April 3, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – १२. राजपुत्राचे अमात्याला उत्तर

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड :  भाग पहिला  – जन्म ते प्रव्रज्या.

🌼 १२. राजपुत्राचे अमात्याला उत्तर 🌼

१ पवित्र परंपरांनी समर्थित पण छलकपटपूर्ण असे त्याचे संभाषण ऐकून आपल्या मेघगर्जनेसम घन गंभीर आवाजात राजपुत्र उत्तरला, २. “तुमचे संभाषण हे तुमच्या मैत्री व प्रेमाचे प्रतीक आहे. परंतु माझ्यासंबंधात तुम्ही कोठे चुकता

आहात याची मी आपणास जाणीव करून देऊ इच्छितो.

३. “मी संसार सुखाची अवज्ञा करीत नाही. मी जाणतो की संपूर्ण जगाला या सुखाची आसक्ती आहे. परंतु मी हेही जाणतो की संपूर्ण संसारच अनित्य आहे. म्हणून माझे मन या संसारसुखात रममाण होत नाही.

४. “जरी स्त्री सौंदर्य नित्य निरंतर असते तरीही बुद्धिवान माणसाचे मन विषयसुखात रममाण होणे योग्य नाही.

५. “आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे महापुरुषसुद्धा विषय वासनेचे बळी ठरले आहेत. तेव्हा ते काही आदर्श ठरू शकत नाहीत कारण शेवटी त्यांच्या भालीही विनाशच लिहिला होता

६. “विनाशात, सांसारिक सुखोपभोगाच्या आसक्तीत किंवा आत्मसंयमविहीन जीवनात महानता शोधणे व्यर्थ आहे.

७. “आणि तुम्ही असे सूचित करीत आहात की, स्त्रीला छलकपटानेही जिकावे. मला छलकपटाची जाणीव आहे. सभ्यतेच्या आवरणाखाली अवगुंठित छलकपटाचीही.

८. “जेथे सत्य नाही तेथे स्त्रीच्या संमतीनेही इच्छापूर्ती मला सुख देऊ शकणार नाही. जर शरीर आणि मन दोन्हीचे मीलन नसेल तर असे सुख काय कामाचे ?

९. “जेथे मन विषयासक्त आहे. जेथे संबंधाचा आधाराच मिथ्या विश्वास आहे, जेथे आसक्तीच प्रेरणा आहे, जेथे विषयवासनेचे दोष दिसतच नाहीत, अशा आत्मवंचनेच्या आहारी जाण्याचे काय औचित्य आहे ?

१०. “आणि हे वासनेचे बळी जेव्हा एक दुसऱ्याशी छलकपट करतात तेव्हा असा कपटी पुरुष, त्याच्याकडे स्त्रीने पहावे या योग्यतेचा तरी असतो काय ? किंवा अशी कपटी स्त्री, तिच्याकडे पुरुषाने पहावे या योग्यतेची तरी असते काय ?

११. “जर वस्तुस्थिती अशी आहे तर तुम्ही मला विषयवासनेच्या निंदनीय मार्गाने वाटचाल करण्यास प्रवृत्त करणार नाही असा विश्वास वाटतो.”

१२. राजपुत्राच्या या पूर्वनिर्धारित दृढसंकल्पाने उदायी निरुत्तर झाला आणि त्याने राजपुत्राच्या पित्याला हे सर्व कथन केले.

१३. शुद्धोदनाला असे समजले की, त्याच्या पुत्राचे चित्त विषयसुखापासून विरक्त झाले आहे. तेव्हा त्याला रात्रभर झोप आली नाही. एखाद्या हत्तीच्या हृदयात बाण रुतल्याने त्याला जशा वेदना व्हाव्यात तशाच वेदनांनी राजा विव्हळत होता.

१४. राजा आणि अमात्यांनी सिद्धार्थाला सांसारिक विलासी सुखोपभोगात गुंतविण्याचा मार्ग सापडेल या आशेने बराच वेळ विचारविनिमयात घालविला. सिद्धार्थ आपल्या जीवनासाठी जो मार्ग निवडणार त्यापासून त्याला परावृत्त करणे हा या विचारविनिमयाचा मुख्य हेतू होता. परंतु त्यांनी या हेतूने आतापर्यंत ज्या साधनांचा व मार्गाचा अवलंब केला त्याशिवाय त्यांना अन्य कोणताही मार्ग सापडला नाही.

१५. पुष्पमाला आणि अलंकार यांची व्यर्थता सिद्ध झाल्याने, त्यांचे कला कौशल्य आणि हावभाव निष्अभ ठरल्याने अनुरागपूर्ण हृदयांनी युक्त अशा युवतींचे ते अंतःपुर विसर्जित करण्यात आले.

The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म