August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

भगवान बुद्ध व बुद्धत्वाचे साक्षीदार वृक्ष

बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापासून ते तथागत बुद्धाच्या महापरीनिर्वाणा पर्यंत अनेक महत्त्वाच्या घटनेचे साक्षीदार वेगवेगळे वृक्ष आहेत. बुद्ध धम्म व त्रिपीटकाचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते की भगवान बुद्ध व त्यांचे शिष्य यांच्या जीवनात वृक्षांना असाधारण महत्व आहे.

भावनेचा अभ्यास असो किंवा ध्यान साधनेचा विकास यासाठी भगवान बुद्ध व त्यांचे शिष्य नेहमीच एकांतस्थळी जाउन झाडाखाली समाधी लाऊन बसत असे. अनेक बौद्ध लेण्यांमधे व गांधार शैलीतील जी रेखीव शिल्प आहेत त्यामधेदेखील शिल्पकारांनी भगवान बुद्ध व त्यांचे शिष्य यांच्या सोबत वृक्षांना सुद्धा दर्शविले आहे. राणी महामाया गर्भवती असताना तेव्हा त्यावेळी प्रसुतीसाठी माहेरी जाण्याची परंपरा होती. राणी महामाया पालखीमधे बसुन देवदह जाण्यासाठी निघाली. देवदह जाण्यासाठी लुंबीनी वनातुन जावे लागत होते. त्यावेळी लुंबीनी वनामधे शाल वृक्षाचे उद्यानवन होते. माता महामायेचे जेव्हा शालवृक्षाच्या उद्यानवनामधे आगमन झाले तेव्हा जणू काही सारा निसर्गच प्रफुल्लित झाला होता. फळं आणि फुलांनी बहरलेल्या वृक्षांना पाहुन राणी महामाया प्रसन्न झाली, त्या मनमोहक वातावरणाने राणी महामाया अत्यंत प्रभावित झाली. पालखीतुन उतरुन राणी महामाया एका शाल
वृक्षाजवळ गेली व एका फांदीला पकडले, तेव्हा अचानक राणी महामायेस प्रसव वेदना व्हायला सुरुवात झाली, व 563 इ. पुर्व वैशाखी पोर्णीमेला अतिशय प्रसन्न व निसर्गरम्य वातावरणात एका शाल वृक्षाखाली बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला.
तरूण वयात सिद्धार्थ गौतम शाक्यसंघाचे सदस्य बनले. शाक्य व कोलीय यांच्या दोन्ही राज्याची विभाजन रेखा रोहिणी नदी होती. रोहिणी नदीच्या पाण्यावरून मोठा विवाद निर्माण झाल्याने शाक्य संघांच्या बैठकीत कोलीयांविरोधात
युद्ध करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला व या युद्धाच्या प्रस्तावास सिद्धार्थ गौतमाने विरोध केला. पण त्यांच्या म्हणण्याला विशेष गांभिर्याने न घेता, उलट त्यांनाच बहुमताने दोषी ठरवून, शाक्य राज्यातून काढून टाकण्याची शिक्षा दिली जाते. यानंतर सिद्धार्थ गौतम परिव्रज्या घेतात. सन्यस्त झाल्यावर सिद्धार्थ गौतम यांना निरंजना नदीच्या काठावर उरूवेला येथे पंचवर्गीय भिक्षु भेटतात, ते सर्व एकांत वासात झाडाखाली बसून अन्नाचा त्याग करून शरीराला अत्याधिक त्रास व वेदना देऊन घनघोर तपस्या करतात. शरीराला त्रास व वेदना देत आत्मपीडन तप केल्यानेच मोक्ष व ज्ञानाची प्राप्ती होत असते अशी त्यावेळी दार्शनिक मान्यता होती. सिद्धार्थ गौतमाने ‘न्यग्रोध‘ नावाच्या
झाडाखाली बसुन आत्मपीडन तप करत शरीराला अत्याधिक कष्ट दिले, अनेक दिवस जेवणाचा त्याग केला, त्यामुळे त्यांचे शरीर कृशकाय व दुर्बल झाले. शरीर अशक्त व दुर्बल झाल्याने हाडं दिसायला लागली. निरंजना नदीत स्नान करून सिद्धार्थ गौतम उरूवेला ग्राम कडे जात असतांना अशक्त पणामुळे बेशुद्ध झाले, व जेमतेम मरणातुन वाचले. काही महिला सिद्धार्थ गौतम साधना करत असलेल्या झाडा जवळुन जात असताना त्यांचे गीत सिद्धार्थाच्या कानी पडले,
वीणाच्या तारेला जास्त ढिल्लं सोडु नका व त्या तारांना ईतकेही आवळु नका की त्या तुटून जातील, कारण तारा ढिल्ल्या सोडल्या तर त्यातुन संगीत निघणार नाही व तारा जास्त आवळल्या तर त्या तुटून जातील व त्यातूनही संगीत निघणार नाही
अचानक सिद्धार्थाच्या मनात विचार आला की शरीर आणि चित्त एकाच अस्तित्वाचे दोन अंग आहेत. शरीराला जास्त त्रास दिल्याने चित्तासोबत अन्याय होतो व त्यामुळे चित्ताची एकाग्रता मिळत नाही. त्यामुळे त्यांनी ठरवलं की स्वास्थ्य व आरोग्य सांभाळून चित्ताची एकाग्रता साधायची. त्यावेळी सेनानी ग्रामची सुजाता आपल्या पुर्णा नामक दासीसह सिद्धार्थ गौतमाजवळ आली. तीने बोधिसत्वाला जेव्हा झाडाखाली अर्धबेशुद्ध अवस्थेत पाहिलं तर तीला वाटलं की कुणी वृक्षदेवताच अवतरली आहे. सुजाताने बोधिसत्वाला पिण्यासाठी वाटीभर दुध दिले, त्यामुळे सिद्धार्थाची चेतना जागृत झाली व ते उठुन बसले व खीर ग्रहण केली. सिद्धार्थाला बोधिसत्व अवस्थेत अन्नदान देणारी सुजाता बौद्ध ईतिहासाची अविभाज्य अंग बनली.
शरीर पीडन तपस्येचा त्याग करून सिद्धार्थाने अन्न ग्रहण केले ही गोष्ट जेव्हा पंचवर्गीय भिक्षुंना कळाली तेव्हा ते सिद्धार्थाला एकटं सोडून वाराणसीला निघून गेले.
अनाथपिंडकाच्या जेतवन विहारात भगवान बुद्धांनी सर्वाधिक वर्षावास व्यतीत केले. अनाथपिंडक उपासक भगवान बुद्ध उपदेशाने अत्याधिक प्रभावित होउन बुद्ध धम्म व संघाला शरण गेला, व त्याने भगवान बुद्ध व भिक्षुसंघासाठी विहार बांधण्याचे ठरवले.त्यांची ईच्छा होती की, विहार अशा ठिकाणी बांधला जावा, जी जागा श्रावस्तीपासुन जास्त जवळही नसावी व जास्त दूरही नसावी, व अशी एकच जागा होती जिथे ती म्हणजे ‘राजकुमार जेत’ चे रमणीय उद्यानवन.
राजकुमार जेत ते उद्यानवन कोणत्याही किंमतीत विकण्यास अजिबात तयार नव्हता. पण अनाथपिंडक श्रेष्ठी मात्र ती जागा विकत घेण्यासाठी सारखी विनवणी करत होते, शेवटी कंटाळून राजकुमार जेत यांनी उद्यानवनाची किंमत ‘कोटी संथर’ सांगितली. ‘कोटी संथर’ म्हणजे अनाथपिंडक श्रेष्ठी जमीनीवर जेवढी सोन्याची नाणी पसरवतील तेवढीच जमीन त्यांना दीली जाईल. अनाथपिंडक यांनी गाड्या भरभरुन सोन्याची नाणी आणुन जमीनीवर पसरवण्यास सुरवात केली. हे पाहून राजकुमार जेत आश्चर्यचकित झाला व त्याला वाटले की या जमीनीवर नक्कीच काहीतरी महान कार्य होणार आहे, व या महान कार्यात माझाही सहभाग असायला हवा. अजुनही काही जमीनीवर सोन्याची नाणी पसरविण्याचे काम बाकी होते, तेव्हा राजकुमार जेत अनाथपिंडक श्रेष्ठी यांना मधेच थांबवत म्हणाला,
बस कर गृहपती, ही जमीन माझ्याकडून दान आहे“. यानंतर अनाथपिंडक श्रेष्ठी यांनी या जमीनीवर भव्य असा विहार बांधला व त्यास राजकुमार जेत यांचेच ‘जेतवन विहार‘ असे नाव दिले.
भगवान बुद्ध जेव्हा या जेतवन विहारात रहायचे तेव्हा लोकं त्यांच्या संपर्कात राहून अतिशय आनंदित व प्रसन्न व्हायचे.
यादरम्यान त्यांच्यात मंगल कामना व धम्म सरिता निरंतर प्रवाहित होत रहायची. बुद्ध दर्शन घेण्यासाठी व धम्म प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून अपार जनसमुदाय गोळा व्हायचा. बुद्ध दर्शन व धम्म श्रवण श्रावस्ती वासीयांच्या तर जीवनशैलीचे एक अभिन्न अंग बनले होते. पण तथागतांनी मात्र लोककल्याणासाठी यात्रांना व अनंत ठिकाणी भटकंतीलाच जीवनशैली चा आधार बनविले होते. भगवान बुद्ध वर्षावासाच्या वेळी चार महिन्यापर्यंत एकाच विहारात वास्तव करायचे.
महान लक्षाच्या प्राप्तीसाठी ते जेतवन विहार सोडून जेव्हा बाहेर अन्य दिशेला, भिक्षुसंघासोबत जायचे तेव्हा जेतवन विहारात भिषन विषन्नता पसरायची, त्यांच्या अनुपस्थितीत श्रावस्ती वासीयांची मानसिक अवस्था फार वाईट होत असायची, कारणं त्यांना प्रतिदीन तथागताच्या दर्शनाची व धम्म श्रवणाची सवय पडली होती. तथागताच्या दर्शन व अभिवादनासाठी आलेले उपासक हतात फुल, गंध अथवा दिपक घेउन येत व भगवान बुद्ध उपस्थित नसल्याचे कळताच अतिशय नाराज होऊन वापस जायचे.
जेतवन विहाराचे हे सुनेपण पाहुन अनाथपिंडक श्रेष्ठी अतिशय दुःखी कष्टी व्हायचे. अनाथपिंडक श्रेष्ठी यांना नेहमी वाटायचे कि भगवान बुद्ध बाहेरगावी गेल्यावर जेतवन विहारात बुद्धाचे प्रतिक म्हणून एखादी मुर्ती किंवा प्रतिमा बसवावी जेणेकरून उपासक आपली श्रद्धा व्यक्त करतील, पण त्यांना हे देखिल माहिती होतं की तथागत यासाठी मान्यता देणार नाही, म्हणून त्यांनी यावर मार्ग काढण्यासाठी भंते आनंद यांना प्रार्थना केली. आयुष्यामान आनंद यांनी बुद्धांना विचारले की चैत्य किती प्रकारचे असतात?
बुद्ध म्हणाले की,”चैत्य तीन प्रकारचे असतात आनंद, एक शारीरीक, जे तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शारिरीक अवशेषांवर बनते.
दुसरे उद्देशिक, ज्यात कल्पनेचा समावेश असतो, ज्याला तथागत फार चांगले मानत नाही.
तिसरे पारिभोगीक, जे तथागताच्या उपयोगात आलेल्या ज्या वस्तू असेल त्यापासून बनते. यात सर्वात उत्तम बोधिवृक्ष आहे, ज्याचा उपयोग करून तथागतानी सम्यक संबोधी प्राप्त केली. त्यामुळे आनंद यांनी बुद्धांना सांगितले की बुद्धगया तेथुन बोधिवृक्ष आणला जावा व जेतवन विहाराच्या द्वारावर लावला जावा, हेच सर्वात श्रेष्ठ असे पारिभोगीक चैत्य असेल.
या बोधिवृक्षाचा प्रबंध स्वतः भंते आनंद यांनी केला त्यामुळे तो बोधिवृक्ष ‘आनंदबोधि‘ या नावाने प्रसिद्ध झाला.
उरूवेला येथुन निरंजना नदीच्या काठावर आल्यावर सिद्धार्थ गौतम पिंपळाच्या झाडाखाली पद्मासन लाऊन बसले, तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. याच दरम्यान शरीर व चित्ताच्या ध्यानाची भावना केल्याने सिद्धार्थ गौतमाचे शरीर, श्वसन व चित्त एकाग्र झाले. एकाग्रतेचा दीर्घ अभ्यास केल्यामुळे चित्त सूक्ष्म व केंद्रीत झाले. गहन समाधी अवस्थेचा अनुभव त्यांना पुर्वी पासुनच होता. गहन समाधी अवस्थेत त्यांनी बघितले की, जे काही निर्माण होतं आहे, ते नष्ट सुद्धा होतं आहे. प्राणी कसे जन्म व मृत्यूच्या शृंखलेतुन जात आहे. जीवन कसं सागराच्या लाटे प्रमाणे आहे. सागराच्या लाटा उंच उठतात व नष्ट होतात, पण सागराच्या जन्मही होत नाही व मृत्यूही होत नाही. सिद्धार्थ गौतमास जन्म व मृत्यूच्या पलीकडील सत्याचा साक्षात्कार झाला. सिद्धार्थ गौतमाने जाणुन घेतले की समस्त संसार दुःखी का आहे. आज्ञानाचे कारण काय आहे. लोभ, तृष्णा व अंहकारामुळे काय नुकसान होत आहे. दुःखाच निवारण कसं करायचं. या सर्वांना तथागताने ‘चार आर्यसत्य’ असे नाव दिले. आता सिद्धार्थ गौतम ‘सम्यक संबद्ध‘ झाले
आहेत. सम्यक संबोधि प्राप्त केल्यानंतर भगवान बुद्धांनी संपुर्ण पहिला आठवडा पिंपळाच्या झाडाखाली अर्थात बोधिवृक्षाखाली समाधी अवस्थेत व्यतीत केला. हा बोधिवृक्ष बोधगया महाविहाराच्या पश्चिमेस आहे. या बोधिवृक्षाची एक शाखा श्रीलंकेच्या ‘अनुराधापुर‘ मधे आहे. बोधिवृक्ष व महाविहार यांच्या मधे भगवान बुद्धाचे साधना स्थळ ‘वज्रासन‘ आहे. चीनी बौद्ध यात्री ‘युवान शुवांग’ म्हणतात की भगवान बुद्धाचे साधना स्थळ ‘वज्रासन’ समस्त विश्वाच्या मध्यम भागात स्थित आहे. बुद्धत्व प्राप्तीनंतरचा दुसरा आठवडा भगवान बुद्धांनी समाधी अवस्थेत व्यतीत केला. याच ठिकाणी ‘अनिमेष लोचन स्तुप‘ बनवला गेला आहे. कारण याच आठवड्यात भगवान बुद्ध
बोधिवृक्षा विषयी परोपकारी भावना व्यक्त करत बोधिवृक्षा ला एकटक बघत राहिले होते.
ज्ञान प्राप्ती झाल्यावर तथागताने तिसरा आठवडा चंक्रमण करत व्यतीत केला. महाविहाराजवळ या घटनेच्या स्मरणार्थ ‘चंक्रमण स्थळाचा चबुतरा’ बनवण्यात आला आहे. हा चंक्रमण चबुतरा 53 फुट लांब, 3 फुट 6 इंच रूंद व 3 फुट उंच आहे. भगवान बुद्धाच्या पाऊलांचे ठसे प्रदर्शित करण्यासाठी त्यावर कमळाचे फुल बनवले गेले आहेत. चौथा आठवडा भगवान बुद्धांनी ‘रतनगृह’ येथे ध्यानमग्न अवस्थेत व्यतीत केला. रतनगृह येथे भगवान बुद्धाची ध्यानमग्न अवस्थेत प्रतिमा आहे. पाचवा आठवडा भगवान बुद्धांनी ‘आजपाल निग्रोध’ झाडाखाली समाधी अवस्थेत व्यतीत केला. सहावा आठवडा भगवान बुद्धांनी ‘मुचिलींद‘ तळ्याजवळ मुचिलींद वृक्षाच्या सावलीत व्यतीत केला. असे सांगितले जाते की, भगवान बुद्धाच्या समाधीमधे अडचण आणन्यासाठी, पावसाळा नसताना भयंकर वादळ व जोरदार पाऊस ‘मार‘ ने निर्माण केल्यावर तळ्यामधे राहणार्या मुचिलींद नागराजने भगवान बुद्धावर सात फनांची सावली निर्माण केली. या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही, सत्य तर हे आहे की, निरंजना नदीच्या काठी राहत असलेल्या ‘नागवंशिय‘ लोकांनी व नागवंशिय राजा ‘मुचिलींद’ यांनी संकट व अडचणींपासून भगवान बुद्धाची सात हप्ते सेवा केली. कारण ते भगवान बुद्धाच्या धम्माला शरण गेले होते. सातवा व अंतिम आठवडा भगवान बुद्धांनी ‘राजायतन’ वृक्षाखाली समाधीस्त अवस्थेत व्यतीत केला. आज आपण जो वृक्ष बघतो, तो 60 वर्षापुर्वी ‘बरमा‘ येथुन आणलेला वृक्ष आहे. याच ठिकाणी उत्कल म्हणजेच उडीसा येथील व्यापारी बंधू तपस्सु व भल्लीक यांना भगवान बुद्धानी बुद्ध व धम्माची शरण दिली होती. संघाची नाही कारण त्या वेळी संघाची स्थापना झाली नव्हती. तपस्सु व भल्लीक यांनी भगवान बुद्धांना ‘मधुपिंडक’ अन्नदान दिले होते. तपस्सु व भल्लीक दोघेही व्यापारी बंधू तथागताचे पहिले उपासक शिष्य बनले होते.
वैशालीच्या महावन कुटागार शाळेत भगवान बुद्धांनी घोषणा की, लवकरच आजपासून तीन महिन्यांनी तथागताचे परिनिर्वाण होणार आहे.
भगवान बुद्ध पावानगरीमधे आल्यावर आयुष्यामान चुंद यांनी भगवंतास भोजनासाठी निमंत्रित केले. आयुष्यमान चुंद यांचे अन्नदान ग्रहण केल्यानंतर तथागताची तब्येत फारच खराब झाली, त्यामुळे त्यांना पावानगर ते कुशीनारा तीन कोस अंतर जाण्यासाठी रस्त्यात पंचवीस वेळा विश्रांती घ्यावी लागली. अंत्यत दुर्बल व अशक्त अवस्थेत तथागतांनी आयुष्यामान आनंदास म्हटले की, “आनंद, हिरण्यवती नदीच्या पलीकडील तीरावर कुशीनाराच्या मल्लांचा शालवन आहे तिथे जाऊ“. कुशीनाराच्या शालवनात आल्यावर तथागत यमक शाल वृक्षांच्या मधे ठेवलेल्या मंचकावर उत्तरेकडे डोके ठेवून, उजव्या कुशीवर पायावर पाय ठेवून, स्मृती संप्रजन्य राहुन, सिंहशय्या करुन झोपले.
यानंतर भगवान बुद्धानी प्रथम ते चतुर्थ ध्यानाला प्राप्त करून आकाशन्यायतन, विज्ञानन्यायतन, अकिंचन्यायतन, व नैवसंज्ञायतन निरोध समाधीस प्राप्त करून तथागत बुद्ध महापरिनिर्वाणास प्राप्त झाले. तथागताच्या जीवन काळात वेगवेगळ्या क्षणी व ठिकाणी वेगवेगळ्या वृक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळेच कदाचित भगवान बुद्ध ज्ञान प्राप्तीच्या दुसर्या आठवड्यात, ऊन व वारा यापांसून तथागताचे संरक्षण करणार्या व ज्ञान प्राप्तीसाठी तथागतास मायेचा आधार देणार्या बोधिवृक्षाकडे करूणा व परोपकारी भावनेने एकटक बघत राहिले.
You are in Dhamma
✍️ राहुल खरे नाशिक  : 9960999363