📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग पहिला – जन्म ते प्रव्रज्या.
🌼 १०. राजपुत्राला वश करण्यात षोडशी असफल ठरल्या ! 🌼
१. उदायीचे हे बोल त्यांच्या हृदयाला भिडले. राजपुत्राला वशीभूत करण्यासाठी त्यांनी आपल्ली सर्व शक्ती पणाला लावण्याचा निर्धार केला; इतका की आपल्या वास्तविक शक्तीपेक्षाही त्या उंचावल्या.
२. परंतु त्यांचे भूभंग, नेत्रकटाक्ष, त्यांचे मनाला मोहून घेणारे हावभाव, त्यांचे स्मित, त्यांच्या नाजुक हालचाली, एवढे सर्व असूनही त्या युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू याचा विश्वास वाटत नव्हता.
३. परंतु राजपुत्राचा मृदू स्वभाव, राजपुरोहिताचा आदेश आणि सुरेचा मद व प्रेम यांची शक्ती यामुळे षोडशींनी आपला गमाविलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त केला
४. त्या युवती आपापल्या कार्यात मग्न झाल्या हिमालयाच्या वनात मत्त हत्तीणींच्या कळपात मुक्त विहार करणाऱ्या गजराजासारखी त्यांनी राजपुत्राची अवस्था केली.
५. आनंदवनात कोमलांगीच्या सहवासात विचरणारा राजपुत्र दिव्य वनात अप्सरांच्या समूहात विचरणाऱ्या सूर्यासारखा भासत होता.
६. त्यांच्यापैकी काहींनी कामातुर होऊन आपल्या पूर्ण विकसित उरोजांचा उत्कट स्पर्श होईल अशा प्रकारे त्याला पुनः पुनः आलिगनबद्ध केले.
७. काहींनी अडखळल्याचा अभिनय करून त्याला एकदम घट्ट आलिंगन दिले. काहींनी त्याच्या खांद्यावर आपला भार टाकला व आपल्या लतासदृश नाजुक बाहूंचा त्याला विळखा घातला.
८. काही आपल्या स्वर्गसुरा सुगंधित मुखाने आणि रक्तवर्ण ओष्ठांनी त्याच्या कानात आपले गुपित सांगण्याचा प्रयत्न करू लागल्या.
९. काहींनी सर्वांगाला सुगंधित द्रव्ये माखून, त्याचे हात आतुरतेने आपल्या हातात घेऊन माझी
पूजा येथे बांधा अशी आज्ञा केली.
१०. दुसरी नीलाम्बरा सुराधीन होण्याचा अभिनय करीत वारंवार आपले ढळणारे वस्त्र सावरू लागली. काळ्या रात्री वीज लखलखावी तशी आपली जिव्हा मुखाबाहेर काढून उभी राहिली.
११. दुसऱ्या काही पायातील पैजणांचा मंजुळ निनाद करीत इकडून तिकडे विचरत होत्या आणि आपल्या अर्ध आच्छादित देहाचे प्रदर्शन करीत होत्या.
१२. काही आम्रवृक्षाची शाखा हातात धरून आपल्या सुवर्ण कलश सदृश उन्नत उरोजांचे प्रदर्शन करीत होत्या.
१३. काही पद्म सरोवरातून आल्यागत करकमली कमलपुष्प धारण करणाऱ्या पद्मदेवतेसमान या कमलनयना युवती कमलमुख राजपुत्राच्या सभोवती उभ्या होत्या.
१४. एकीने आत्मसंयमी राजपुत्रालाही उत्तेजित करू शकतील अशी उत्तेजक हावाभावासहित शृंगारिक गीते गायिली. त्या गीतांचा भाव असा होता की, नयनकटाक्ष जणू म्हणत होते, अरे पुरुषा, दू कोणत्या भ्रमात आहेस ।
१५ दुसरीने आपल्या आभायुक्त मुखाने, भृकुटी पूर्ण ताणून, राजपुत्राच्या मुखमुद्रेचे प्रतिरूप प्रस्तुत केले.
१६. जिचे वश्व उन्नत आणि पूर्ण विकसित आहेत, जिची कर्णाभूषणे वायूसंगे झुलत आहेत अशा एकीने मोठ्याने हसून राजपुत्राला आव्हान दिले, ‘शक्य असेल तर मला स्पर्श करून दाखवा.
१७. राजपुत्र दूर जातो आहे असे पाहून काहींनी त्याला पुष्पमालांनी बांधण्याचा प्रयत्न केला तर काहींनी मृदू परंतु अंकुशासमान बोचऱ्या शब्दात त्याला विद्ध करण्याचा प्रयत्न केला आव्हान देत विचारले की, ‘हे पुष्प कोणाचे आहे ?’
१८. दुसरीने करकमली आम्रशाखा धारण करीत कामातुर होऊन राजपुत्राला युक्तिवादासाठी
१९. दुसरी पुरुषी आवाजात राजपुत्राला म्हणाली, ‘हे स्त्रीजित, जा आणि पृथ्वी पादाक्रांत कर
२०. दुसरी नील पद्माचा गंध घेत, नयनबाणांनी घायाळ करीत स्वतः उत्तेजित झाल्यामुळे काहीशा अस्पष्ट आवाजात राजपुत्राला विचारती झाली,
२१. “हे स्वामी, मधुगंध पुष्पाच्छादित, या आम्रवनात, जणू सुवर्णाच्या पिंजऱ्यात कैद असल्यागत, मुग्ध होऊन कोकिळा गान करीत आहे. आपण तिकडे पहावे.
२२. “स्वामी या आणि हा अशोक वृक्ष पहा. जणू प्रेमी युगुलांच्या शोकवर्धनाचे प्रतीकच येथे मधुमक्षिका प्रेमदग्ध होऊनच गुंजारव करीत आहेत असे वाटते.
२३. ” आणि हा तिलक वृक्ष पहा. हा तिलक वृक्ष कृशतनु आनलतिकेने आपल्या कवेतच घेतला आहे.
२४. “हा फुलारलेला कुरबक वृक्ष पहा वृक्षातून स्त्रवणाऱ्या ताज्या रक्तवर्ण रसासारखा प्रकाशित, जणूकाही यौवनेच्या नखांच्या रक्तवर्णाने घायाळ झाल्यागत उभा आहे.
२५. “या आणि नवपल्लवीने वेष्टित युवा अशोक वृक्ष पहा कसा आमच्या करकमलांच्या ! सौंदर्याने लज्जित होऊन उभा आहे !
२६. “काठावर सभोवार सिंधुवरा उगवलेल्या या सरोवराकडे पहा. जणूकाही गौरकांती यौवना श्वेतवस्त्र परिधान करून पहुडली आहे.
२७. “या आणि स्त्री जातीच्या सामर्थ्याचे दर्शन घ्या. ती गुलाबवर्ण हंसिनी पहा कशी जलक्रीडेत मग्न आहे ! आणि तिचा तो प्रियकर पहा कसा तिच्या पाठोपाठ विचरतो आहे! जणू काही तिचा दासच !
२८. “या आणि मत्त नर कोकिळाचे गान ऐका. त्याच बरोबर मादी कोकिळेचे स्वर ऐका कशी स्वच्छंदपणे साद देत आहे सारं विसरून !
२९. “मी किती शहाणा आहे अशाच विचारात सतत मग्न असणाऱ्या बुद्धिमंताच्या विचाराऐवजी पक्ष्यांमधील वसंत ऋतूजन्य कामोन्मादाचा थोडा तरी अंश आपणात असता तर किती बरे झाले असते !”
३०. अशा प्रकारे प्रेमासक्त कोमलांगींनी राजपुत्राला वश करण्यासाठी त्याचेवर सर्व प्रकारच्या अस्त्रांचा वर्षाव केला.
३१. रतिसौंदर्याची एवढी आक्रमणे होऊनही ज्याने आपल्या इंद्रियांवर आत्मसंयमाने विजय संपादन केला आहे असा राजपुत्र प्रसन्न होणे तर दूरच त्याने स्मित देखील केले नाही.
३२. ललनांच्या वास्तवतेचा परिचय झाल्याने राजपुत्र एकाग्रचित्ताने, विचारात मग्नच राहिला.
३३. राजपुत्राला असे वाटत होते की, या स्त्रियात असे कोणते न्यून आहे की, त्यांना एवढेही कळत नाही की, यौवन हे चंचल आहे, क्षणभंगुर आहे आणि वार्धक्य सर्व शरीरसौंदर्याचा नाश करणारे आहे.
३४. अशा प्रकारे हा लपंडावाचा खेळ महिनोगणती, वर्षोगणती चालत राहिला पण परिणाम मात्र शून्यच.
The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म
More Stories
Buddha and his Dhamma बुद्ध आणि त्याचा धम्म
🌼 मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. 🌼 The lament of a warrior and the joy of a monk.
आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे आलोचक