November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – ७. मुलाचे पाय पाळण्यात

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 लेखक : भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

 प्रथम खंड :  भाग पहिला  – जन्म ते प्रव्रज्या.

🌼 ७. मुलाचे पाय पाळण्यात 🌼

१. जेव्हा जेव्हा सिद्धार्थ आपल्या पित्याच्या शेतावर जात असे तेव्हा तेव्हा काही काम नसेल तर तो एकांत स्थानी जाऊन ध्यान धारणा करण्यात मग्न होत असे.

२. सिद्धार्थाला मानसिक गुण विकासाच्या शिक्षणाची सर्व साधने उपलब्ध करून देताना क्षत्रियाला साजेशा अशा सैनिक शिक्षणाकडे कोणतेही दुर्लक्ष करण्यात आले नव्हते.

३. कारण शुद्धोदन, कोणत्याही परिस्थितीत, पौरुषासाठी आवश्यक सैनिक शिक्षणाची उणीव ठेवून आपल्या पुत्राचा मानसिक विकास व्हावा अशी चूक कदापिही करण्यास तयार नव्हता.

४. सिद्धार्थ स्वभावतःच कारुणिक होता. माणसाने माणसाचे शोषण करणे त्याला कधीच मानवले नाही.

५. एकदा तो सवंगड्यांसोबत आपल्या पित्याच्या शेतावर गेला तेथे त्याला तोकड्या वस्त्रानिशी रखरखत्या उन्हात शेत नांगरणारे, बांधबंदिस्ती करणारे, वृक्ष तोडणारे श्रमिक दिसले.

६. हे दृश्य पाहून त्याचे हृदय भरून आले.

७. ‘एका माणसाने दुसऱ्याचे शोषण करावे हे उचित आहे काय?’ असा प्रश्न त्याने आपल्या सवंगड्‌यांना केला ‘श्रमिकांनी श्रम करावे आणि स्वामींनी त्यांच्या श्रमाची फळे भोगावीत हा न्याय कसा होऊ शकतो. ?’

८. काय बोलावे हे त्याच्या मित्रांना समजलेच नाही. कारण त्यांचा जीवनाच्या परंपरागत तत्वज्ञानावर विश्वास होता. हे तत्वज्ञान म्हणजे श्रमिक सेवेसाठीच जन्माला आला आहे आणि स्वामीची सेवा चाकरी करणे ही त्याची नियती आहे.

९. शाक्य वप्रमंगल नावाचा उत्सव साजरा करीत असत. पेरणीच्या प्रसंगी साजरा केला जाणारा हा एक ग्रामीण उत्सव होता. या दिवशी प्रत्येक शाक्याने स्वतःचे शेत स्वतः नांगरावे ही प्रथा होती. या प्रथेचे पालन सर्वांना अनिवार्य होते.

१०. सिद्धार्थाने या प्रथेचे सतत पालन केले. तो स्वहस्ते आपली शेतजमीन नांगरत असे.

११. जरी सिद्धार्थ बुद्धिमान होता तरी त्याला शरीरश्रमाची घृणा नव्हती.

१२. तो क्षत्रिय कुलोत्पन्न होता. त्याला धनुर्विद्या अवगत होती. अन्य शस्त्रविद्येत तो प्रवीण होता. तरीही त्याला अकारण प्राणिमात्रांना ठार करणे आवडत नसे.

१३. तो मृगयादलासोबत मृगयेस (शिकारीस) जाण्यास नकार देत असे. त्याचे मित्र त्याला म्हणत असत, ‘तुला वाघांची भीती वाटते?’ व्यंग दाखवीत तो म्हणत असे, ‘मला माहीत आहे तुम्ही वाघांची मृगया करणार नाही. तुम्ही निरुपद्रवी अशा मृगांची, सशांची मृगया करणार आहात.’

१४. त्याचे मित्र म्हणत, ‘हवं तर तू मृगयेत सहभागी होऊ नकोस. पण तुझे मित्र कसा अचूक लक्ष्यवेध करतात निदान ते तरी पहायला तू ये.’ अशी निमंत्रणेही सिद्धार्थ नाकारीत असे. तो म्हणे,’मला गरीब निरुपद्रवी प्राण्यांची हत्या होताना पाहणे आवडत नाही.’

१५. सिद्धार्थाच्या या आणि अशा प्रवृत्तीविषयी प्रजापती गौतमीला खूप चिंता वाटत होती.

१६. ती त्याच्याशी युक्तिवाद करीत असे, ती म्हणे,” तू हे विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि युद्धकला मृगयेनेच अवगत होऊ शकते. मृगयेने अचूक लक्ष्यवेध साध्य करता येतो. लढवय्या वर्गासाठी मृगया म्हणजे प्रशिक्षण शाळाच होय.”

१७. सिद्धार्थ बरेचदा गौतमीला विचारीत असे, ‘परंतु माते, क्षत्रियाने युद्ध का करावे ?’ आणि गौतमी उत्तरीत असे ‘कारण, ते त्याचे कर्तव्य आहे.’

१८. तिच्या या उत्तराने सिद्धार्थाचे कंधीही समाधान होत नसे. तो गौतमीला विचारीत असे, ‘मला हे सांग की, माणसाने माणसाला ठार मारणे हे माणसाचे कर्तव्य कसे होऊ शकते ?’ गौतमी प्रतिवाद करायची, ‘ही अशी प्रवृत्ती संन्याशाला शोभते. परंतु क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढले नाहीत तर राज्याचे रक्षण कोण करणार?’

१९ ‘परंतु माते ! जर सर्व क्षत्रिय परस्परावर प्रेम करू लागले, एक दुसऱ्यासोबत प्रेमाने राहू लागले तर हत्या न करताही त्यांना आपापल्या राज्याचे रक्षण करता येणार नाही काय ?’ सिद्धार्थ विचारीत असे. गौतमी निरुत्तर होऊन त्याला त्याच्या मनःस्थितीत सोडून जात असे.

२०. ध्यानधारणेत सहभागी होण्यासाठी तो आपल्या मित्रांना प्रेरित करीत असे. तो त्यांना ध्यानासाठी योग्य प्रकारे आसन मांडण्यास शिकवीत असे. विशिष्ट विषयावर चित्त केंद्रित करण्याचे घडे तो त्यांना देत असे. तो त्यांना निवडक विचारावर लक्ष केंद्रित करण्याचा उपदेश देत असे. ‘मी सुखी होवो, माझे गणगोत सुखी होवोत. सर्व प्राणिमात्र सुखी होवोत.’

२२. त्याचे मित्र ही बाब मनाला लावून घेत नसत. ते त्याला हसत असत. डोळे लावून ते ध्यानाच्या विषयावर ध्यान केंद्रित करू शकत नव्हते. त्याऐवजी त्यांच्या मनश्चक्षंपुढे मृगांची मृगया दिसत असे किंवा पंचपक्वान्नांची ताटे दिसत असत.

२३. त्याच्या मातापित्याला त्याचा हा समाधीकडील कल आवडत नसे. त्यांना ही प्रवृत्ती क्षत्रियांच्या जीवनाशी विरोधी आहे असे वाटे

२४. सिद्धार्थाचा असा दृढ विश्वास होता की, योग्य विषयाची ध्यानधारणा केल्यास जगात सर्वत्र मैत्रीभावना विकसित होऊ शकते. तो आपल्या मुद्याचे समर्थन असे करीत असे, “जेव्हा आम्ही जिवंत सृष्टीविषयी, प्राणिमात्राविषयी विचार करतो तेव्हा आमच्या मनात भेदाभेद उपजतात. आम्ही शत्रूपासून मित्रांना वेगळे करतो. आम्ही पाळीव प्राण्यापासून मानव प्राण्याला वेगळे करतो. आम्ही आमचे मित्र आणि पाळीव प्राणी यांच्यावर प्रेम करतो. आम्ही शत्रू आणि जंगली श्वापदांचा द्वेष करतो.”

२५. “या द्विधावृत्तीवर आम्ही विजय मिळविलाच पाहिजे. व्यावहारिक जीवनाचा स्तर उंचावणे ध्यान धारणेच्या माध्यमातूनच शक्य आहे.” त्याची विवेकबुद्धी अशी होती.

२६. त्याचे बालपण हे अत्यंत करुणामय होते.

२७. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. मध्याह्नसमयी झाडाखाली विश्राम करताना तो आसमंतातील शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. अशा स्थितीत तो बसला असताना नेमका त्याच्या पुढ्यात आकाशातून एक पक्षी येऊन पडला.

२८. पक्षी बाणाने घायाळ झाला होता. बाण त्या पक्ष्याच्या शरीरात खोलवर रुतला होता. वेदनांनी तो पक्षी तडफडत होता.

२९. सिद्धार्थ त्या पक्ष्याच्या साहाय्याला धावून गेला. त्याने पक्ष्याच्या शरीरात रुतलेला बाण काढला. जखमेवर उपचार केला. पक्ष्याला पाणी पाजले. त्याने पक्ष्याला उचलले. तो जेथे बसला होता तेथे परत आला. त्याने पक्ष्याला वस्त्रात गुंडाळले आणि त्याला ऊब यावी म्हणून आपल्या छातीशी धरले.

३०. या निरपराध पक्ष्याला कोणी मारले असावे याचे सिद्धार्थाला आश्चर्य वाटले. तेवढ्यातच त्याचा आतेभाऊ मृगयेच्या वेषात अस्त्रशस्त्रासहित त्याच्या पुढे उपस्थित झाला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की त्याने आकाशात उडणाऱ्या एका पक्ष्याला बाण मारला. बाण पक्ष्याला लागला. पक्षी घायाळ झाला. थोडे अंतर उडत जाऊन पक्षी जवळपासच कोठेतरी पडला. नंतर देवदत्ताने सिद्धार्थास विचारले, “तू तो पक्षी पाहिला काय ?”

३१. सिद्धार्थाने होकारार्थी उत्तर दिले; आणि त्याने त्याला तो पक्षी दाखविला. पक्षी आतापर्यंत पूर्णपणे स्वस्थ झाला होता.

३२. देवदत्ताने तो पक्षी त्याच्या स्वाधीन करावा अशी मागणी केली. सिद्धार्थान सपशेल नकार दिला. दोघात निकराचा विवाद सुरू झाला.

३३. देवदत्ताने वाद मांडला की, तो पक्ष्याचा स्वामी आहे. कारण मृगयेच्या नियमानुसार जो मृगया करतो तोच त्या प्राण्याचा स्वामी असतो.

३४. सिद्धार्थाने मृगयेच्या या नियमाच्या वैधतेलाच आव्हान दिले. त्याचा प्रतिवाद असा होता की, जो रक्षण करतो त्यालाच स्वामित्वाचा अधिकार असतो. जो हत्या करू इच्छितो तो स्वामी कसा होऊ शकेल ?

३५. कोणताही पक्ष माघार घेण्यास तयार नव्हता. हा विवाद निर्णयासाठी लवादाकडे सोपविण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाचा युक्तिवाद स्वीकारला.

३६. देवदत्त त्याचा कायमचा शत्रू झाला. परंतु गौतमाची करुणा इतकी विशाल होती की, आतेभावाच्या स‌द्भावना जपण्यापेक्षा एका असहाय पक्ष्याचा जीव वाचविणे त्याने श्रेयस्कर जाणले.

३७. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणी त्याच्या स्वभावातील विविध प्रवृत्ती अशा प्रकारे व्यक्त होत होत्या.

The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म