“संत समाजाची आज आपल्याला काय जरुरी आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. संत समाजाची स्थापना प्रथम भगवान बुद्धांनी केली. त्यांच्या काळी त्या समाजाला भिक्षू समाज असे म्हणत असत. भगवान बुद्धांनी भिक्षु समाज का स्थापन केला? त्याचे कारण असे की, समाजातील सर्व लोक प्रपंचात सापडल्यामुळे त्यांची बौद्धिक वाढ होत नाही. तो समाज सत्याला तसाच समाजाला पारखा होतो. याकरिता स्वार्थरहित असा आदर्श समाज असावा या विचाराने बुद्धांनी भिक्षु समाज स्थापन केला. त्यांनी भिक्षुंवर अनेक निर्बंध घातले. त्याचे कारण असे की, त्यांचे मन संसारात परत गुरफटू नये. भिक्षूंचे मुख्य कार्य स्वधर्माचा प्रसार व प्रचार करणे हे होते. आजचा हा संत समाज बुद्धांच्या वेळी असलेल्या भिक्षू समाजाचेच परंतु दुर्धारलेले स्थित्यंतर आहे. मूळची भिक्षुत्वाची कल्पना नष्ट झाली असून तो एक उदर भरण्याचा धंदा होऊन बसला आहे.
या संत लोकांची धर्मांतराच्या कार्याकरिता फारच मदत होईल. आपण जो नवा धर्म स्थापन करणार आहोत, त्या धर्माचे महत्व गावोगावी, काना-कोपऱ्यातून पोहचविण्याकरीता या साधू लोकांचा फार मोठा उपयोग होण्यासारखा आहे. हे लोक धर्मोपदेशाचे कार्य उत्तम प्रकारे करू शकतील. या विद्वान लोकांच्या हातून नवीन धर्माची शिकवण देण्याची कामगिरी उत्तम तऱ्हेने पार पाडली जाईल. आज केवळ साधूत्वाचा सांगाडा राहिला आहे. तेव्हा या साधू लोकांनी या नव्या कार्यक्रमाचा आपल्या अंगात संचार करून घेऊन नवे जीवन प्राप्त करून घ्यावे. आज स्वार्थत्यागाला महत्त्व आहे.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-१, पान नं.५२९)
मुंबई इलाखा अस्पृश्य संत समाजाच्या परिषदेचे अधिवेशन दि.१ जून १९३६ रोजी मुंबई येथे झाले. त्यावेळी उपस्थितांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन-आयु. प्रशांत चव्हाण सर.
आज साधूत्वाचा केवळ सांगाडा राहिला आहे.
More Stories
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न काय होते ? ते पूर्ण झाले का ?
भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर की बी.एन. राव – ऐतिहासिक सत्याचे सखोल विश्लेषण Dr. Babasaheb Ambedkar or B.N. Rao – An in-depth analysis of historical truth
बौद्ध अतिरेकीपणाचा धोकादायक उदय: ‘निर्वाण प्राप्त करण्यासाठी वाट पाहावी लागू शकते