August 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग दुसरा – २. राजा बिंबिसार आणि त्याचा उपदेश

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड :  भाग दुसरा  – कायमचा गृहत्याग.

🌼 २. राजा बिंबिसार आणि त्याचा उपदेश 🌼

१. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी तो उठला आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षाटनासाठी नगरात गेला. त्याच्यासभोवती मोठा जनसमुदाय गोळा झाला.

२. मगध नरेश श्रेणीय बिंबिसार याने आपल्या राजवाड्याबाहेर लोकांचा मोठा समुदाय पाहिला त्याने याच्या कारणाची चौकशी केली. राजसेवकाने वृत्तांत कथन केला.

३. “हा एकतर चक्रवर्ती राजा होईल किंवा बुद्ध होईल अशी ज्याच्याविषयी ब्राह्मणांनी भविष्यवाणी केली होती तोच हा शाक्य राजाचा पुत्र. तो आता संन्याशी झाला आहे आणि
त्याच्या भोवती गोळा होऊन लोक त्याच्याकडे नजरा रोखून पाहत आहेत.”

४. राजाने हे ऐकले. त्याने मनात विचार केला. तो सेवकाला म्हणाला, ‘तो कोठे जातो आहे याची माहिती काढावी.’ सेवक राजाज्ञाचे पालन करण्याच्या हेतूने राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला.

५. नांगराला जुंपलेल्या दोन बैलात जेवढे अंतर असते तेवढ्याच अंतरावर दृष्टी ठेवून, स्थिर नजरेने, , मृदू मृदू अ आवाजात आणि हळूवार पाऊले टाकीत तो श्रेष्ठतम भिक्षु भिक्षाटनाला निघाला. तेव्हा त्याची इंद्रिये आणि चित्त संयत होते.

६. मिळाली ती भिक्षा स्वीकारून तो पर्वतराजीच्या आश्रयाने एकांतस्थानी विसावला. त्याने भिक्षा ग्रहण केली आणि तो पांडव पर्वत चढून गेला.

७. जेथे मयूरांचे स्वर निनादत आहेत अशा लोध्रवृक्षांच्या घनदाट वनात तो मानवजातीचा सूर्य आपली काषाय वस्त्रे धारण करून पर्वतराजीवर पूर्वेकडील उगवत्या भास्करासम भासत होता.

८. राजसेवकाने त्याला त्या स्थानी विश्राम करताना पाहिले. त्याने राजाला तसे सूचित केले. राजाला जेव्हा हे वर्तमान कळले तेव्हा राजाच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण झाला. तो आपल्या सेवकासह त्याच्या भेटीला निघाला.

९. पर्वतासम व्यक्तित्व असलेला राजा पर्वतारोहण करता झाला.

१०. तेथे राजाला चलायमान गिरी शिखरासम तेजस्वी मुखमुद्रेचा जितेंद्रिय गौतम पद्मासनाच्या
अवस्थेत दिसला.

११. त्याचे सौंदर्य आणि त्याची शांत सौम्य मुद्रा, तो इतरांपासून वेगळा आहे हे दर्शवीत होती. राजा त्याला पाहून आश्चर्यचकित झाला. त्याच्याप्रति प्रेम आणि मैत्रीच्या भावना घेऊन तो श्रेष्ठ राजा त्याच्या निकट गेला.

१२. बिंबिसाराने त्याच्या निकट जाऊन शालीनतेने त्याचे कुशल विचारले. त्याच शालीनतेने गौतमाने आपण स्वस्थचित्त व रोगमुक्त असल्याचे सांगितले.

१३. राजाने त्याच्या निकटच सपाट स्वच्छ खडकावर आसन ग्रहण केले. आसनस्थ झाल्यावर आपले मनोगत व्यक्त करण्याच्या हेतूने राजा बोलला,

१४. “माझी तुझ्या कुटुंबाशी प्रगाढ मैत्री आहे, ही मैत्री वंशपरंपरागत आहे. कालौघात या मैत्रीची उपयुक्तता व महत्त्व सिद्ध झाले आहे. म्हणून तूही मला मित्रवतच आहेस. या मैत्री भावनेनेच तुझ्याशी काही शब्द बोलण्याची माझी इच्छा आहे. तू माझे शब्द लक्ष देऊन ऐक.”

१५. “तू सूर्यवंशी आहेस. तू यौवनाच्या भरात आहेस. तुझे सौंदर्य अप्रतिम आहे. म्हणूनच या सर्वांशी विसंगत राज्यत्याग करून संन्यास धारण करण्याच्या तुझ्या संकल्पाचे मला आश्चर्य वाटते.

१६. “तुझी काया रक्तचंदनाच्या गंधासाठीच योग्य आहे. ही काया जाड्याभरड्या काषाय वस्त्रांच्या स्पर्शाला योग्य नाही. हे तुझे बलशाली बाहू प्रजारक्षणासाठीच योग्य आहेत. हे हात लोकांनी दिलेली भिक्षा ग्रहण करण्यासाठी नाहीत.

१७. “म्हणून हे सौम्य संयत युवका, पैतृक राज्याचा वारसा स्वीकारण्याची तुझी इच्छा नसेल तर मी तुला माझे अर्धे राज्य देतो. कृपया त्याचा स्वीकार कर.

१८. “तू जर हे करशील तर तुझ्या स्वजनांना कोणतेही दुःख होणार नाही. जे स्थिरचित्त आहेत त्यांनाच काळाच्या ओघात सत्ता आणि संपत्ती शरण जाते म्हणून कृपया माझी विनंती स्वीकारावी.
सत्पुरुषांच्या साहाय्याने सत्पुरुषांच्या समृद्धीत वृद्धीच होते.

१९. “तुझा वंशाभिमान माझी विनंती स्वीकारण्याच्या आड येत असेल तर उठ, उभा हो, ण घे. माझी असंख्य सेना तुझ्यासोबत आहे. मित्र म्हणून मीही तुझ्या सोबत आहे. आपल्या धनुष्यबाण घे. शत्रूवर विजय प्राप्त कर आणि राज्य संपादन कर

२०. “जगात पुरुषासाठी तीनच पुरुषार्थ आहेत. धर्मानुसार अर्थ व कामाची प्राप्ती कर त्यानंतर
मोक्षाचा विचार कर जीवनात काम प्रथम आणि मोक्ष नंतर असाच क्रम आहे. जीवनात धर्म, अर्थ आणि काम हेच तीन पुरुषार्थ आहेत. मृत्यूनंतर जगाशी आपला संबंध संपतो. कारण जग आपल्यासाठी संपलेलेच असते.

२१. “म्हणूनच तू या तीन पुरुषार्थाच्या प्राप्तीचे प्रयास कर व आपले जीवन सफल होऊ दे. असे म्हणतात की, जेव्हा धर्म, अर्थ आणि काम या पुरुषार्थाची पूर्णत्वाने प्राप्ती होते तेव्हाच पुरुषाचे जीवन पूर्णाशाने सफल होते. त्याला मोक्ष प्राप्त होतो.

२२. “धनुष्यवाण धारण करण्यास सर्वार्थाने समर्थ अशा या बाहूंना निरुद्योगी राहू देऊ नकोस. ही पृथ्वीच काय पण तिन्ही जगांना जिंकण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे.

२३. “मी स्नेहवश तुझ्याशी हे बोलतो आहे. मी हे राज्यलोभाच्या भावनेने किंवा तुझा संन्याशाचा वेष पाहून असूयेने बोलत नाही. माझे हृदय स्नेहसिक्त आहे. माझ्या नयनात अश्रू तरळत आहेत.

२४. “संन्यासी व्हावयाची अभिलाषा असलेला असा तू. तू आपल्या वंशाचा मानबिंदू आहेस. तू आपल्या वंशाचे वैभव आहेस. सध्या विषयभोगात आनंद मानण्याची वेळ आहे. जेव्हा वार्धक्य येईल तेव्हा सारे शरीरसौंदर्य लयास गेलेले असेल, तेव्हा तू संन्यासी व्हावयाचा विचार केला तर ते कदाचित योग्यही होईल.

२५. “वृद्धापकाळी धर्मकार्याने पुण्य संपादन करावे. वार्धक्य सुखोपभोगासाठी अनुपयुक्त आहे. म्हणूनच असे म्हटले आहे की यौवन सुखोपभोगासाठी, प्रौढत्व धनसंपत्तीसाठी आणि वृद्धापकाळ धर्मकार्यासाठीच योग्य आहे.

२६. “यौवनाचे धन आणि धर्माशी वैर आहे. जेथे सुख आहे तेथे यौवन आहे. जेथे सुख उपलब्ध आहे तेथे यौवन त्याच्या आस्वादाची संधी सोडत नाही. कारण कितीही संयम बाळगण्याचा प्रयत्न केला, स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी यौवनाला सुख विलासापासून विमुख होणे शक्य नाही.

२७. “वार्धक्य अंतर्मुख होते. विचारप्रधान असते. वार्धक्यात माणूस प्रकृतीने शांत व गंभीर होतो. वार्धक्यात आत्मसंयमन सहज शक्य होते.

२८. “यौवन चंचल आहे, क्षणभंगुर आहे, अशांत आहे, अस्वस्थ आहे, अदूरदर्शी आहे, असावधान आहे. वंचक आहे. महत्त्वाचे म्हणजे भौतिक सुखाशी निगडित आहे. म्हणूनच
यौवनावस्था पार केल्यावर माणूस सुटकेचा श्वास सोडतो. भयानक जंगलातून आपण सुरक्षित पार पडलो असे त्याला वाटते.

२९. “म्हणून हे चंचल, क्षणिक, स्खलनशील यौवन ओसरू दे. आपले आरंभिक जीवन सुख
विलासासाठीच आहे. यौवनात इंद्रियांवर संयम ठेवणे त्यांना भोगविलासापासून वंचित ठेवणे शक्य नाही.

३०. “किंवा धर्मच जर खरोखरी तुझे अंतिम ध्येय असेल तर, तुझ्या कुटुंबाच्या थोर परंपरेनुसार यज्ञ कर, आहुती दे. यज्ञ आहुतींच्या माध्यमातूनही श्रेष्ठतम स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते.

३१. “जे ध्येय ऋषी महर्षीनी त्याग आणि तपश्चर्येच्या माध्यमातून साध्य केले तेच ध्येय बाहूवर नाना प्रकारचे अलंकार लेवून, शिरावर रत्नजडित मुकुट धारण करणाऱ्या राजर्षीनी यज्ञ आणि आहुतींच्या माध्यमातून साध्य केले आहे.