April 1, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – २. बुद्धाचे पूर्वज

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 लेखक : भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड :  भाग पहिला –  जन्म ते प्रव्रज्या. 

२. बुद्धाचे पूर्वज 

१. शाक्याची राजधानी कपिलवस्तू नावाने संबोधिली जात असे. कदाचित कपिलवस्तू हे नाव महान बुद्धिप्रामाण्यवादी कपिल यांच्या नावावरून पडले असावे.

२. कपिलवस्तू नगरीत जयसेन नावाचा शाक्य राज्य करीत होता. सिंह-हनु हा त्याचा पुत्र सिंह-हनूचा विवाह कच्चना हिचेशी झाला होता. सिंह-हनूला शुद्धोदन, धौतोदन, शाक्योदन, शुक्लोदन, आणि अमितोदन असे पाच पुत्र होते. या पाच पुत्रांव्यतिरिक्त सिंह-हनूला अमिता आणि प्रमिता अशा दोन कन्या होत्या.

३. या घराण्याचे गोत्र आदित्य होते.

४. शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पित्याचे नाव अंजन आणि मातेचे नाव सुलक्षणा होते. अंजन कोलीय होता. तो देवदह नावाच्या खेड्यात वास्तव्यास होता.

५. शुद्धोदन हा महान योद्धा होता. जेव्हा शुद्धोदनाने शौर्याचा परिचय दिला तेव्हा त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती मिळाली. त्याने महाप्रजापतीची द्वितीय भार्या म्हणून निवड केली. महाप्रजापती ही महामायेची मोठी भगिनी.

६. शुद्धोदन हा धनधान्यसंपन्न असा गृहस्थ होता तो विस्तीर्ण अशा भूमीचा स्वामी होता. त्याच्याकडे भरपूर सेवक होते. असे म्हटले जाते की त्याच्या स्वामित्वाखालील भूमीच्या नांगरणीसाठी एका वेळी १००० नांगरांचा उपयोग करावा लागत असे.

७. तो ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत होता. त्याचे अनेक राजप्रासाद होते.

The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म