने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
१९. गौतमाची पाळी सर्वात शेवटी होती. त्याचे कौशल्य सर्वश्रेष्ठ ठरले.
२०. त्यानंतर विवाह संपन्न झाला. या विवाहाने शुद्धोदन आणि दण्डपाणी दोघेही प्रसन्न झाले. त्याचप्रमाणे यशोधरा आणि महाप्रजापती याही या विवाहाने आनंदित झाल्या.
२१. विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यानंतर यशोधरेला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव राहुल.
The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म
More Stories
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग पाचवा – १. बुद्ध आणि वैदिक ऋषी.
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग चवथा – ४. बोधिसत्व असलेले गौतम सम्यक् सम्बोधी प्राप्त झाल्यावर बुद्ध झाले.
बुद्ध आणि त्यांचा धम्म -भाग चवथा – ३. नव्या धम्माचा आविष्कार