November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग तिसरा – १. भृगूच्या आश्रमाला भेट

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड : भाग तिसरा – नव प्रकाशाच्या शोधात.

🌼 १. भृगूच्या आश्रमाला भेट 🌼

१. अन्य मार्गाचा शोध घेण्याची इच्छा मनी बाळगून गौतमाने राजगृह सोडले व तो आलार कालामच्या भेटीला निघाला.

२. वाटेवर त्याला भृगू ऋषीचा आश्रम दिसला सहज उत्सुकतेपोटी त्याने आश्रमात प्रवेश केला.

३. आश्रमवासी ब्राह्मण समिधा गोळा करण्यासाठी वनात गेले होते. ते त्याच वेळी परतले. त्यांच्या दोन्ही हाती कुश गवत, समिधा आणि फुले होती. ते आपल्या कठोर तपश्चर्येविषयी प्रख्यात होते. ते विद्वान म्हणूनही विख्यात होते. ते आपआपल्या कुटीकडे न जाता त्याच्या दर्शनासाठी एकत्र झाले.

४. आश्रमवासियांनी त्याचे योग्य ते आदरातिथ्य केले. त्यानेही आश्रमातील श्रेष्ठांप्रति आपली श्रद्धा व्यक्त केली.

५. तो सुज्ञ, तो ज्ञाता, तो मुक्तीचा उपासक, मोक्षाची कामना करणाऱ्या मंगल तपस्व्यांच्या सहवासात कठोरतम तपश्चर्येच्या विविध विधींचे अवलोकन करीत आश्रमात फिरला.

६. तो मृदू, तो कोमल, त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या कठोरतम तपश्चर्येत मग्न अशा तपस्व्यांना त्या पवित्र वनात प्रथमच पाहिले.

७. त्यानंतर कठोरतम तपस्येच्या तंत्रात निपुण अशा भृगू ऋषीने गौतमाला तपश्चर्येचे विविध प्रकार आणि त्यांची फलप्राप्ती याविषयी माहिती सांगितली.

८. धर्मशास्त्रानुसार जलोत्पत्र निराग्नी भोजन, कंदमुळे आणि फळे हाच तपस्व्यांचा आहार होय. परंतु या व्यतिरिक्तही कठोर तपश्चर्येचे, आत्मक्लेशाचे विविध प्रकार, विविध पर्याय होते.

९. “काही तपस्वी पक्ष्याप्रमाणे दाणे टिपून जगत होते. काही मृगाप्रमाणे गवताचा आहार घेत होते. काही सापाप्रमाणे वायू भक्षण करून आपला निर्वाह करीत होते. काहींच्या देहावर मुंग्यांनी वारुळ केले होते.

१०. “काही परिश्रमपूर्वक केवळ पत्थरातूनच आपले अन्न प्राप्त करीत होते. काही आपल्या
दातांनी दळून अन्न ग्रहण करीत होते. काही दुसऱ्याकरिता शिजवलेल्या अन्नातून जे उरेल त्यावरच आपला निर्वाह करीत होते.

११. “काही निरंतर आपल्या जटा जळात भिजवून ठेवत आणि दिवसातून दोनदा अग्नि देवतेला अर्घ्य देत होते. काही माशासारखे जलचरांचे जीवन जगत होते. त्यांचे देह कासवांनी कुरतडले होते.

१२. “शरीर कष्ट, क्लेश, यातना हेच त्यांचे धर्म कार्य होते. अधिक क्लेश, अधिक कष्ट म्हणजे स्वर्ग प्राप्ती, कमी क्लेश, कमी कष्ट म्हणजे मर्त्यलोकीचे वास्तव्य अशी त्यांची समजूत होती. शरीर कष्ट, क्लेशाच्या मार्गांनी सुखप्राप्तीचे त्यांचे प्रयास होते. दैहिक कष्ट, क्लेष, दुःख हेच पुण्याचे मूळ आहे अशी त्यांची धारणा होती.”

१३. हे ऐकून, गौतम म्हणाला, “अशा तपस्व्यांना मी प्रथमच पाहतो आहे. तपश्चर्येसाठी दैहिक
कष्ट, क्लेश हा नियम काही मला समज नाही.

१४. “या क्षणी मी एवढेच म्हणू शकतो की, तुम्ही स्वर्गप्राप्तीसाठी समर्पित आहात. परंतु माझे समर्पण हे या जिवंत जगातील दुःखाच्या कारणांचा शोध घेऊन त्याच्या निराकरणाचा मार्ग शोधण्यासाठी आहे. आपण मला आज्ञा द्यावी. मी सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करू इच्छितो. मी संसाधी मार्गाचा अनुभव घेऊ इच्छितो. या मार्गांनी मला अभिप्रेत असलेल्या समस्येचे समाधान सापडू शकते काय हे मी जाणून घेऊ इच्छितो.

१५. “आपण आपआपल्या तपश्चर्येत मग्न असतानाही मला उदार आश्रय दिला. आपल्या
वियोगाचे दुखही मला आपल्या आप्तस्वकीयांच्या वियोगासारखेच आहे.

१६. “तुम्ही श्रेष्ठ तपस्वी आहात तुम्ही आपल्या धर्मकर्तव्याबाबत दृढ आहात. पूर्वाश्रमीच्या श्रेष्ठ ऋषीच्या परंपरेचे आपण पाईक आहात. म्हणून आपण मला आवडत नाही म्हणून किंवा आपल्स आदरातिथ्यात काही उणीव राहिली म्हणून काही मी आपणास सोडून जात नाही.

१७. “मी जो आपल्या विषयाच्या ज्ञाता आहे अशा मुनी आलार कालामकडे जाऊ इच्छितो”

१८. त्याचा हा दृढसंकल्प पाहून त्या आश्रमाचे प्रमुख भृगू ऋषी म्हणाले, “हे राजपुत्रा, तुझे ध्येय श्रेष्ठ आहे. युवावस्थेतच तू स्वर्ग आणि मुक्ती यासंबंधी गंभीरतेने विचार केला आहेस. तू मुक्तीला आपले ध्येय मानले आहेस. तू निःसंदेह वीर आहेस.

१९. “तू जे बदलास तेच तुझे ध्येय असेल तर तू त्वरित विध्याचलाकडे गमन कर तेथे मुगे आलार कालामाचे वास्तव्य आहे. त्याला निरपेक्ष सुखाचे ज्ञान प्राप्त आहे.

२०. “त्याच्याकडून तुला त्याच्या मार्गाचे ज्ञान प्राप्त होईलही. परंतु मला भविष्य काही वेगळेच दिसते आहे. त्याच्या तत्वज्ञानाचे अध्ययन केल्यानंतर तुझे ध्येय तुला त्याही पलीकडे घेऊन जाईल’

२१. गौतमाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली, त्या तपस्व्यांना प्रणाम करून त्याने त्यांचा निरोप घेतला तपस्व्यांनी सुद्धा निरोपप्रसंगी त्याच्याप्रति आदर व्यक्त केला आणि तपश्चर्येनिमित्त वनाच्या
मार्गाला लागले.

१. भृगूच्या आश्रमाला भेट ( समाप्त )….