पूजा-प्रार्थनेस बौद्ध धम्मात काय स्थान आहे? या प्रश्नाने अनेकांच्या मनाचा मोठा गोंधळ उडवुन टाकला आहे. याचे कारण एकच आहे, ते म्हणजे ईश्वरप्रधान धर्मात ईश्वराला संतुष्ट ठेवण्यासाठी, त्याच्या कोपापासुन वाचण्यासाठी, त्याला पुजा-प्रार्थनेने प्रसन्न करुन मनोवांच्छित काही मागण्यासाठी पुजा केली जाते, असा विचार केल्यामुळे होय. पण बौद्ध धम्मात या कारणासाठी पुजा मुळीच केली जात नाही. प्रार्थनेला तर इथे जागाच नाही…. इथे पुजा या समान शब्दप्रयोगाने मोठा मानसिक गोंधळ उडतो.
आपण ईश्वरप्रधान धार्मिक जीवन जगणाऱ्याच्या सहवासात राहिल्यामुळे अगदी नकळतपणे आपल्यावर घडलेले संस्कार अगदी खोलवर रुजले जातात. म्हणुन ईश्वरप्रधान धर्म सोडला तरी बुद्धपुजेबद्दल विचार करत असताना आपण बौद्धोतरांचा अर्थ मनी का बाळगत असतो.? ते आपण सर्वप्रथम सोडले पाहिजे.
भगवान बुद्ध एक मानव होते, परंतु ते काही सर्वसामान्य मानव नव्हते, तर ते एक ‘प्रबुद्ध मानव’ होते. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. परिपुर्ण प्रज्ञा असणारा अमर्याद मैत्री आणि महाकारुणीकतेचे मुर्तीमंत प्रतीक अशा प्रबुद्ध मानवाचे अस्तित्व बौद्ध धम्मानुसार विश्वातील सर्वश्रेष्ठ अस्तित्व मानले जाते. म्हणुनच अशा प्रबुद्ध मानवाची पुजा केली जाते.. त्यांनी आपल्यापुढे बुद्धत्वाचा आदर्श स्वप्रयत्नातुन निर्माण करुन ठेवल्याबद्दल आणि आपण एक मानव म्हणुन काय बनु शकतो याचा मार्ग दाखवुन दिल्याबद्दल बुद्धाची कृतज्ञतेच्या भावनेतुन पुजा केली जाते. त्यांना एक देव मानुन नव्हे तर एक गुरू म्हणुन, एक आदर्श म्हणुन, एक मार्गदाता म्हणुन गौरव करण्यासाठी त्यांची पुजा केली जाते. म्हणुन ही आंधळेपणाने केली जाणारी ईश्वरपुजेसारखी गोष्ट ठरत नाही.
पुजा च पुजनीयानं एतं मंगलमुत्तमं असे भगवान बुद्धांनी महामंगल सुत्तात म्हटलेले आहे. याचा अर्थ काय? तर आदरभाव व्यक्त करण्यायोग्य किंवा वंदन करण्यायोग्य अशी ज्यांची पात्रता आहे, त्यांचा तसा आदर करणे होय. आदरभाव जेव्हा अतिगंभीर असतो तेव्हा त्याला पुज्य म्हणतात. पुजा ही म्हणुनच पुजनीयांचीच केली जाते. आदर्शाचीच केली जाते. नतमस्तक झाल्याने त्या आदर्शाचा प्रभाव ग्रहण करण्याची शक्ती अंगी येते. ग्रहणशीलता अंगी आल्याने शिकता येते. समजता येते आणि त्याप्रमाणे आपले जीवन घडविण्याची प्रेरणा लाभते. म्हणुन विमम्र होणे याअरथी पुजा समजली जाते. अशी पुजा ईश्वरप्रधान धर्मातील असत नाही. ईशवरावर पुर्णपणे अवलंबुन राहणे, त्याच्या कृपेसाठी त्याला पुजेद्वारे काही अर्पण करुन खुश करण्याचा प्रयत्न करणे, किंवा त्याच्या कोपाला भिवुन त्यापासुन वाचण्यासाठी पुजा करणे, ही पुजा ग्रहणशीलता वाढवुन ज्ञानार्जनाची आणि त्यायोगे आपले जीवन घडविण्याची प्रेरणा देणारी असत नाही. तर भय, लोभ आणि अज्ञानापोटी घडणारी कृती असते. त्यामुळे माणसाचा प्रत्यक्षात काही लाभ होत नसतो. म्हणुन बौद्ध पुजा इतर धर्मियांच्या पुजांपेक्षा वेगळी होय. इथे तुम्ही बुद्धाकडे काही मागत नसता, किंवा त्याला भीतही नसता शिवाय एक मानव म्हणुन आपल्यामध्ये आणि बुद्धामध्ये जे साम्य आहे, ते लक्षात घेता बुद्ध म्हणजे आपलेच एक पुर्ण विकसित रुप होय. त्यामुळे बुद्धत्वाच्या आदर्शाची सार्थकतापटुन आपल्या मनात त्याच्याबद्दल आदराची व प्रतिसादाची भावना निर्माण होते. या भावनेला श्रद्धा असे म्हणतात. पण ही आंधळी शद्धा असत नाही. ही श्रद्धा कृतीतुन व्यक्त करण्यासाठी आपण अभिवादन, पुजा, वंदन करीत असतो. ही श्रद्धा शारीरिकदृष्ट्या व्यक्त करताना आपण नमस्कार (साधा हात जोडुन किंवा पंचांग प्रणाम करुन) करतो. ही श्रद्धा वाचेद्वारे व्यक्त करताना आपण त्या आदर्शाचा गुण गौरव करतो. पुजा-वंदना म्हणतो, सुत्तपठण करतो आणि हीच श्रद्धा मनाने व्यक्त करण्यासाठी ध्यान करतो. म्हणुन अशा प्रकारची पुजा नेहमीच्या ईश्वरासाठी केलेल्या पुजेसारखी असु शकत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे पुजेचा संबंध माणसाच्या डोक्यापेक्षा ह्रदयाशी, त्याच्या भावनांशी अधिक असतो. शुद्ध, विधायक आणि ग्रहणशील भाव निर्मितीसाठी पुजा ही पहिली पायरी होय. ते श्रद्धेचे एक अंग होय. पंच धर्मेंद्रियांमधी पहिले धर्मेंद्रिय श्रद्धा होय. त्याच्या विकासाचा संबंध येतो तो पुजेशी आणि अशा डोळस पुजेमुळे बुद्धत्वाच्या आदर्शावरील श्रद्धा बळकट होते आणि तो आदर्श आपल्या जीवनात उतरविण्याची प्रेरणा मिळते. विनम्रतेशिवाय ग्रहणशीलता नाही आणि ग्रहणशीलतेशिवाय शिकणे नाही. याचप्रमाणे पुजेशीवाय श्रद्धा नाही आणि श्रद्धे शिवाय धम्माचरण नाही – बुद्धत्वाकडे वाटचाल होणे शक्य नाही. पुजा करताना बुद्धमुर्तीसमोर पुष्प, दीप आणि सुगंध अर्पण करण्याची बौद्धांची प्राचीन काळापासुन चालत आलेली परंपरा आहे.
➻ येथे पुष्प किंवा फुल हे अनित्यतेच्या शिकवणीचे प्रतीक आहे. आपले शरीर व इतर भौतिक गोष्टी फुलासारखेच असते. आज हसरी टवटवीत सुवासिक तर उद्या कोमेजलेली, निस्तेज आणि दुर्गंधी सुटलेली म्हणुन भौतिक आसक्ती ठेवु नये.
➻ दीप हे बुद्धाच्या प्रज्ञेचे प्रतीक आहे. बुद्धाने आपल्या प्रज्ञारुपी दीपाने अज्ञान रुपी अंधकाराचा नाश केला. त्याचप्रमाणे आपण त्या प्रज्वलीत बुद्धप्रदीपापासुन स्वतःचा प्रज्ञारुपी दीप प्रज्वलित केला पाहिजे.
➻ तिसरे प्रतीक सुगंध (अगरबत्ती). हे आहे शीलमय जीवनाचे प्रतीक! ज्याप्रमाणे सुगंध सर्व दिशांना पसरतो, त्याचप्रमाणे आपल्या शुद्ध व शीलवान जीवनाच्या सुगंधाचे होय. सुगंधी द्रव्यांचा सुगंध केवळ वाऱ्याबरोबरच पसरतो पण शीलवान, शुद्ध जीवनाचा सुगंध मात्र वाऱ्याच्या विरुद्ध दिशेलासुद्धा पसरतो. हा या प्रतीकांचा भावार्थ आहे.
म्हणुन पुजा, वंदना करण्यामधुन बुद्धत्त्वाच्याआदर्शावरील आपली श्रद्धा बळकट होण्यास मदत मिळते आणि उचित प्रकारे धम्माचरण करण्याची आपणास सदैव प्रेरणा मिळते…
More Stories
आईच्या दशक्रीयेच्या दिवशी चाळीस बोधीवृक्षांची लागवड करत, बौद्ध धर्म स्विकारला असल्याचे केले जाहिर, नाशिक मधिल लिंगायत परिवाराचे क्रांतीकारी पाऊल.
बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के तहत “प्राचीन बौद्ध पुरातत्व कार्यशाला” का ओनलाइन प्रशिक्षण
१० जून स्मृतीपुष्प लेख. आंबेडकरी विचाराचे खरे वारसदार – मा.भी.डांगे