November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – १९. राजपुत्र आणि त्याचा सेवक

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड :  भाग पहिला  – जन्म ते प्रव्रज्या.

🌼 १९. राजपुत्र आणि त्याचा सेवक 🌼

१. छन्नाने सुद्धा कन्थकासह परत जावयास हवे होते. परंतु त्याने परत जाण्यास नकार दिला. त्याने तो कन्थकासह अनोमा नदीच्या काठापर्यंत सिद्धार्थाला सोबत करणार आणि तेथून निरोप घेणार असा आग्रह धरला. छत्राचा आग्रह एवढा प्रभावी होता की, गौतमाला त्याचा स्वीकार करावाच लागला,

२. शेवटी ते अनोमा नदीच्या काठावर पोहोचले.

३. नंतर छन्नाकडे वळून तो म्हणाला, “प्रिय मित्रा, माझ्या पाठोपाठ येथपर्यंत येण्याने तुझी माझ्याप्रति निष्ठा स्पष्ट होते. तुझ्यासारख्या सेवकाने माझ्याप्रति ही निष्ठा, हे प्रेम व्यक्त करून माझे हृदयच जिंकले आहे.

४. “मी तुला तुझ्या सेवेचे कोणतेही पारितोषिक देण्यास असमर्थ असलो तरीही मी माझ्या प्रतिच्या तू व्यक्त केलेल्या उदार भावनांनी प्रसन्न झालो आहे.

५. “विपत्तीसमयी आपले आप्त स्वकीयही परक्यासारखे वागतात. ज्यांच्यापासून उपकाराची (पारितोषिकांची) अपेक्षा असते त्यांच्याप्रति कोण उदार असणार नाही ?

६. “कुटुंबाच्या हितासाठी मुलाचे पालनपोषण केले जाते. आपले भविष्य सुरक्षित राहावे म्हणून पुत्र पित्याचा आदर करतो. काही अपेक्षा असतात म्हणून जग उदारता दाखवते. याचा अर्थ या जगात निर्हेतुक, निःस्वार्थी असे काहीही नाही.

७. “याला एकमेव अपवाद म्हणजे तूच. हा घोडा घे आणि माघारी जा.

८. “राजाचा वात्सल्यपूर्ण पितृहृदयी स्नेह आणि आत्मविश्वास अविचल असेल तरीही राजाला त्याचे दुःख हलके करण्यास सहाय्य करणे आवश्यक आहे.

९. “राजाला जाऊन सांग की, मला प्रेम उणे पडले म्हणून किंवा क्रोधवश मी कोणाचाही त्याग केला नाही. मला स्वर्गाची अभिलाषाही नाही.

१०. “मी अशा प्रकारे गृहत्याग केल्यामुळे त्यांनी शोकसंतप्त होऊ नये. संयोग कितीही दीर्घकालीन असो त्याची परिणती एक दिवस वियोगात होणारच असते.

११. “वियोग अपरिहार्य आहे तर आप्त स्वकीयांचा वियोग वारंवार होणार नाही हे कसे शक्य आहे ?

१२. “माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे अनेक वारसदार पुढे येतात. परंतु त्याच्या गुणाचा
वारसा सांगणारे या पृथ्वीतलावर क्वचितच आढळतात. कदाचित कोणी अस्तित्वातच नसतात.

१३. “राजा माझा पिता, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. राजा कदाचित म्हणेल की, तो
चुकीच्या वेळी आम्हाला सोडून गेला परंतु कर्तव्यपालनासाठी कोणतीही वेळ चुकीची वेळ नसते.

१४. “माझ्या मित्रा, तू या आणि अशाच शब्दांनी राजाचे सांत्वन करशील काय? तू असे प्रयत्न करशील काय की ज्यामुळे राजाला माझे स्मरणही होणार नाही ?

१५. “होय, जाऊन माझ्या मातेला पुन्हा पुन्हा सांग की, मी तिच्या प्रेमाचा, वात्सल्याचा स्वीकार करण्यास अपात्र ठरलो. ती श्रेष्ठतम माता आहे. तिचे श्रेष्ठत्व शब्दापलीकडचे आहे.”

१६. हे शब्द ऐकून छत्र दुःखाने वेडापिसा झाला आणि दोन्ही हात जोडून जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याचा कंठ दाटून आला होता.

१७. “तुम्ही आपल्या आप्तस्वकीयांच्या दुःखाचे कारण आहात हे पाहून हे स्वामी, माझ्या मनाची स्थिती पंकसागरात रुतलेल्या हत्तीसारखी झाली आहे.’

१८. “तुमचा हा वज्रकठोर निर्धार पाहून कोणाच्या नेत्रात अश्रू येणार नाहीत ? यामुळे तर पाषाण हृदयालाही पाझर फुटेल. मग स्नेहसिक्त हृदयाची काय कथा !

१९. “कोठे ही राजप्रासादायोग्य कोमल काया आणि कोठे ऋषी वनातील तीक्ष्ण कुशाच्छादित भूमी !

२०. “हे राजपुत्रा, तुमचा निर्णय माहीत झाल्यावरही, मी स्वेच्छेने कपिलवस्तू नगरीच्या दुःखाचे कारण ठरू पाहणारा हा अश्व कसा परत नेऊ ?

२१. “नास्तिक जसा सद्धर्माचा त्याग करतो, त्याप्रमाणे तुम्ही, आपल्या पुत्राप्रति अति उदार असणाऱ्या स्नेहशील अशा वृद्ध राजाचा निश्चितच त्याग करणार नाही.

२२. ” आणि ती तुमची दुसरी माता. जिने तुम्हाला आपल्या अंगाखांद्यावर खेळविले, वाढविले ती तुमची माता. एखादा कृतघ्न जसा आपल्या उपकार कर्त्याला विसरतो तसे तुम्ही तुमच्या मातेला निश्चितच विसरणार नाही.

२३. “आणि तुमची भार्या, जी सर्वगुणसंपन्न आहे. श्रेष्ठ कुलोत्पन्न आहे. जी आपल्या पतीप्रति पूर्णपणे समर्पित आहे. जी पुत्रवती आहे. निश्चितच तुम्ही असाच तिचा त्याग करणार नाही.

२४. “तुम्ही सर्वांच्या आदरास पात्र आहात. तुम्ही धर्मपालक आहात तुम्ही यशचिंतक आहात.
म्हणूनच एखादा उधळ्या आपल्या मौल्यवान संपत्तीची विल्हेवाट लावतो तसे तुम्ही यशोधरेच्या तान्ह्या पुत्राचा त्याग करणार नाही.

२५. “जरी तुम्ही तुमचे राज्य आणि आप्तस्वकीयांचा त्याग करावयाचा निर्धार केला असेल तरी हे स्वामी तुम्ही माझा त्याग करणार नाही. कारण तुमचे चरण हेच माझे आश्रयस्थान आहे.

२६. “तुम्हाला मागे सोडून मी दग्ध हृदयाने नगरात परत जाऊच शकत नाही.

२७. “तुमच्याशिवाय मी नगरात परत गेलो तर राजा मला काय म्हणेल ? किंवा मी जाऊन तुमच्या भार्येला कोणती शुभवार्ता कथन करू ?

२८ छन्न पुढे म्हणाला, “तुम्ही सांगितल्याप्रमाणे जरी मी तुमच्या अवगुणांचे वर्णन राजाकडे केले तरी, कोण त्याचा विचार करणार ? कोण त्यावर विश्वास ठेवणार ? हृदय लज्जेने विदीर्ण झाले आणि जिव्हा गळून पडली तरीही तुमचे अवगुण कथन करण्याचे धाडस मी केलेच तर कदाचित राजाला ते आवडणारच नाही.

२९. “तुम्ही वात्सल्याची प्रतिमा आहात. तुमचे हृदय म्हणजे दयेचा जणू सागरच. अशा तुम्हाला जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा त्याग करणे उचित नाही. कृपया माझ्यावर दया करा आणि माघारी फिरा.”

३०. छत्राचे विलापपूर्ण असे हे उद्‌गार ऐकून सिद्धार्थ गौतम मृदू स्वरात उत्तरला,

३१. “छत्रा, माझ्यापासून विलग होण्यामुळे होणाऱ्या या दुःखाचा त्याग कर अनेक जन्म घेणाऱ्या पार्थिव शरीरधारी प्राण्यासाठी वियोग आणि परिवर्तन अपरिहार्य आहे.

३२. “स्नेहवश मी माझ्या आप्त स्वकीयांचा त्याग केला नाही तरी मृत्यू आमचा वियोग घडवून आणणारच आहे आणि त्यावेळी आम्ही असहाय्य असू.

३३. “आणि ती माझी माता. वेदनांनी विव्हल होऊन जिने मला जन्म दिला ती माझी माता तिच्यासंबंधात आज मी कोठे आहे आणि माझ्या संबंधात आज ती कोठे आहे ?

३४. “ज्याप्रमाणे संध्याकाळी पक्षी आश्रयासाठी आपआपल्या झाडावर एकत्र येतात आणि सकाळ झाली की पुन्हा झाड सोडून जातात तसेच मनुष्य प्राण्याचेही आहे. त्यांच्या मीलनाची समाप्ती वियोगातच होते.

३५. “ज्याप्रमाणे आकाशातील मेघ पुनर्वियोगासाठीच एकत्र येतात तसेच प्राणीमात्रांचेही आहे. मीलन आणि वियोग.

३६. “हे जग याच प्रकारे एक दुसऱ्याची वंचना करीत गतिमान होत असते. म्हणून मीलनसमयी
ती व्यक्ती/वस्तू आपली मानणे म्हणजे आत्मवंचनाच होय.

३७. “हे असे आहे. म्हणून माझ्या मित्रा, दुःखी होऊ नको. तू परत जा. परत गेल्यावरही तुझा स्नेह
कायम राहिलाच तर पुन्हा माझ्याकडे परत ये. परंतु तुला प्रथम परत जाणे आवश्यक आहे.

३८. “मला दोष न देता कपिलवस्तूच्या लोकांना सांग, तुम्ही त्याच्याविषयीच्या मोहममतेचा त्याग करा. कारण त्याचा संकल्प दृढ आहे.”

३९. स्वामी आणि सेवकाचा हा संवाद ऐकून कन्थकाने, त्या राजसी अश्वाने जिव्हेने सिद्धार्थाचे चरण स्पर्शिले आणि त्याच्या चरणावर उष्ण अश्रू गाळले.

४०. ज्याच्या हाताची बोटे सूक्ष्म तंतूंनी जुळलेली आहेत, ज्याच्या तळहातावर मंगल स्वस्तिक आहे, ज्याच्या तळहाताचा मध्यभाग अंतर्गोल आहे अशा गौतमाने स्वहस्ते कंथकाला थोपटले आणि मित्रासारखे संबोधिले.

४१. ‘कन्थका, अश्रू गाळू नकोस. हे दुःख सहन कर, तुझ्या श्रमाला निश्चितच गोड फळे येतील ‘.

४२. छन्न समजून चुकला की वियोगाची घटका जवळ आली आहे म्हणून त्याने वल्कल वसे धारण केलेल्या गौतमाला आदराने प्रणाम केला.

४३. नंतर गौतमाने छन्न आणि कन्धक यांचा निरोप घेतला व आपल्या मार्गाने प्रयाण केले.

४४. जेव्हा छन्नाने पाहिले की, आपला स्वामी राज्यत्याग करून, वल्कल वस्त्रे धारण करून,
ऋषीवनाकडे प्रयाण करीत आहे तेव्हा त्याला राहवले नाही. त्याने दोन्ही बाहू उंचावून मोठ्याने
आक्रोश करीत भूमीवर लोटांगण घातले.

४५. त्याने पुन्हा मागे वळून पाहिले. मोठ्याने विलाप केला. कन्थकाला मिठीत घेतले आणि मोठ्या निराश मनाने दुःख व्यक्त करीत तो परतीच्या वाटेला लागला.

४६. परतीच्या वाटेवर मध्येच थांबून तो विचार करीत होता. कधी दुःखाने विव्हळत होता. कधी वाटेत अडखळत होता तर कधी धरणीवर लोळण घेत होता. समर्पित स्नेहभावाचा परिणाम म्हणून तो भग्न हृदयाने वाटेत नाना कृती करीत होता. पण आपण काय करतो आहोत याचे मात्र त्याला भान नव्हते.