बुद्ध आणि त्यांचा धम्म
भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग चवथा – नवीन मार्गाचे दर्शन आणि बोधिलाभ
२. बुद्धत्वप्राप्ती
१. ध्यानसाधनेच्या काळात क्षुधा शांतवनाच्या हेतूने त्याने ४० दिवस पुरेल एवढे अन्न संग्रही ठेवले होते.
२. चित्त अमंगल, अशांत करणाऱ्या दुष्ट विचारांना त्याने निपटून काढले. गौतमाने अन्न ग्रहण केले. तो शक्तीसंपन्न झाला तो प्रफुल्लित झाला. त्याने बुद्धत्वप्राप्ती हेतू स्वतःला सिद्ध केले.
३. बुद्धत्वप्राप्तीसाठी समाधीस्थ अवस्थेत त्याला चार सप्ताहाचा कालावधी लागला. बुद्धत्वाची अंतिम स्थिती प्राप्त होण्यासाठी त्याला चार अवस्थातून जावे लागले.
४. प्रथम अवस्था विवेक आणि विश्लेषणाची होती. एकांतवासामुळे त्याला ही अवस्था सहज शक्य झाली.
५. द्वितीय अवस्था चित्ताच्या एकाग्रतेची होती.
६. तृतीय अवस्थेत त्याने मनोनिग्रह आणि समचित्तता यांना आपल्या सहाय्याला घेतले.
७. चतुर्थ आणि अंतिम अवस्थेत त्याने पावित्र्याचा समचित्ततेशी संयोग केला आणि समचित्ततेचा मनोनिग्रहाशी संयोग केला.
८. अशा प्रकारे त्याचे चित्त एकाग्र झाले. त्याचे चित्त पवित्र झाले. त्याचे चित्त दोषरहित झाले. त्याचे सारे क्लेष लयाला गेले. त्याचे चित्त सुकोमल झाले. तो दक्ष झाला. तो दृढ झाला. तो वासनारहित झाला. तो ध्येयाशी एकरूप झाला. नंतर गौतमाने त्याला निरंतर पीडादायक ठरलेल्या समस्येचे समाधान शोधण्यावर आपले चित्त एकाग्र केले.
९. चवथ्या सप्ताहाच्या अंतिम दिनी रात्रप्रहरी त्याचे चित्त प्रकाशमान झाले. त्याच्या चित्तात
प्रकाशकिरणे प्रस्फुटित झाली. त्याला अनुभूती झाली की या जगात दोन समस्या आहेत. प्रथम
समस्या ही की या जगात दुःख आहे. दुसरी समस्या ही की, हे दुःख निवारण करून मानवमात्राला सुखी कसे करता येईल ?”
१०. अंतिमतः चार आठवड्यांच्या चिंतनानंतर अंधःकार लोप पावला प्रकाश किरणे प्रस्फुटित झाली. अविद्या लोप पावली. ज्ञानाचा उदय झाला. त्याला नूतन मार्ग गवसला.
२. बुद्धत्वप्राप्ती ( समाप्त )….
More Stories
Buddha and his Dhamma बुद्ध आणि त्याचा धम्म
आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे आलोचक