August 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग दुसरा – ५. शांतीची वार्ता

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड :  भाग दुसरा  – कायमचा गृहत्याग.

🌼 ५. शांतीची वार्ता 🌼

१. जेव्हा गौतम राजगृही वास्तव्याला होता तेव्हा तेथे दुसरे पाच परिव्राजक आले. त्यांनी गौतमाच्या पर्णकुटीशेजारीच आपली कुटी बांधली.

२. कौण्डिण्य, अश्वजित, काश्यप, महानाम आणि भद्रिक हे ते पाच परिव्राजक होत.

३. गौतमाच्या दर्शनाने तेही प्रभावित झाले आणि त्याच्या प्रव्रज्येचे काय कारण असावे याचा आश्चर्यचकित होऊन विचार करू लागले.

४. राजा बिंबिसारसारखेच त्यांनी या विषयावर गौतमाशी प्रश्नोत्तरे केली.

५. जेव्हा गौतमाने त्यांना आपण कोणत्या परिस्थितीत प्रव्रज्या स्वीकारली हे स्पष्ट केले तेव्हा, ते उत्तरले “आम्ही याविषयी ऐकले आहे, परंतु तुमच्या तेथून निघून आल्यानंतर काय घडले हे आपणास माहीत आहे काय ?”

६. सिद्धार्थ म्हणाला, “नाही” तेव्हा त्यांनी त्याला सांगितले की, सिद्धार्थाने कपिलवस्तू सोडल्यानंतर शाक्यांनी कोलीयांशी युद्ध करण्याविरुद्ध मोठे आंदोलन केले.

७. स्त्री, पुरुष, युवक, युवतींनी मोठी निदर्शने केली. त्यांनी पदयात्रा काढल्या. ते कोलीय आमचे बांधव आहेत अशा घोषणा देत होते. “भावाने भावाशी लढणे चूक आहे.” “गौतमाच्या विजनवासाचा विचार करा” अशाही घोषणा ते देत होते.

८. या आंदोलनाचा परिणाम असा झाला की, या विषयावर पुनर्विचारासाठी शाक्य संघाला
आपली सभा आमंत्रित करावी लागली. यावेळी बहुमत कोलीयांशी सामोपचाराने समस्या सोडवावी या बाजूला होते.

९. शाक्य संघाने आपल्यापैकी पांच शाक्यांची आपले दूत म्हणून निवड केली. कोलीयांशी शांततेच्या वाटाघाटी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले.

१०. जेव्हा कोलीयांना ही वार्ता कळली तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनीही शाक्यांच्या दूतांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी पांच कोलीयांची आपले प्रतिनिधी म्हणून निवड केली.

११. दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी वाटाघाटी करून असे ठरविले की, रोहिणीच्या पाण्याच्या वाटपासंबंधी विवाद सोडविण्यासाठी एक कायम लवाद नियुक्त करण्यात यावा या लवादाचा निर्णय दोन्ही पक्षांना बंधनकारक राहील. अशा प्रकारे युद्धाच्या संभाव्य धोक्याची परिणती कायम शांतीच्या प्रस्थापनेत झाली.

१२. कपिलवस्तूत काय घडले हे वर्तमान गौतमाला कथन केल्यानंतर ते परिव्राजक त्याला म्हणाले, “आता आपण परिव्राजक म्हणून जीवन जगण्याची काहीही आवश्यकता नाही. आपण स्वगृही आपल्या कुटुंबात परत जावे.”

१३. सिद्धार्थ म्हणाला, “ही शुभवार्ता ऐकून मला आनंद झाला. हा माझा विजय आहे परंतु मी स्वगृही परत जाणार नाही. मी जाऊही नये. मी परिव्राजक म्हणूनच जीवनयापन केले पाहिजे.”

१४. गौतमाने त्या पाच परिव्राजकांना “तुमचा काय कार्यक्रम आहे” असे विचारले. ते उत्तरले. “आम्ही तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हीही आमच्यासह का येत नाही ?” सिद्धार्थ उत्तरला, “मला क्रमाक्रमाने प्रथम इतर मार्गांची परीक्षा घ्यावयाची आहे.”

१५. त्या पाच परिव्राजकांनी तेथून प्रयाण केले.