बुद्ध आणि त्यांचा धम्म
भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग पहिला – जन्म ते प्रव्रज्या.
१. दुसऱ्या दिवशी सेनापतींनी पुन्हा संघ सभा आमंत्रित केली. उद्देश होता अनिवार्य सैन्य भरतीच्या प्रस्तावावर संघाद्वारा विचारविनिमयाचा.
२. जेव्हा सभेला आरंभ झाला तेव्हा सेनापतींनी प्रस्ताव मांडला “२० ते ५० वर्षे दरम्यान वय असलेल्या प्रत्येक शाक्याने शस्त्र धारण करावे, सैन्यात भरती व्हावे. कोलीया विरुद्ध घोषित युद्धात भाग घ्यावा. असा आदेश काढण्याची संघाने मला संमती द्यावी.”
३. दोन्ही पक्ष सभेला उपस्थित होते. ज्यांनी गत सभेत कोलीया विरुद्ध युद्धघोषणा करण्याच्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली होती ते आणि ज्यांनी विरोध केला होता तेही.
४. ज्यांनी गत सभेत सेनापतीच्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान केले होते त्यांना सेनापतींचा हा प्रस्ताव स्वीकारताना कोणतीही अडचण भासली नाही. या प्रस्तावाला स्वीकृती ही त्यांच्या गत निर्णयाची स्वाभाविक परिणती होती.
५. परंतु ज्यांनी अल्पमताने सेनापतींच्या गत प्रस्तावाचा विरोध केला होता. त्यांच्यापुढे मात्र संकट उभे राहिले. बहुमताच्या निर्णयापुढे समर्पण करावे को करू नये ही त्यांची समस्या होती.
६. अल्पमतांनी बहुमतापुढे समर्पण न करण्याचा निर्धार केला. यासाठीच त्यांनी सभेत उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला परंतु दुर्भाग्याने सभेत कोणालाही आपला विरोध खुलेपणाने व्यक्त करण्याचे धाडस नव्हते. कदाचित त्यांना बहुमताचा विरोध करण्याच्या परिणामांची जाणीव असावी.
७. आपले समर्थक मौन धारण करून आहेत हे पाहून सिद्धार्थ उभा राहिला आणि संघाला उद्देशून म्हणाला, “मित्रहो, तुम्हाला जे वांछित असेल तेच तुम्ही करावे. तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदपूर्वक नमूद करावयाचे आहे की, अनिवार्य सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाचा मी विरोध करतो. मी सैन्यात भरती होणार नाही आणि युद्धात भागही घेणार नाही.”
८. सिद्धार्थ गौतमाला उद्देशून सेनापती म्हणाले, “संघाचे सदस्यत्व स्वीकारताना घेतलेल्या प्रतिज्ञांचे तुला स्मरण आहे काय ? जर त्यापैकी तू एकही प्रतिज्ञेचा भंग केला तर तुला लोकनिदेला सामोरे जावे लागेल.”
९. सिद्धार्थ उत्तरला, “होय, मी तनमनधनाने शाक्यांच्या हितरक्षणाची प्रतिज्ञा केली होती. पण मला हे युद्ध शाक्यांच्या हिताचे आहे असे वाटत नाही आणि माझ्यासाठी शाक्यांच्या हितापुढे लोकनिंदेचे काय मोल ?”
१०. सावधानतेचा इशारा देत सिद्धार्थाने संघाला याची आठवण करून दिली की, शाक्य आणि कोलीयांच्या निरंतर संघर्षाचा परिणाम म्हणून शाक्यांना कोशल नरेशाचे मांडलिकत्व पत्करावे लागले. म्हणूनच पुन्हा हे युद्ध कोशल नरेशाला शाक्यांच्या स्वातंत्र्याचा अधिक संकोच करण्यास संधी देईल हे समजणे फारसे कठीण नाही.
११. संतप्त होऊन सेनापती सिद्धार्थाला उद्देशून म्हणाले, “तुझे वचन तुला साहाय्यक ठरणार नाही. तुला संघाच्या बहुमताच्या निर्णयाचे पालन करावेच लागेल. तुझी भिस्त कदाचित या वास्तवावर असेल की, संघाच्या आज्ञेची अवमानना करणाराला संघ कोशल नरेशाच्या अनुमतीशिवाय फाशीची किंवा देशत्यागाची शिक्षा देऊ शकणार नाही आणि या दोनपैकी कोणतीही एक शिक्षा दिली तरी कोशल नरेश तिला अनुमती देणार नाही.”
१२. “परंतु तू हे ध्यानात ठेव की, तुला दंडित करण्याचे संघाजवळ अनेक मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबाविरुद्ध सामाजिक बहिष्कार पुकारू शकतो. संघ तुझ्या कुटुंबाच्या जमिनी जप्त करू शकतो आणि याकरिता संघाला कोशल नरेशाच्या अनुमतीची गरज नाही.”
१३. संघाच्या कोलीयाविरुद्ध युद्धाच्या योजनेला आपण असाच विरोध करीत राहिलो तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याच्यापुढे तीन पर्याय होते – सैन्यात दाखल व्हावे आणि युद्धात भाग घ्यावा, फाशीची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगावी, किंवा त्याच्या कुटुंबियांनी सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे व संघाने त्याच्या कुटुंबाच्या जमिनी जप्त कराव्यात.
१४. प्रथम पर्याय त्याला ठामपणे अस्वीकृत होता तिसऱ्या पर्यायाविषयी तो कल्पना देखील करू शकत नव्हता प्राप्त परिस्थितीत त्याला दुसरा पर्यायच योग्य वाटला.
१५. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, “कृपया माझ्या कुटुंबाला दंडित करू नका. जमिनी हे त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे. जमिनी जप्त करून त्यांना निराधार करू नका. ते निदर्दोष आहेत. तुमचा अपराधी मी आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मलाच भोगू द्या. मला फाशीची किवा देशत्यागाची, तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. मी ती स्वेच्छेने स्वीकारीन, तुम्हाला अभिवचन देतो की, मी त्याविरुद्ध कोशल नरेशाकडे निवेदनही करणार नाही.”
The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म
More Stories
आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे आलोचक
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग पाचवा – १. बुद्ध आणि वैदिक ऋषी.